Tuesday, November 19, 2019

निवडणूक खर्चाचा ताळमेळ अचूकपणे नोंदवा - निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी






अमरावती, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवारांची खर्चाची तपासणी व ताळमेळ प्रक्रिया सुरु आहे. हा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असून उमेदवारांनी सादर केलेला खर्च व खर्च तपासणी चमू या दोघांच्याही खर्चाच्या आकडेवारीत तफावत आढळल्यास त्याविषयी सुस्पष्ट माहिती घेऊन नेमका अचूक खर्च नोंदवावा, असे निर्देश निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च ताळमेळासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक जॉर्ज जोसेफ, नवनीतकुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, खर्च तपासणी पथकाचे नोडल ऑफीसर तथा डेप्युटी कॅफो दत्तात्रय फिस्के तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. बंडी म्हणाले की, निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आज तारखेपर्यंत निवडणूक खर्च शॅडो रजिस्टरमध्ये नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे. रजिस्टरनुसार उमेदवारांनी दाखविलेल्या खर्च आणि खर्च तपासणी पथक यांचा खर्च या दोघांमध्ये तफावत आढळून आल्यास सबंधित सहायक खर्च निरीक्षकांनी दिवसनिहाय खर्चाची तपासणी करुन ताळमेळ करावा. ताळमेळ करताना जो खर्च अधिक असेल तो ग्राह्य धरुन निवडणूक आयोगाला सादर करावा. तसेच ज्या उमेदवारांकडून खर्चाचे शॅडो रजिस्टर सादर केले जाणार नाही त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यत: वस्तुंचे दर व त्याचे प्रमाण या बाबीमध्ये फरक आढळून येत असल्यास आयोगाकडून ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार दर ग्राह्य धरुन खर्च नोंदवावा. तपासणीअंती ज्या उमेदवारांना ग्राह्य खर्चाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी योग्य पुराव्यानिशी स्पष्टीकरणासह उद्या (20 नोव्हेंबर ) होणाऱ्या जिल्हा खर्च देखरेख समितीच्या बैठकीत हजर राहण्याचे सूचना द्यावी. ज्या उमेदवारांना निवडणूक खर्च मान्य असेल त्यांचे खर्चाचे रजिस्टर फॉर्म-सी व फॉर्म-बी ईत्यादी कागदपत्रासह जिल्हा खर्च देखरेख समितीला सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.
  ज्या मतदारसंघात निवडणूक खर्च संदर्भात काही विवाद असल्यास उमेदवारांनी योग्य स्पष्टीकरण जिल्हा खर्च देखरेख समितीसमोर मांडावे. प्रत्येक उमेदवाराचा दिननिहाय खर्चाचा ताळमेळ करावा, तसेच खर्चात काही तफावत किंवा विसंगती आढळून आल्यास खर्चाच्या सिध्दतेसाठी विहित पुरावे समितीला सादर करावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिल्या.
बैठकीत निवडणूक निरीक्षक जार्ज जोसेफ व नवनीतकुमार यांनी सुध्दा निवडणूक खर्च नोंदणी प्रक्रिया याविषयी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...