Monday, October 12, 2026

DIO NEWS AMRAVATI 12.10.2026

                                 अमरावती जिल्ह्यात बाहेरील पशुधनाला चराईसाठी बंदी

 

चारा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत केला आदेश

 

अमरावती, दि.12 (जिमाका) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पशुधनासाठी चारा सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार,अमरावती जिल्ह्याच्या बाहेरील कोणत्याही जिल्ह्यातील अथवा इतर राज्यातील शेळ्या ,मेंढ्या,गायी,म्हशी आदी पशुधनास अमरावती जिल्ह्यात चराईसाठी आणण्यास तातडीने संपूर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

 यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ८ लाख ४७ हजार १३८ पशुधन आहे. खरीप पेरा आणि पशुसंवर्धन विभागाकडून होणारे वैरण वाटप, तसेच वन विभागाकडून मिळणारा चारा पाहता, हा चारा जिल्ह्यातील स्थानिक जनावरांना केवळ जानेवारी २०२७ पर्यंतच पुरण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता पशुधनासाठी चारा सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी श्री.येरेकर यांनी आदेश निर्गमीत केला असून  ६ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात हा आदेश लागू राहणार आहे.

 

चारा टंचाई लक्षात घेता बाहेरील कोणत्याही जिल्ह्यातील अथवा इतर राज्यातील पशुधनास विशेषतः धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील वनक्षेत्र व गायरान जमिनीवर बाहेरील जनावरांना चराईसाठी आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून बाहेरील पशुधन अमरावती जिल्ह्यात चराईसाठी आणल्यास, संबंधित पशुपालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

०००००



दुष्काळ निवारणाची कामे समन्वयाने करावीत

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि.12 (जिमाका) : राज्यातील अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून प्रभावीत झाला आहे. जलसाठ्यातील पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे येत्या काळात विविध समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दुष्काळ निवारणाची कामे समन्वयाने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणासंदर्भात चांदूरबाजार, धारणी आणि चिखलदरा तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, उपलब्ध पाणीसाठी हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणावयाचा आहे. यासाठी जिल्हास्तरावरून आदेश देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना कोणतीही अडचण येणार नाही. आवश्यकता भासल्यास टंचाईच्या क्षेत्रात बोअरवेल घेण्यासही परवानगी देण्यात येईल. चांदूरबाजार तालुक्यात सध्यास्थितीमध्ये पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तरीही या पाण्याचा योग्य विनियोग होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावी.

 

येत्या काळात चाऱ्याची समस्या जाणवू नये, यासाठी आतापासूनच चाऱ्याची तयारी करणे आवश्यक आहे. गाळपेर जमिनींवर चारा लागवडीचे नियोजन करावे. यासाठी पशूसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी सहकार्य करावे. व्हीबी जी-राम-जीमधून कुशल कामात चारा लागवडीची कामे प्रस्तावित करण्यात यावी. धारणी आणि चिखलदरा परिसरात वन जमिनी असल्याने याठिकाणी चाऱ्याची लागवड करण्याची शक्यता पडताळून पहावी. तसेच आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांनाही चारा लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारसांशी संपर्क साधून प्रयत्न करण्यात यावे. यासाठी पाठपूरावा करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी क्षेत्रिय स्तरावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

0000000

इंडिया स्किल्स स्पर्धेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

*१९ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

 

अमरावती, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ यांच्या वतीने 'इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवून आता दि.१९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

 

इंडिया कौशल्य स्पर्धा २०२६-२७ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सामान्य ५६ क्षेत्रे यात वैयक्तिक सहभागासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. विशेष क्षेत्रे ऑटोनोमस मोबाइल रोबोटिक्स, काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क, लँडस्केप गार्डेनिंग याकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००६ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मॅकॅट्रोनिक्स, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या लिंकवर नावनोंदणी प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

अंजनगाव बारी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू

 

अमरावती, दि.12 (जिमाका): अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणारे अंजनगाव बारी (बडनेरा) येथील स्वयंचलित वाहन चालन चाचणी पथ (एटीएस सेंटर) सोमवार १२ ऑक्टोबर पासून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

 

वाहन धारकांना नूतनीकरणासाठी services.parivahan.gov.in/AFMS/#/atscenter या संकेतस्थळावर ऑनलाईन तारीख आणि वेळ राखीव करावी लागेल. वाहनाला हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवलेली असल्याशिवाय ऑनलाईन स्लॉट बुक करता येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

०००००

जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा

३०० खेळाडूंचा सहभाग

 

अमरावती, दि. १२ (जिमाका): येथील तपोवन चौकातील जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने १७ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेला मंगळवार १३ ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. १५ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

 

या स्पर्धेत अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या ८ विभागांतील एकूण ३०० मुले व मुली सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी पंच, तांत्रिक अधिकारी आणि व्यवस्थापक अमरावतीत दाखल झाले आहेत. सर्व सामने हे सकाळ व दुपारच्या सत्रात खेळवले जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. मुलांची राहण्याची सोय श्री. गुरुदेव प्रार्थना मंदिर, नागपूर रोड येथे, तर मुलींची व्यवस्था क्रीडा प्रबोधिनी, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे करण्यात आली आहे. सर्व स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था स्पर्धा स्थळी  करण्यात आली आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आल्या आहेत.तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद काटोलकर,राजू वडते,अनिल इंगळे,सलीम शेख,संतोष विघे यांच्यासह क्रीडा अधिकारी त्रिवेणी बान्ते, वैशाली इंगळे व इतर कर्मचारी या आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

००००००

धारणी व चिखलदरा तालुक्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू

आदिवासी विकास महामंडळाचा पुढाकार

 

अमरावती, दि.12 (जिमाका) : धारणी व चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पणन हंगाम २०२६-२७ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत एफ.ए.क्यू. दर्जाचे भरडधान्य खरेदी करण्यासाठी उप प्रादेशिक कार्यालय स्तरावर एकूण ६ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आले असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे धारणी प्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी केले आहे.

 

खरेदी केंद्रांवर  शासकीय  हायब्रिड ज्वारी ३ हजार ४२० रूपये  प्रति क्विंटल दराने तर  ज्वारी मालदांडी  ३ हजार ४७३, बाजरी  २ हजार ९०० आणि मका २ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. धारणी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत  सावलीखेडा येथे खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले असून श्रीमती ए. डी. चौरे खरेदी केंद्र प्रमुख म्हणून कार्य पाहत आहेत. याच  उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत हरीसाल आणि धारणी येथे खरेदी केंद्र उभारण्यात आले असून अनुक्रमे बी. एस. पुनसे आणि एस. एस. खांडे हे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

 

            चिखलदरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत  चुरणी  येथे खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले असून ए.के.पाडवी खरेदी केंद्र प्रमुख म्हणून कार्य पाहत आहेत. याच उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत गौलखेडा बाजार आणि सेमाडोह येथे खरेदी केंद्र उभारण्यात आले असून अनुक्रमे श्रीमती पी.एस.शिरसकार आणि श्रीमती व्हि.पी.निंघोट  हे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

 

 

महामंडळातर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याची नोंदणी करण्यासाठी पीएएसएपी पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी पूर्ण करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, खरेदी केंद्रावर धान्य आणण्यापूर्वी ते व्यवस्थित रित्या वाळवून आणि स्वच्छ करून आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...