Monday, October 29, 2018

रा. सु. गवई यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबई, दि. 29 : दिवंगत नेते रा. सु. गवई यांचे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रा. सु. गवई स्मारकासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अमरावती येथून आमदार सुनील देशमुख, अमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करताना स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात यावी. याशिवाय हे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असल्याने स्मारकाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अमरावती विद्यापीठाला देण्यात यावी. नियोजित कालमर्यादेत रा. सु. गवई यांच्या स्मारकाची उभारणी राज्य शासनामार्फत करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
रा.सु.गवई स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील मौजा म्हसला येथील ३.९४ हेक्टर जागेत करण्यात येणार आहे. स्मारकस्थळी रा. सु. गवई यांचा पूर्णाकृती पुतळा, त्यांचा जीवनपट उलगडणारे दालन, शैक्षणिक, औद्योगिक व व्यावसायिक दृष्टीने कन्व्हेंशन सेंटर, एक हजार व्यक्तींच्या क्षमतेचे मोठे श्रोतागृह, दोनशे व्यक्ती क्षमतेचे छोटे श्रोतागृह, परिसंवादासाठी कॉन्फरन्स हॉल, खुले थिएटर, अतिथीगृह असणार आहे.
0000

Friday, October 26, 2018

नोंदणी न झालेल्या मतदारांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिम
रविवारी सर्व मतदान केंद्रावर बीएलओ असणार
अमरावती, दि.26: पात्र असूनही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी रविवारी (ता. 28) आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदान केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी मतदार म्हणून नोंदणीस पात्र असूनही मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या व्यक्तींची नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती करण्यात येत आहे.
          दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी संबंधी दावे व आक्षेप दाखल करण्याची मुदत दि. 31 ऑक्टोबर 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2018  रोजी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ हजर राहणार आहेत.
 नागरिकांनी या दिवशी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची पडताळणी करुन घ्यावी तसेच ज्या व्यक्तींनी पात्र असूनही मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नमुना 6 भरुन देऊन सहकार्य करावे व या राष्ट्रीय कार्यात मनापासून सामील व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.
०००

सैन्यदलाची भरती प्रक्रिया सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका - कर्नल आर.एम. नेगी



अमरावती, दि. 27 :  भारतीय सैन्य दलातर्फे सैन्यभरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, आतापर्यंत सुमारे 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी चाचणीत भाग घेतला. चाचणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडत असून, उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कर्नल आर. एम. नेगी यांनी येथे केले.
बुलडाणा वगळता नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी अमरावतीत भरती प्रक्रिया सुरु आहे.  सैन्यभरतीसाठी ऑनलाईन नोंदणीसह (ऑनलाईन ॲप्लिकेशन कम रजिस्ट्रेशन)अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. अत्यंत काटेकोर व पारदर्शीपणे हीप्रक्रिया पार पडते. तथापि, काही समाजकंटकांकडून उमेदवारांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना  बळी पडू नये, असे आवाहन श्री. नेगी यांनी केले.
ते म्हणाले की, उमेदवारांची मोठी गर्दी लक्षात घेता सैन्यदलातर्फे काटेकोरपणे अविरत प्रक्रिया सुरु आहे. येथे  सुमारे दीडशे अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी श्रेणीतील 15 जणांसह 7- 8 डॉक्टरांचाही समावेश आहे. निवड अचूक व काटेकोर होण्यासाठी सैन्यदलाकडून अविश्रांत काम सुरु आहे.
                   प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक हजेरी
पारदर्शी प्रक्रियेसाठी चाचणीत उमेदवाराची प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. विविध टप्प्यांवर वेगवेगळे अधिकारी चाचणी घेतात. उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातात. शारीरीक मोजमाप चाचणी व धावणे आदी पात्रता आदी टप्प्यात तपासणी होते. चाचणीत कुठेही उणीव राहू नये म्हणून लेखी नोंदीसह फोटो नोंदीही जतन केल्या जातात. चाचणी प्रक्रिया घडत असतानाच प्रत्येक टप्प्यावरील नोंदीचे सॉफ्टवेअरमध्ये दस्तावेजीकरण होते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत काटेकोर व पारदर्शी असते.   

शारीरीक चाचणीत पात्र ठरलेल्यांना त्याचदिवशी त्याचठिकाणी लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र दिले जाते.
                                  27 जानेवारीला लेखी परीक्षा
शारीरक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि. 27 जानेवारीला नागपूर येथे होणार आहे. जीडी क्लार्क, नर्सिंग असिस्टंट आदी पदांसाठी ही परीक्षा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 व 1 तारखेला चाचणी होत आहे.
                                  नव्या दमाने तयारी करा – अपात्र उमेदवारांना आवाहन
आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यामुळे चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी निराश होता कामा नये. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवेसाठी इतक्या मोठ्या संख्येने तरूण पुढे येत आहेत, हे पाहून आमचाही ऊर अभिमानाने भरून येतो. मात्र, चाचणी व निकषांवर सगळेच पात्र ठरत नाहीत. अशावेळी हिंमत हारून चालणार नाही. देशपातळीवर व राज्यपातळीवरही अनेक सुरक्षा दले कार्यरत आहेत. अनेक संधी आहेत. नव्या दमाने पुन्हा तयारीला लागा, असे आवाहन कर्नल श्री. नेगी यांनी यावेळी केले.

दृष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक पाणीटंचाई, चाराटंचाई उपाययोजनांबाबत होणार चर्चा

             
 दृष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक
                                    पाणीटंचाई, चाराटंचाई उपाययोजनांबाबत होणार चर्चा

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पाच तालुक्यांतील 42 गावांचा दौरा केला  आहे.  त्यानुसार त्यांनी पाणीवितरण व अपेक्षित नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प डावा व उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे.  टंचाई व उपाययोजनांच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. 27) दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. 
बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत. टंचाईच्या अनुषंगाने अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणीवितरण, चाराटंचाई व अपेक्षित कार्यवाही आदी विविध विषयांवर चर्चा होईल.
            जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी  42 गावांचा पाहणी दौरा नुकताच केला.  यावेळी त्यांनी शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकरी, शेतमजूर, गावकरी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.  

Wednesday, October 24, 2018

नरभक्षक वाघाबाबत पालकमंत्र्यांकडून वनमंत्र्यांना पत्र नागरिकांना शांततेचे आवाहन



          अमरावती,दि 24 : - अमरावती जिल्हृयातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीरचे रहिवासी शेतकरी राजेंद्र निमकर यांना आणि अंजनसिंगी येथील शेतमजूर मोरेश्वर वाळके हे नरभक्षक वाघाने केलेल्या  हल्ल्यात ठार झाले.संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीखाली असून या वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कार्यवाहीसाठी जिल्हृयाचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. त्याचप्रमाणे, हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
          पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी ही गंभीर परिस्थिती वनमंत्र्यांना पत्र देऊन अवगत करुन दिली व नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजनेची  मागणी केली आहे.
          या वाघाने आतापर्यंत अनेक पाळीव प्राणी व जनावरेही फस्त्‍ केली आहेत. नरभक्षक वाघाच्या हल्ल्याच्या  भितीपोटी शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसून धामनगाव व तिवसा तालुक्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे तात्काळ ही समस्या सोडविण्या

Tuesday, October 23, 2018

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रशिक्षण अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी ‘जीवसंजीवनी’ प्रशिक्षण उपयुक्त - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 23 : हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ‘जीवसंजीवनी’ क्रियेबाबत मंत्रालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य भारतीय भूलतज्ज्ञ संघटना यांच्या मार्फत आज कार्यक्रम घेण्यात आला. त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही क्रिया महत्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
हृदयविकार रुग्णांसाठी ‘जीवसंजीवनी क्रिया’ जीवनदायी - आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आपण योगदान दिले आहे याचे समाधान खूप मोठे असते. जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने एखादा व्यक्ती आपल्या समोर कोसळतो तेव्हा आपण मदतीसाठी १०८ क्रमांक रुग्णवाहिकेशी संपर्क साधतो किंवा गोंधळून जातो. तर अशावेळी गोंधळून न जाता प्रथोमोपचार म्हणून १ ते ३० आकडे मोजताना सदर रुग्णाच्या छातीवर दाब देत राहिल्यास त्याच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होऊन पुढील उपचार मिळेपर्यंत त्याचे प्राण वाचविणे शक्य होते.
हृदय हे एक पंप आहे व त्याचे कार्य दबावाने होते. हृदय विकाराचा झटका आलेल्यांचे प्राण वाचविण्यास आपण नक्कीच यशस्वी होवू. जिल्हा परिषद तसेच पोलिसदल यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हे प्रशिक्षण संपूर्ण राज्यात तसेच सर्व शाळांमध्ये राबविल्यास त्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीस होवू शकतो, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षणाचा बहुतांश मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
अशी आहे जीवसंजीवनी क्रिया
एखाद्या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्यावर जेव्हा तो जमिनीवर कोसळतो तेव्हा त्याला ५ सेकंदाच्या आत जीवसंजीवनी क्रिया दिल्यास त्याचे प्राण आपण वाचवू शकतो. अशा वेळी ५ सेकंदाच्या आत व्यक्तीकडून प्रतिसाद न मिळाल्यास लगेचच जीवसंजीवनी क्रिया सुरु करुन १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेस संपर्क साधावा. जीवसंजीवनी क्रिया देण्यासाठी रुग्णाच्या छातीवर हाताच्या तळव्याने १ ते ३० पर्यंत आकडे मोजून दाब देत रहावे व रुग्णवाहिका येईपर्यंत ही क्रिया सतत सुरु ठेवावी. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो व त्याचे प्राण वाचविणे शक्य होते.

मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम मोहिमेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे - अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी



अमरावती, दि. 23 : नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे., आता शासनाने हाती घेतलेली मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम अत्यंत महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज येथे दिले.
मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. परदेशी म्हणाले की, ही मोहिम शाळांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुलामुलींपर्यंत पोहोचून त्यांचे लसीकरण झाले पाहिजे. अंगणवाड्यांत, शाळांत पालकसभा घेण्यात याव्यात. लसीकरणाबाबत पालकांमध्ये जनजागृती करावी. आदिवासी क्षेत्रात, दुर्गम परिसरात पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत.  एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहता कामा नये.  मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळवावे, असेही ते म्हणाले.
मोहिमेबाबत प्रशिक्षण, जनजागृतीसाठी प्रत्येक रूग्णालयात फलक, रॅली, मेळावे, प्रसिद्धी आदी नियोजन या बैठकीत करण्यात आले.
         

Monday, October 22, 2018

भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय - राष्ट्रपती राम नाथ कोविंद



नाशिक, दि. 22 : अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला आहे. जगातील सद्यस्थिती पाहता त्यांचा अहिंसेचा संदेश आजही प्रासंगिक आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले.
सटाणा तालुक्यातील भिलवाड (मांगीतुंगी) येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता कोविंद, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार राजेंद्र पाटणी, गणिनी प्रमुख आर्यिकाज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी,  मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती म्हणाले, मानवी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जैन धर्माचे अधिष्ठान‘अहिंसा परमो धर्मा:’ हा संदेश आहे. तीर्थंकरांनी सम्यक  ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक आचरणाचा संदेश दिलेला आहे. अहिंसा केवळ मानवाप्रती अभिप्रत नसून मन, वचन आणि आचरणाने अहिंसा तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. केवळ मानवाप्रती संवेदनशील आणि सहिष्णू न राहता पशुपक्ष्यांप्रती, प्रकृतीच्याप्रती सहिष्णुता बाळगण्याचा ऋषभदेवांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजही तेवढाच उपयुक्त आहे, असे ते म्हणाले.
भगवान ऋषभदेव यांची या परिसरात साकारण्यात आलेली भव्य अशी मूर्ती आपल्यासाठी निश्चितच अहिंसा धर्माचे महत्त्व प्रतिपादीत करणारी आहे. त्यामुळे आपणही अहिंसेच्या तत्वाचं पालन करीत आपले आचरण उंचवावे, असे सांगून राष्ट्रपती कोविंद म्हणाले, नदी, सरोवर अस्वच्छ करणे म्हणजे हिंसेचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता पाळली पाहिजे.
भगवान महावीरांनी अपरिग्रह तत्वाला महत्त्व दिले आहे. आज निसर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. हे तत्व आचरताना प्रकृती प्रती सम्यक व्यवहार करावा लागेल.निसर्गनिर्मित साधनस्रोतांचासंतुलितपणे वापर केला पाहिजे. या साधनांचा अतिवापर केल्यास प्रकृतीचा आणि परिणामत: मानवी जीवनाचाऱ्हास होईल. अहिंसा आणि करुणेचा संदेश यासाठी उपयुक्त ठरेल. केंद्र सरकारनेदेखील या तत्वाला अनुसरून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र संतांची आणि महापुरुषांची भूमी असून राज्याने सामाजिक समरसतेचा संदेश देशाला दिला आहे. राज्य शासनाने जनकल्याणाच्या भूमीकेतून गेल्या चार वर्षात चांगली कामगिरी केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. नाशिक ही पावन भूमी असून धार्मिक पर्यटनासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,भगवान ऋषभदेव हे आदर्श शासक होते. करुणा आणि अहिंसेचा मंत्र त्यांनी दिला. जगाला कल्याणकारी मुल्यांना समर्पित करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. मानवी कल्याण, शांतता, बंधूभाव आदींची मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या 108 फुटाच्या अतिभव्य मूर्तीच्या दर्शनाने  मूल्यविचारांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
तीर्थंकरांनी केवळ मानवाप्रती हिंसेचा विचार मांडला नाही तर यात प्रकृतीचादेखील समावेश होता. आज पर्यावरण बदलाचे आव्हान समोर असताना त्यांची ही शिकवण पुढे नेण्याची गरज आहे. ‘तेन तक्तेन भुंजित:’ हा विचार आपण विसरत आहोत.  प्रकृतीचा ऱ्हास थांबविला नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. निसर्गाशी सहचर्य राखत जगण्याचा तीर्थंकरांचा संदेश विश्वशांती संमेलनाच्या निमित्ताने जगभर पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मांगीतुंगी परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना ते म्हणाले, या परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने नियोजन केले असून विविध कामांना मंजूरी देण्यात आली आहे. आतापर्यंत 55 कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत.उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील.
दुष्काळसदृष परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना कऱण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील परिस्थितीचा मुकाबला कऱण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केंद्र शासन करेल, असे सांगितले आहे. यासंदर्भातील 179 तालुक्यातील टंचाईसदृश्य जाहीर करण्याबाबत शासन आदेश लवकरच काढण्यात येईल.  त्यानुसार 9 प्रकारच्या सवलती दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की, प्रेम, दया, करुणा, सहकार्य, बंधुभावाची शिकवण भगवान ऋषभदेवांच्या विचारातून मिळते. भगवान ऋषभदेवांची मूर्ती या परिसरातील महत्वपूर्ण वारसा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
विश्वशांतीसाठी जैनधर्मियांचा अहिंसेचा विचार आवश्यक आहे. विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या माध्यमातून अहिंसा आणि शांततेचा संदेश  सर्वत्र पोहोचेल, असा विश्वास गणिनी श्री ज्ञानमतीजी यांनी व्यक्त केला. सर्व जगाच्या कल्याणाची भावना मनामनांत निर्माण व्हावी, हे ऋषभदेवांचे विचार जगभर पोहोचावेत म्हणून ऋषभदेव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.
मूर्ति निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी यांनी मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर विद्यापीठाला भगवान ऋषभदेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू सुरेश जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला.राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रपती महोदयांना ग्रंथाची पहिली प्रत भेट देण्यात आली.
प्रास्ताविकात श्री चंदनामतीजी यांनी, अहिंसा जगाला संदेश देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. लोकशाही मूल्य, अहिंसा, दया, करुणा,आध्यात्म हा भारताने जगाला दिलेला ठेवा आहे, असे त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे ओझर विमानतळ येथे राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळीकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे आदी उपस्थित होते.

वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका होणार सहभागी

‘



केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे. देशभरातील 500 महिला उद्योजिका या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.
सेंद्रीय शेती करणा-या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळयाचे आयोजन मागील चार वर्षापासून करण्यात येत आहे. महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.
महाराष्ट्रामधून नंदुरबार(4), जळगाव(4), नागपूर(2), भंडारा(1), अमरावती(2), यवतमाळ(4), औरंगाबाद(1), हिंगोली(1), बीड (1), मुंबईतून (4) महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत. यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसियेशन ऑफ ऑरगॉनिक फारमर्स यांचाही सहभाग असणार आहे.
महाराष्ट्रामधून येणा-या महिला उद्योजक प्रदर्शानामध्ये डाळी, हळद, मसाले, औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपांरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, अचार, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू अंबाडी, फुले, गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालीश तेल, हॉन्डवॉश, असे विविध वस्तु तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केले जाणार आहेत. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत असणार आहे.

ऐकालयाच हवं अमरावती जिल्हा माहिती कार्यालय प्रस्तुत संवादपर्व


दुष्काळ परिस्थितीबाबत पाहणीसाठी पालकमंत्र्यांचा जिल्हाभर दौरा दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील





-           

          अमरावती, दि. 21:   अमरावती जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी दौरा करत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज सांगितले.
 जिल्ह्यातील तिवसा,अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तसेच चिखलदरा तालुक्यातील आडनदी, मडकी, बोरी, सलोना, लिनझरा गावात व  प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन दुष्काळग्रस्त भागांची पाहणी पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी केली.
          दौ-यादरम्यान पालकमंत्र्यांनी शेतकरी, शेतमजूर, गावकरी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. दि. 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांना दिले आहेत.
           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करू असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरु आहे, असेही ते म्हणाले.
00000

Saturday, October 20, 2018

दिलखुलास कार्यक्रमात ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथातील श्राव्य लेख


मुंबई, दि.20 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात    महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या ग्रंथातील श्राव्य लेख आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.22 आणि मंगळवार दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती पुनम चांदोरकर यांनी निवेदन केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘युगपुरुषाचा आदर्श’ या लेखात महात्मा गांधीजींच्या विचारातून मिळणाऱ्या प्रेरणेबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र बेडेकर यांनी  या लेखाचे वाचन केले आहे.

वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नगर निर्मितीसाठी योगदान द्यावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



        पुणे, दि. 20 : मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबध्द विकास होणे गरजेचे आहे. सध्या तापमानवाढीचं मोठ संकट आपल्यासमोर आहे. यासाठी वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुन, उत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            सतीश मिसाळ एज्युकेशन फाऊंडेशनच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, उंड्री या संस्थेचा पहिला पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त आमदार माधुरी मिसाळ, कार्यकारी संचालक पूजा मिसाळ, दीपक मिसाळ, प्राचार्या पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.
           कार्यक्रमात ‘थेसीस कॅटलॉग’चे प्रकाशन श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
                पदवी संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले, इतक्या कमी वेळेत आणि कमी काळात ब्रिक एज्युकेशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले नाव कमाविले आहे, हे कौतुकास्पद आहे.
 नगर नियोजनात शाश्वत विकासाचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, जगातलं सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र भारतात तयार झालं आहे. हडाप्पा आणि मोहंजोदडोसारखी सुनियोजित शहरे ही प्राचीन काळातील उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राची उदाहरणे आहेत. सध्या नगररचना नियोजनाची पर्यायाने अधिक नगररचनाकारांची आवश्यकता आहे. देशाची निर्मिती व बांधणीमध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे व दर्जेदार मानव संसाधन निर्माण करावे.
            एकविसावे शतक सर्वोत्तम गुणवत्तेचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य दर्जाचे न राहता अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन समाजाला उत्कृष्ट सेवा पुरवावी. देशाचा विकास झपाटयाने होत असतांना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानरुपी अश्वावर स्वार होणे आवश्यक आहे, असे सांगितले. आपल्याला समाजाकडून जे मिळते, ते समाजाचं देणं असतं. आपल्या कार्यकर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी समाजाला परत देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.
            महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, संस्थेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तरुणांनी नवनवी आव्हानं पेलून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आव्हानांना सामोरं जाताना अपयश आलं तरीही विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने यशस्वी वाटचाल करावी. आर्किटेक्टचे विद्यार्थी म्हणजे नवनव्या संकल्पना मांडून त्या साकार करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी असतात. आपल्या संकल्पना मूर्त स्वरुपात आणून देशाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
            प्रास्ताविकातून पूजा मिसाळ यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य पूर्वा केसकर यांनी आभार मानले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार संजय भेगडे, आमदार योगेश टिळेकर तसेच लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Tuesday, October 16, 2018

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ
ऊर्जा विभागाच्या लोकाभिमुख, लोकहिताच्या
तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा भव्य शुभारंभ
                                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
      मुंबई, दि. 16 : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या, लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
            ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स व शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या तीन अभिनव योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
            या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकात पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
            ऊर्जा विभागाचे गेल्या चार वर्षात अत्यंत चांगले कार्य सुरु असून शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्यांना उपयुक्त असे निर्णय विभागामार्फत घेतले जात आहेत.आज उद्‌घाटन झालेल्या तीनही योजना या महत्त्वपूर्ण असून पर्यावरणपुरक अशा आहेत. या सर्व योजनांमुळे येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांना दिवसा वीज देणे शक्य होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत 1 लाख सौर पंपांना मान्यता दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शेतकरी केंद्रीत अशा या योजना असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्की होईल.
            विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास निश्चितच वाचेल, तसेच इंधनाचा भार देखील कमी होईल. मोटर वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेट्रिकल वाहन तयार करीत आहेत. त्यामुळे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला चांगली मागणी आहे. राज्यातील विद्युत अभियंता, पदविकाधारक तसेच आयटीआयच्या युवकांना ही विद्युत स्टेशन देण्याबाबतचा निर्णय देखील महत्वाचा आहे. रोजगाराची मोठी संधी यातून मिळणार आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक विद्युत निर्माण करण्याची क्षमता असलेले आपले राज्य आहे, असे सांगून त्यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.
मागेल त्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी-चंद्रशेखर बावनकुळे
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभिनव अशा योजनेचे उद्‌घाटन संपन्न होताना आनंद व अभिमान वाटत आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन परिवर्तन झाले पाहिजे हा ध्यास घेऊन ऊर्जा विभाग आपल्या योजना राबवित आहे. निती आयोगाने कौतुक केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना असून अशा प्रकारची ही देशातील पहिली योजना आहे. राज्यातील जो शेतकरी बांधव ही योजना मागेल त्याला दिली जाईल असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
            पुढे बोलताना श्री.बावनकुळे म्हणाले, या सौर वाहिनीमुळे महत्त्वाचे असे फायदे होऊ शकतात. यामध्ये विद्युत खर्च, विद्युत पुरविणे खर्च यात मोठी बचत होत आहे. विभागाने 5 लाख 18 हजार वीज कनेक्शन दिली असून उर्वरित दोन अडीच लाख लोकांना देखील जून 2019 अखेर कनेक्शन्स दिले जातील. आयटीआय धारक विद्युत पदविकाधारक आयटीआयच्या 23 हजार मुलांना मार्च 2019 पर्यंत विविध गावांमध्ये ग्राम मॅनेजर म्हणून काम मिळेल. प्रती विद्युत कनेक्शन 9 रुपये प्रमाणे त्यांना देखभाल दुरुस्ती खर्च दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजनांचा लाभ मिळेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
           ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकातून संजीव कुमार यांनी या तीनही अभिनव योजनांची सविस्तर माहिती दिली. तद्‌नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनांचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.
            या कार्यक्रमास लोकप्रतीनिधी, तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यंने उपस्थित होते.

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...