Saturday, July 9, 2022

मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

 

मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

 

अमरावती, दि.९ : मेळघाटमध्ये दुषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे  50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दुषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

दुषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

000000

Friday, July 8, 2022

वारकऱ्यांच्या वाहनांना पथकर माफी

 


वारकऱ्यांच्या वाहनांना पथकर माफी


अमरावती, दि. 8. आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्याच्या  अंमलबजावणीसाठी आवश्यक स्टीकर्स उपलब्ध करून देणे आदी बाबींचे पालन परिवहन विभाग, वाहतूक पोलीस यांनी समन्वय ठेवून त्याची काटेकोरपणे करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.   

 टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. तसे स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, आरटीओ कार्यालय यांनी समन्वय ठेवून उपलब्ध करून द्यावेत. सर्व पोलीस ठाणी, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओ कार्यालये येथे स्टीकर्स उपलब्ध असावेत.  पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दि. 7 ते दि. 15 जुलैदरम्यान ही सवलत पालख्या, भाविक व वारक-यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी दिली जाणार आहे.

00000

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी योजना मार्जिन मनी योजनेत 10 प्रस्ताव मंजुरीचे उद्दिष्ट

 

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी योजना

मार्जिन मनी योजनेत 10 प्रस्ताव मंजुरीचे उद्दिष्ट

          अमरावती, दि.8: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने ‘स्टॅन्ड अप इंडिया’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या व्यक्तींसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत किमान 10 प्रस्ताव मंजुरीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

गतवर्षी या योजनेचा जिल्ह्यात पाच व्यक्तींना लाभ मिळाला. मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे उद्योग उभारू इच्छिणा-यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीतजास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येते. नवउद्योजकांनी दहा टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित (फ्रंट एंड सबसिडी) 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते.

योजनेचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे.

00000

देगलूरच्या अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी आवाहन

 

देगलूरच्या अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी आवाहन

अमरावती, दि. 8: नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींना शासनमान्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे.

प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सी.सी.ईन., इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर टायपिंग) वेल्डर कम फॅब्रिकेटर, शिवण व कर्तन कला आणि इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षणाची सोय आहे. निवास, वैद्यकीय औषधोपचार, व प्रशिक्षण साहित्याची विनामूल्य सुविधा आहे. इच्छूकांनी दि.15 जुलैपर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरीनगर, रामपूर रस्ता, देगलूर (जि. नांदेड) येथे, तसेच मोबाईल 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.   

00000

सह दुय्यम निबंधक (ग्रामीण) कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरू राहील

 

सह दुय्यम निबंधक (ग्रामीण) कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरू राहील

 

अमरावती, दि.8 : दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गैरसोय टळावी व नोंदणीला गती यावी, यासाठी येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 (अमरावती ग्रामीण कार्यालय) शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील. 

 

नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर दस्त दाखल होत आहेत. सर्व्हर स्लो असल्यामुळे दस्तऐवज नोंदणीला वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सह दुय्यम निबंधक, अमरावती ग्रामीण कार्यालयाचा दस्त नोंदणीचा वेळ 2 तासांनी वाढविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक शनिवारी व रविवारी हे कार्यालय पुर्णपणे सुरु ठेवण्याबाबत सहजिल्हा निबंधकांनी आदेश दिले. त्यानुसार दोन्ही सुट्टीच्या दिवशी हे कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरु राहणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू राहील.

दस्त नोंदणीसाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये. त्यामुळे हा निर्णय झाला असून, नागरिकांनी आता सुट्टीच्याही दिवशी  कार्यालय सुरु राहणार असल्यामुळे सवडीने दस्तनोंदणी करावी व गर्दी टाळावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले.

 

000

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा विविध 351 पदांच्या भरतीसाठी सोमवारी रोजगार मेळावा

 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

विविध 351 पदांच्या भरतीसाठी सोमवारी रोजगार मेळावा

 

अमरावती, दि. 8: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयटीआय परिसरातील एनएसएस सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सोमवारी (11 जुलै) सकाळी 10 वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यात 351 विविध पदांसाठी मुलाखती होणार असून, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुशिक्षीत उमेदवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खासगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

यातील 201 पदे अमरावतीतील आहेत

उमेदवारांची मुलाखतीद्वारे प्राथमिक निवड होणार आहे. औरंगाबाद येथील धुत ट्रान्समिशनमध्ये ईपीपी ट्रेनी 100 पदे उपलब्ध आहेत. तिथे 18 ते 28 वयोगटातील दहावी,  बारावी, पदवीधरांना अर्ज करता येईल. अमरावतीच्या नवभारत फर्टीलायझर्समध्ये सेल्स ट्रेनीची 51 पदे असून, 18 ते 45 वयोगटातील दहावी, बारावी, पदवीधरांना अर्ज करता येईल. अमरावतीतील थिंजी एचआर सर्व्हिसेस ॲन्ड स्कील डेव्हलपमेन्ट या कंपनीतील सेव्हिंग मशिन ऑपरेटरच्या 50 पदांसाठी 18 ते 35 वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय उत्तीर्णांना अर्ज करता येईल.

दहावी अनुत्तीर्णांनाही संधी आहे

अमरावतीच्या गोल्डन फायबरमध्ये ट्रेनी ऑपरेटरची पुरूषांसाठी  50 व महिलांसाठी 50 उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्णांनाही तिथे संधी मिळेल. तिथे 20 ते 30 वयोगटातील पुरूषांना व 20 ते 28 वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल.

 

पुण्यातील टॅलेनसेतू सर्व्हिस या कंपनीत असेम्ब्ली ऑपरेटरची महिलांसाठी 30 व पुरूषांसाठी 20 पदे आहेत.  दहावी, बारावी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. या पदासाठी 18 ते 30 वयोगटातील पुरूषांना व 18 ते 28 वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करा

इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. ज्या कंपनीकडे मुलाखत द्यावयाची आहे, तिची निवड करुन ऑनलाईन माहिती भरावी. सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शेळके यांनी केले आहे.

00000

‘पूर्णा’ चे नऊ व ‘घुंगशी बॅरेज’ प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले

 ‘पूर्णा’ चे नऊ व ‘घुंगशी बॅरेज’ प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले 

विभागातील विविध प्रकल्पांत जलाशय पातळी

अमरावती दि.8 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 8 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

अहवालानुसार, पूर्णा मध्यम प्रकल्पात आज दिनांक 8 रोजी जलाशय पातळी 447.64 मी. आहे. या प्रकल्पाचे नऊ दरवाजे 10 सेमी वर उचलण्यात आले आहेत. अकोला येथील घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे वर उचलण्यात आले आहेत. या प्रकल्पात आजची जलाशय पातळी 254 मी. आहे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा (339.14), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (389.99), अरुणावती (325.67), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (342.21), वान (397.96), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (288.78), पेनटाकळी (555.10), खडकपूर्णा (516.65).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (438.10), चंद्रभागा (497.90), पूर्णा (447.64), सपन (504.10), पंढरी (424.76), गर्गा (344.20), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (303.29), सायखेडा (271.02), गोकी (312.70), वाघाडी (315.15), बोरगांव (315.75), नवरगांव (251.80), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (384.55), मोर्णा (361.70), उमा (338.80), घुंगशी बॅरेज (254), वाशिम जिल्ह्यातील अडाण (376.65), सोनल (448.60), एकबुर्जी (144), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (400.45), पलढग (398.35), मस (322.10), कोराडी (545), मन (370.10), तोरणा (402), उतावळी (365.70) आहे.   

000000


मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन              अमरावती/मुंबई दि.5 : आर्थि...