Tuesday, January 14, 2025

DIO NEWS AMRAVATI 14.1.2025

 




 

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची कुटुंबियांना भेट

 

अमरावती, दि. 14 (जिमाका) :  चांदूररेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी त्याच्या कुटुंबियांना भेट दिली. नितेश मेश्राम याच्या मृत्यू प्रकरणी आयोग सखोल चौकशी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी कुटुंबियांना दिली.

 

श्री. मेश्राम यांनी सोमवार, दि. 13 जानेवारी रोजी मेश्राम कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांनी नितेशची आई वंदना मेश्राम यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. नितेशच्या मृत्यूप्रकरणी वंदना मेश्राम यांनी गेल्या नऊ वर्षांपासूनचा संपूर्ण घटनाक्रम उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्यासमोर मांडला. याप्रकरणी आयोग सखोल चौकशी करणार आहे. यासाठी पोलिस ठाण्यातील दस्तावेज, सीसीटीव्ही फुटेज, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तपासाची कागदपत्रे, तसेच नितेश मेश्राम याच्या मृत्यूशी संबंधित पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे मागविण्यात येणार आहे, असे श्री. मेश्राम यांनी सांगितले.

 

या प्रकरणी सत्यता समोर येण्यासाठी घटनेच्यावेळी पोलिस ठाण्यात असलेले अधिकारी, कर्मचारी आणि रूग्णालयात दाखल करतेवेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर, कर्मचारी यांचेही बयाण घेण्यात येणार आहे. नितेश मृत्यू प्रकरणी आयोगातर्फे सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आयोगाच्या कार्यवाहीबाबत कुटुंबियांना सर्व माहिती पुरविली जाईल. याबाबत कुटुंबियांना आश्वस्त केले. सदर प्रकरणात पोलिस विभागातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतही श्री. मेश्राम यांनी माहिती जाणून घेतली.

 

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, पोलिस विभागाचे अधिकारी, तपास करणारे अधिकारी उपस्थित होते

 

00000

 

 

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 14 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.

 

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

00000

 

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या

पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार

                                -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*एआय तंत्राचाही वापर

*नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर

 

अमरावती, दि. 14 (जिमाका) : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

 

प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राच्या विविध पैलू दर्शवणारे  कॉफीटेबल बूक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी व माहिती पोहचविण्यासाठी एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

राज्यस्तरावर संदर्भ कक्ष

 

शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व ईलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मिडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

- एआयच्या प्रभावी वापरावर भर

- माहिती जलदगतीने पोचविण्यासाठी यंत्रणा

- महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर

- सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार

- सोशल मिडियाचा प्रभावी वापर वाढविणार

- एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष

 

00000

 

 

 

महारेशीम अभियानाला आजपासून सुरुवात

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशीम रथाला हिरवी झेंडी

 

अमरावती दि. १४ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी दाखवून महारेशीम अभियान-2025 चे उद्घाटन करण्यात आले.  तुती रेशीम उद्योग, रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती हवी तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी नोंदणी करता यावी, यासाठी रेशीमरथ जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात फिरणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील 78 गावात रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी मोहीम तसेच नवीन गावे व शेतकरी निवड व नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

 तुती रेशीम उद्योग हा शेतीला उत्तम जोडधंदा आहे. जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे महत्त्व जाणून  तुती रेशीम उद्योग करण्यावर भर द्यावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री . कटियार यांनी यावेळी केले. रेशीम विकास अधिकारी  श्रीमती डी. नागोलकर  यांनी रेशीम शेतीविषयी यावेळी सविस्तर माहिती दिली.  जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ क्षेत्र सहायक एस.भोयर, क्षेत्र सहायक श्रीमती पी. शेंडे, श्रीमती एस. देठे आदी यावेळी उपस्थित होते.


00000

 

 


No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...