Monday, August 30, 2021

नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 









नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 30 : आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी निरोगी आयुष्याला प्राधान्य द्यावे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरात तपासणी करून आरोग्यविषयक समस्या सोडवाव्यात. असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेतील नेरपिंगळाई येथील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी नेरपिंगळाईच्या सरपंच सविता खोडस्कर, उपसरपंच मंगेश अडणे, मोर्शीचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ. सुषमा शेंदरे, दर्यापूर विशेष प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, सहायक अभियंता प्रशांत सोळंके उपस्थित होते.

तिवसा येथील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

तिवसा येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील आरोग्य तपासणी  शिबिराचे उद्घाटन श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तहसिलदार वैभव फरतारे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, कार्यकारी अभियंता विकास गिरी उपस्थित होते.

नेरपिंगळाई आणि तिवसा येथील आरोग्य तपासणी शिबिरात सर्वसामान्य तपासणी, महिलांचे आजार आणि कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. नागरिक तपासणी शिबिरात तपासणी करून पुढील योग्य उपचार घेऊ शकतील.

00000

 

 

 

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर













डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि 30 : डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे  आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आज डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते.

       प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे आणि चाचणीसाठी लागणाऱ्या किटची  माहिती श्रीमती ठाकूर यांनी जाणून घेतली. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली असून अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तंत्रज्ञाच्या मदतीने चाचणी अहवाल तात्काळ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000 

Saturday, August 28, 2021

जलद लसीकरणासाठी वेगवान प्रक्रिया आवश्यक; दैनिक क्षमता वाढवा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर






                                  पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

 जलद लसीकरणासाठी वेगवान प्रक्रिया आवश्यक; दैनिक क्षमता वाढवा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण, तिस-या लाटेची संभाव्यता आदी बाबी लक्षात घेऊन यंत्रणा सुसज्ज करतानाच अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. जलद लसीकरणासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन लसीकरणाची दैनिक क्षमता वाढविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी यावेळी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. तथापि,

लसीकरणाचा विस्तार करणेही गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ मिळवून प्रतिदिन क्षमता वाढवावी. जिल्ह्यात पहिल्या डोसचे 34 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेचा वेग वाढविणे आवश्यक आहे. कोविडबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मात्र, गाफील राहून चालणार नाही. औषधे, खाटा, ऑक्सिजन सुविधा आदी यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमपालनाबाबत सातत्याने जनजागृती करावी.  

 

            अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयांतील अपेक्षित कामांसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईत मंत्रालय स्तरावर बैठक घेतली जाईल. स्त्री रूग्णालयाच्या कामालाही वेग द्यावा. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत. संभाव्य साथीच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रे खाटा, औषधे, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व इतर यंत्रणेसह सुसज्ज ठेवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

            डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, आवश्यक उपचार व इतर बाबींचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

                                    000

संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




                 प्राचीन वैभवाच्या जतन- संवर्धनासाठी तरतूद

                  संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 28 : प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. त्याअंतर्गत लासूर येथील शिवमंदिर या प्राचीन वैभवाचे जतन व संवर्धन केले जाणार असून, पर्यटन विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन या प्राचीन स्थळाचा विकास केला जाईल. या सर्व कामांसाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया व इतर बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

             पर्यटन व विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार योगेश देशमुख,  पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहायक हेमंत हुकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पौराणिक महत्ता लाभलेल्या स्थळाचा वारसा जपणे आवश्यक आहे. लासूर येथील शिवमंदिराचे जतन, देखभाल आणि विकासासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंदिराचे प्राचीन रूप व पावित्र्य जपताना पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा उभाराव्यात. लासूर येथे पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. पौराणिक वारश्याच्या जपणुकीसह नागरी सुविधा निर्माण केल्याने रोजगार वाढून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

या सर्व विकासकामांसाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया व इतर बाबींची पूर्तता करून घ्यावी. त्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील कौंडण्यपूर, मोझरी, वलगाव येथील विकास आराखड्यातही विविध कामे अपेक्षित असून, त्यासाठी निधीही देण्यात येईल. ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

000

तिवसा नगरपंचायत प्रलंबित घरकुल निधी मंजूर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा




 तिवसा नगरपंचायत प्रलंबित घरकुल निधी मंजूर

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 

   - लवकरच निधी होणार प्राप्त

- 482 घरकुलांचा प्रकल्प अहवालही मंजूर

 

अमरावती, दि. 28 : तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलांसाठीचा प्रलंबित निधी मिळण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, लवकरच तो प्राप्त होऊन कामांना गती मिळेल. त्याचप्रमाणे,  ४८२ नवीन घरकुलांचा प्रकल्प अहवाल सुद्धा मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही कामेही मार्गी लागतील.

 

 

तिवसा नगर पंचायत येथील पहिल्या प्रकल्प अहवालातील ९८ घरकूलांचा ३ आणि ४ था हप्ता गेल्या ८ महिन्यापासून प्रलंबित होता. पहिले दोन हप्ते वितरीत झाले होते. उर्वरित हप्ते बाकी असल्याने लाभार्थ्यांपुढे अडचण निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, तसेच म्हाडा प्रशासनाला पत्रही दिले, तसेच अधिका-यांशी चर्चा करून तत्काळ उर्वरित हप्त्याचा निधी देण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनीही म्हाडा अधिका-यांशी भेट घेऊन निवेदन केले. त्यानुसार निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, घरकुलाच्या कामांना गती येणार आहे.

 

 पहिल्या ९८ घरकुलांचा उर्वरित ५८ लक्ष ८० हजार रु.निधी येत्या तीन दिवसांत नगर पंचायतीकडे जमा होणार आहे. त्याबाबतचा निधी वितरण आदेश काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, 482 घरकुलांच्या प्रकल्प अहवालाला मान्यता मिळाली असून, अनुज्ञेय निवारा निधीतुन निधी वितरित करण्याबाबत आदेश जारी झाले आहेत.

000

 

घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तत्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तत्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तत्काळ द्यावेत. निधीअभावी ही कामे थांबता कामा नयेत. आपण स्वतः याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

 

नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, नगरविकास प्रशासन अधिकारी गीता वंजारी आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध शहरांत आवास योजनेत शासकीय जमीनीवरील 2 हजार 555 अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. नगरपंचायतींच्या क्षेत्रातही हे काम पूर्ण व्हावे. आवास योजनेची कामे पूर्ण होण्यासाठी वेळेत प्रस्ताव, निधीसाठी पाठपुरावा नियमित होणे गरजेचे आहे. याबाबत सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची बैठक मुंबईत मंत्रालय स्तरावर घेतली जाईल.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेत नगरपरिषदांनी वेळेत प्रस्ताव द्यावेत. अग्निशमन बळकटीकरणात अपेक्षित कामे गतीने पूर्ण करावीत. पर्यटन अनुदान, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींचाही आढावा त्यांनी घेतला.

डेंग्यू नियंत्रणासाठी सर्व शहरांत धूर फवारणी, घरोघरी सर्वेक्षण आदी उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

                        000 

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर





 कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार

 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

▪  काळजी नको; आता येणार 'शासन आपल्या दारी'

▪ अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज   

▪ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार

▪ सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या

▪ कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार

          मुंबई, दि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

घरी जाऊन घेण्यात येणार योजनांचे अर्ज

          या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी  क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ  बालकांच्या  कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची  माहिती देतील. तसेच विविध  योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे  सादर करतील.

          या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार हे असून तालुका शिक्षण अधिकारी, तालुका विधी  सेवा प्राधिकरण, नगरपारिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक/ पोलीस निरिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (समाज कल्याण), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यात उपयोजनेचे प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांच्या पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी हे सदस्य तर बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ शहरी) हे सदस्य सचिव असणार आहेत.

          यामध्ये कुटुंब निवृत्तीवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, शुभ मंगल सामुहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.

          याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क  यासंबंधीची कामे तसेच महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधित राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

          राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक कोरोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला.

००००


महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशनमोड'वर पूर्ण करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 















केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी

महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशनमोड'वर पूर्ण करा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. २८ : येथील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल पेस्टिसाईड अँड केमिकल्स या फॅक्टरीला काल मध्यरात्रीनंतर आग लागली. ही फॅक्टरी ऑक्सिजन प्लँटच्या बाजूला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशन मोड'वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

          जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

          उद्योग, कारखाने, इमारती यांचे फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. ती कार्यवाही मोहिम स्तरावर तत्काळ पूर्ण करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महत्वाच्या इमारतीचे फायर ऑडिट पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

          आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेचे ६ व इतर शहरातील ५ असे एकूण ११ अग्निशमन वाहने व दलांकडून आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

०००

Friday, August 27, 2021

कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 












                         फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी

कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत

                                               -         जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 27 : संत्रा फळपीक जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. संत्र्याची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे व फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी चमू तयार करून गावे दत्तक घ्यावीत व शेतक-यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज अचलपूर येथे केले.  

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी संशोधन केंद्रातर्फे अचलपूर येथे संत्रा फळगळ नियंत्रण व बीजोत्पादन कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.

  राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक गटांना मार्गदर्शन करावे. या प्रक्रियेत सातत्य ठेवावे जेणेकरून शास्त्रीय उपाययोजनांतून संत्रा फळगळ नियंत्रित करता येईल. शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीसंबंधी समस्या कृषी शास्त्रज्ञ, संशोधक किंवा कृषी अधिकारी यांच्यासमक्ष मांडाव्या. तज्ज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास संत्रा उत्पादन वाढीस चालना मिळेल. एखाद्या परिसरात पीक रोगाच्या संक्रमणाची माहिती मिळताच कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुचवितानाच इतर ठिकाणीही माहिती प्रसारित केली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले.

श्री. भाले म्हणाले, पिकांचे नियोजन, खतांचे व्यवस्थापन या तांत्रिक बाबींची माहिती संत्रा उत्पादकांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन व जनजागृतीसाठी यापुढेही तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबविण्यात येईल. श्री. गाडे, श्री. वानखडे यांचीही भाषणे झाली. संत्रा फळगळ रोखण्यासाठी मार्गदर्शनपर  घडीपत्रिकेचे व केळी लागवडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती  पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.

00000000

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...