Wednesday, July 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08.07.2026

                                                  कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसहाय्य

* 19 जून ते 20 जुलै दरम्यान विशेष अंमलबजावणी मोहीम

*पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 8 (जिमाका): शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी दि. 19 जून ते 20 जुलै दरम्यान विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही योजना ऑगस्ट 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, पीक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयंसहायता गट आणि कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांनी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची विशेष अंमलबजावणीसाठी मोहीम दि. 19 जून ते 20 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

या योजनेत मंजूर होणाऱ्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी सुविधेचाही लाभ उपलब्ध आहे. यात गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव इनपुट उत्पादन युनिट आणि कस्टम हायरिंग सेंटर आदी प्रकल्पांना या योजनेतून अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

जिल्ह्यात संत्रा, केळी, कांदा, भाजीपाला आणि इतर नाशवंत कृषी उत्पादनांचे उत्पादन होते. तसेच कडधान्यामध्ये तूर, हरभरा व कापूस उत्पादित होतो. अशा उत्पादनांची गुणवत्ता, साठवण क्षमता, प्रक्रिया सुविधा आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक गोडाऊन, दाल प्रक्रिया उद्योग, कापूस जिनिंग व प्रेसिंग, साफसफाई व ग्रेडिंग युनिट इत्यादी आधुनिक कृषी सुविधा उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पात्र संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

00000000

जिल्हा नियोजन समितीची 18 जुलै रोजी बैठक

अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या नियोजनात बदल करण्यात आला असून, आता ही बैठक शनिवार, दि. 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ही बैठक दि. 12 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

सुधारित वेळापत्रकानुसार सदर बैठक आता दि. 18 जुलै रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे. बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आणि नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.

00000

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस

अमरावती, दि. 8 (जिमाका): आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दि. 20 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळाने तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी जिल्ह्यातील आगारातून एकूण 254 जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरुड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार या आगारातील बसस्थानकावरून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार पंढरपूरसाठी जादा बसेस सोडल्या जातील. एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध असल्यास थेट त्या खेड्यातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्यात येईल. यासाठी भाविक, प्रवासी किंवा सरपंचांनी नजीकच्या आगाराशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच, पंढरपूरहून परत येणाऱ्या भाविकांसाठी परतीच्या आरक्षणाची सोयही महामंडळाने केली आहे.

भाविकांना परतीचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि संपर्क करणे सोपे जावे, म्हणून यावर्षी एका विशेष उपक्रमांतर्गत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकांची नावे व मोबाईल नंबर बसमध्ये ठळकपणे प्रदर्शित केले जातील. अमरावती 36, बडनेरा 36, परतवाडा 30, वरुड 36, चांदूर रेल्वे 21, दर्यापूर 30, मोर्शी 32, चांदूर बाजार 33 अशा एकूण 254 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी प्रमुख मार्ग आणि त्यांचे प्रवास भाडे निश्चित करण्यात आले आहे. यात अमरावती - पंढरपूर (मार्गे वाशिम, परभणी) 1046 रूपये, दर्यापूर - पंढरपूर (मार्गे मुर्तिजापूर, परभणी) 1024 रूपये, परतवाडा - पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) 1135 रूपये, वरुड - पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) 1212 रूपये, चांदूर रेल्वे - पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) 1112 रूपये, मोर्शी - पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) 1146 रूपये, चांदूर बाजार - पंढरपूर (मार्गे अमरावती, परभणी) 1124 रूपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील भक्त आणि वारकऱ्यांनी नजीकच्या आगारात चौकशी करून बसेस आरक्षित कराव्यात आणि सुरक्षित शासकीय बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 08.07.2026

                                                   कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसहाय्य * 19 जून ते 20 जुलै दरम्यान विशेष अंमलबजावणी मो...