Friday, July 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.07.2026



 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 31 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. लवकरच उर्वरीत शेतकऱ्यांची यादी येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यातील पहिल्या यादीतील 76 हजार 976 शेतकऱ्यांची ई-केवायसी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज तालुकास्तरावरील सहायक निबंधक आणि बँकांचे प्रतिनिधी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी कर्जमाफीची प्रक्रिया राबविताना बँकांनी सजगपणे काम करणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेमधून प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांना दूरध्वनी करून त्यांना कर्जमाफीची माहिती देण्यात यावी. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने २ लाख रूपयांची कर्जमाफी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात यावी. कर्जमाफी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक हा महत्वाचा आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास तातडीने ही नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगावे. याकामी बँकांनी प्रयत्नपूर्वक कार्य करणे अपेक्षित आहे.

कर्जमाफीच्या अनुषंगाने येत्या शनिवार आणि रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात यावे. याकामी स्वतंत्ररित्या दोन नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्याकडून कर्जमाफीबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची सहमती घेताना त्यांना कर्जाच्या रकमेमध्ये फरक दिसत असला तरी उर्वरीत रक्कम बँक समायोजित करीत असल्याची माहिती देण्यात यावी. कर्जमाफीच्या प्रक्रियेत काही तक्रारी असल्यास त्या तात्काळ कळविण्यात याव्यात. त्यानुसार डाटामध्ये दुरूस्ती करण्यात यावी.

जिल्ह्यात अद्यापही 76 हजार 976 ई-केवायसीपैकी 43 हजार 432 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आपले सरकार केंद्र येथे शेतकऱ्यांची ही केवायसी मोफत होणार आहे. केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केल्यास केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीसाठी ई-केवायसीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

000000





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार

*सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे स्पष्टीकरण

 

अमरावती, दि. 31 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील रक्कमेत फरक दिसून येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्य शासनाने 2 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली होती. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ तडजोड योजना आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी 31 लाख 97 हजार कर्जखात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी 25 जुलै 2026 रोजी 16 लाख 16 हजार कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची 7 लाख 3 हजार आणि व्यापारी बँकांची 9लाख 13 हजार खाते आहेत.

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील थकबाकी यामध्ये फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरण्यात येईल. पोर्टलवरील थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. शासनाने 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज न आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्याला पावती देण्यात येईल. त्यात कर्जमुक्तीची रक्कम नमूद केलेली असेल. आधार प्रमाणीकरणानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीची लाभाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकामार्फत कर्ज बेबाकीचे प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्याला दिले जाईल. कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत आणि सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

पोर्टलवरील रक्कम किंवा इतर तपशीलाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी पोर्टलवर ग्रिव्हन्स नोंदवावी. त्याचा निपटारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केला जाईल. सहकार आयुक्तांनी हे स्पष्टीकरण सर्व शेतकरी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

0000000

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अमरावती, दि. 31 (जिमाका): राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत मानधन मंजूर करण्यात येते. यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्विकारण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 1 जुलै 2026 पासून आपले सरकार पोर्टलवर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे, मात्र सांस्कृतिक                  कार्य संचालनालयाने अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता दि. 15 ऑगस्टपर्यंत पात्र साहित्यिक आणि कलावंतांना अर्ज करता येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांनी कळविले आहे.

00000


दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू

*पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती दि. 31 (जिमाका): परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी बुधवार, दि. 5 ऑगस्ट रोजी पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी सकाळी 10 ते दुपारी 2.30 यावेळेत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीचे नाव व पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.

00000


नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवले

*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

अमरावती, दि. 31 : जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये 125 नवीन रास्तभाव दुकानांना मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, पात्र संस्था व बचत गटांकडून या दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.

नवीन रास्तभाव दुकान मंजुरीसाठी शासनाच्या नियमांनुसार संस्था, गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं साहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना परवाने देण्यात येणार आहे.

मंजूर केलेल्या रास्तभाव दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदाय, गटाद्वारे करणे आवश्यक राहील. भातकुली - मक्रंदाबाद, मक्रमपूर, बोकुरखेडा, उदापूर, मलकापूर, नवथळ बू., कारखेडा, अडवी, कोलटेक, खालकोनी, देगूरखेडा, कृष्णापूर, तिवसा - जहांगीरपूर, आलवाडा, तळेगाव ठाकुर, चांदुर बाजार - अब्दलपूर, मौजखेडा, पिंपरी तळेगाव, वारोळी, खरवाडी, हिरापूर, अचलपूर - गोंडविहीर, कोठारा, जवर्डी, मेघनाथपूर, खतिजापूर, वाल्मीकपूर, सावळी खु., खानापूर, शहापूर, परतवाडा, अचलपूर, खैरी, सांगवी, दर्यापूर - चंद्रपूर, नांदुरा, ईटकी, सौदळी हिरापूर, सोनखेड, रुस्तमपूर, शहापूर, चांदुर जहानपूर, बनोसा, अंजनगाव सुर्जी - सर्फाबाद, औरंगपूर, कालवाडा, सैदापूर, कोठा, बोरगाव अंबाडा, वरुड - जामगाव, पिंपलागड, नागझरी, नांदगाव खंडेश्वर - निभोरा लाहे, जसापूर, भगुरा, बोरगाव, पिंपरी, खरबी गुंड, नांदगाव खं., नांदगाव ख., घारफळ, वढाळा, पळसमंडळ, पुसनेर, कोदरी, राजना, संग्रामपूर, चिखली वैदय, चिखलदरा - कुही, भुत्रुम, भिरोजा, केशरपूर, भांडुम, ढाकणा, खिरपाणी, पांढराखडक, डोमी, माडीझडप, आवागड, सलोना, टेटू, ढोमणीफाटा, लवाद वन, चिलाटी, रामटेक, कुलंगणा बु., चौऱ्यामल, शहापूर, मोझरी, बागलिंगा, लवादा, सुमिता, सलिता, खटकाली, मोर्शी - अंबाडा, हाशमपूर, धारणी - झिल्पी, खिडकी, कंजोली, दिया, रोरा, हरीसाल, चित्री, नांदुरी, अमरावती (ग्रामीण) - पुसदा, जामडोल, ब्राम्हणवाडा गोंविदपूर, माळेगाव, पिंपळविहीर, नांदुरा बु., कामुंजा, कुंड सर्जापूर, कुऱ्हाड, मोगरा, हातला, पिंपळखुटा, चांदुर रेल्वे - सातेफळ, चांदुरखेडा, येरड, चांदुर रेल्वे, कोदरी हरब, धामणगाव रेल्वे - धामणगाव रेल्वे, रामगाव, वकनाथ, गिरोली या गावांमध्ये नवीन दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

यासाठी आवश्यक असणारे अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जाचे शुल्क 100 रूपये असून चलानाद्वारे भरणा करूनही अर्ज प्राप्त करता येईल. 15 ऑगस्टनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी दिली आहे.


00000


विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकीचे कॅन्टीन विनापरवाना

 

अमरावती, दि. 31 : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने शहरात कारवाई करीत आहे. अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनसह नामांकित हॉटेलवर एफडीएने कठोर कारवाई केली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे आणि आदिती देशमुख यांनी ३० जुलै रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनची तपासणी केली. दोन्ही नामांकित संस्थांचे कॅन्टीन कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एफडीएने दोन्ही कॅन्टीनचालकांना कॅन्टीन तत्काळ बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. तसेच, यासंदर्भात अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे.

नागपूर हायवे रोडवरील 'हॉटेल गौरी इन' येथे दि. २९ जुलै २०२६ रोजी कारवाईदरम्यान गंभीर गैरप्रकार आढळले. हॉटेलमध्ये मुदतबाह्य ब्रेडचा साठा आढळला, तसेच किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुदतबाह्य ब्रेडचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. तसेच हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) वि. वि. चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

00000

नांदगाव खंडेश्वर येथील संग्रामपूरजवळ बेंबळा नदीच्या पुरात अडकलेल्या ८-१० नागरिकांची सुरक्षित सुटका

 






शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना!


 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

​उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली.


 

गेल्या काही दिवसांपासून #अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे.
​उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Thursday, July 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.07.2026

 जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

अमरावती, दि. 30 (जिमाका) :ऑगस्ट महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार,दि.3ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000000

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर

*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन*

अमरावती, दि. 30 (जिमाका ): कृषी विभागाने खरीप हंगाम 2026 साठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन केले आहे. यात मूग आणि उडीदसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

पिक स्पर्धेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्याच्या कृषी उत्पादकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 प्रमुख पिकांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटाला प्रति पीक 300 रुपये तर आदिवासी गटाला 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे आणि इतर पिकांसाठी 40 गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.

ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली जाईल आणि विजेत्यांना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर पहिले, दुसरे आणि तिसरे रोख बक्षिसे दिली जातील. तालुका पातळीवर 5 हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार रुपये, तर राज्य पातळीवर 50 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळेल.

इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकाच्या क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत या कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पीक स्पर्धा नोंदणी येथे अर्ज करावा किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे.
◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा.
◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा.
◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

आपले सरकार वर ई-केवायसी करा...जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांच्या प्रशासनाला सूचना कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिध्द करा...


 आपले सरकार वर ई-केवायसी करा...जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांच्या प्रशासनाला सूचना

कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिध्द करा...

Wednesday, July 29, 2026

DIO NEWS AMRAVATI 29.07.2026

 




शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी

-         जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 29 : राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंद घालण्यात यावीत, तसेच शहरात जड वाहतूक प्रवेशाच्या ठिकाणी चेकपोस्ट उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील अपघाताबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदने प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहरातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात जड वाहने प्रवेश करीत असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. ही कार्यवाही आजपासूनच सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले. शहरात सकाळी सहा ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहतुकीस बंदी आहे. याबाबत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या वेळेत शहरात येणाऱ्या जड वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करावी.

 

शहरातील उड्डाणपूलावर पूल संपताच काही वाहने उजवीकडे वळण्यासाठी जागा आहे. मात्र यामुळे अपघाताचा धोका असल्यामुळे याठिकाणी दुभाजक निर्माण करण्यात यावे. तसेच पुलावर तातडीने दुभाजकाची व्यवस्था करण्यात यावी. रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी रस्ता सुरक्षेचा निधी उपयोगात आणावा किंवा आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजनमधून निधीची मागणी करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

00000






शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहिर
पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिद्ध करावी
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

     अमरावती, दि. 29 : राज्‍य शासनाने शेतकऱ्यांची दोन लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी जाहिर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 142 शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहे. यातील 76 हजार 976 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. ही यादी गावपातळीवर प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, राज्य शासनाने शेतकऱ्यांची दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन लाख रूपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे, तर राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदारांना बँकेतर्फे कर्ज राईटऑफची सवलत मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदारांना दोन लाख रूपयांहून अधिक कर्जमाफीची सुविधा मिळणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद बँकांनी केली आहे. 

     कर्जमाफीची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जदार असलेल्यांना ई-केवायसी करीत असताना राईट ऑफची रक्कम वजा जाता शासनाकडून दिली जाणारी रक्कम दिसत असल्याने शेतकरी सहमती दर्शवित नसल्याचे दिसून येत आहे. ही एक प्रकारची व्यवस्था असली तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दोन लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळणार असल्याने त्यांना संपूर्ण दोन लाख रूपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. 

    कर्जमाफीची गती वाढविण्यासाठी आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करावी लागणार असल्याने ही केंद्रे सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच कर्जमाफीच्या ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शुल्क आकारल्यास आपले सरकार केंद्राची मान्यता रद्द करण्यात योणार आहे. त्यासोबतच कर्जमाफीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, याठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँक, तलाठी कार्यालयात लावण्यात याव्यात. तसेच यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000





मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर


अमरावती, २९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी कारागृहातील बंद्यांना प्ली बार्गेनिंग म्हजेच शिक्षा किंवा आरोप कमी करून घेण्यासाठी आरोपीने न्यायालयात अथवा फिर्यादीसोबत केलेला गुन्हा कबूल करण्याचा करार, वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. न्यायरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिवक्ता ॲड. जितेंद्र देशमुख यांनी उपस्थितांना कायदेविषयक विविध हक्क आणि स्पृहा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

 

कारागृह उपअधिक्षक प्रदिप इंगळे यांनी प्रास्ताविक केले. न्यायरक्षक कार्यालयातील सहायक अधिवक्ता ॲड. प्राजक्ता वरुडकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अधिवक्ता ॲड. सृष्टी शिरभाते यांनी आभार मानले.

00000


राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली.


राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली. #शेतकरीकर्जमुक्ती #महाकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR

 

Tuesday, July 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28.07.2026




 विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 

 

अमरावती, दि. 28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मंगळवार, दि. 28 जुलै रोजी 'विधी जनजागृती आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर' उत्साहात पार पडले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. नंदकिशोर के. रामटेके उपस्थित होते.

 

न्यायरक्षक कार्यालयाचे सहायक अधिवक्ता अॅड. श्री अंकुश इंगळे यांनी नाल्सा योजनेंतर्गत जागरूकता, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपायांवर मार्गदर्शन केले. श्री. सहारे यांनी पर्यायी वाद निवारण पद्धती, त्याचे फायदे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल अधिवक्ता अॅड. सपना काळे-विधळे यांनी सूत्रसंचालन केले. विधी स्वयंसेवक अमोल पोकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्री. मालवीय, प्रा. लोखंडे आदी उपस्थित होते.

 

00000

 


29 आणि 30 जुलै रोजी कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा

* उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 : कामगार विभागाअंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठीची सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ दि. 29 आणि 30 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षेच्या निमित्ताने उमेदवारांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या 8 जिल्ह्यांमधील 22 केंद्रांवर घेतली जाणार आहे. सुरळीत आणि पारदर्शक परीक्षेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही ऑनलाइन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमीटेडमार्फत पारदर्शकपणे पार पडणार आहे.

 

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळल्यास किंवा कोणीही व्यक्ती, संस्था गैरमार्ग, अमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्यास, अशा कोणत्याही गैरप्रकाराला उमेदवारांनी बळी पडू नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.

 

000000

--

शनिवारी माजी सैनिक संपर्क कार्यक्रम

 

अमरावती, दि. 28 : उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब-एरिया मुख्यालय यांच्या माजी सैनिक शाखेतर्फे माजी सैनिक संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सीएसडी कॅन्टीनजवळील एनसीसी ग्रुप मुख्यालयात पार पडणार आहे.

 

कार्यक्रमात सर्व माजी सैनिक व त्यांच्या आश्रितांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी, प्रश्न व अडचणींचे जागेवरच निवारण करण्यात येणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या समस्यांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यात डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, पीपीओ आणि इतर संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.

 

सर्व आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 15.8.2026

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्कृष्ट कार्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिक...