Thursday, July 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16.07.2026


                                                     पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

             अमरावती, दि. 16 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या, शुक्रवार, दि. 17 जुलै, रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            दौऱ्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे हे सकाळी 10 वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.

 दुपारी 4.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीव्दारा मंजूर निधी अंतर्गत पोर्टेबल टॉयलेट व रेनकोट तसेच जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आधुनिक व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 5 वाजता टाईप 4, ऑफीसर क्वार्टर, मालटेकडी येथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन क्वार्टरचे उद्घाटनास उपस्थिती. सांयकाळी 5.30 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक, गाडगेनगर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 7 वाजता अमरावती येथून मोझरीकडे प्रयाण करतील. तेथे खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार रात्री 8 वाजता मोटारीने अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

क्रीडा ई-प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, घरबसल्या मिळणार डिजिटल प्रमाणपत्र

अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल, तसेच माहिती जुळल्यास अवघ्या 24 तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल खेळाडूंना उपलब्ध होणार आहे.

            विशेष म्हणजे आगामी काळातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनाही यापुढे नवीन भरतीसाठी या प्रणालीद्वारे नवीन प्रमाणपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in/) भेट देऊन 'आमच्या सेवा' (Our Services) मधील '5% Reservation' या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी (One-Time Registration) पूर्ण करावी. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपला आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डची पीडीएफ आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल तयार ठेवावी. सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (2025 ची स्पर्धा), ज्युडो (2024 ची स्पर्धा) आणि कुराश (2017-18 व 2024-25) या खेळांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून याच खेळाडूंचे अर्ज स्वीकारले जात आहेत. तर इतर खेळांच्या खेळाडूंनी केवळ नोंदणी करून ठेवावी, त्यांचे अभिलेख अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या खेळाडूंची माहिती किंवा प्रमाणपत्रे प्रणालीवर दिसत नसतील, त्यांनी आवश्यक तपशीलासह support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

000000

 

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईल ॲपचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा 21 जुलै रोजी

अमरावती, दि. 16 (जिमाका): राज्यातील सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या वतीने 'Maha-UPLABDHI' हे अद्ययावत मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या नवीन ॲपची सविस्तर माहिती पोहोचवण्यासाठी आणि पेन्शनधारकांना या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा माहिती व प्रशिक्षण मेळावा मंगळवार, दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या ॲपच्या सुविधेमुळे आता पेन्शनधारकांना विविध कामांसाठी कोषागार कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तरी अमरावती कोषागार अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष सत्राला विहित वेळेत उपस्थित राहून डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.

00000000

अमरावतीत विशेष लोकअदालत 18 जुलै रोजी; कलम 138 च्या

प्रलंबित प्रकरणांचा होणार जलद निपटारा

अमरावती, दि. 16 (जिमाका): न्यायप्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवून 'न्याय आपल्या दारी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने शनिवार, दिनांक 18 जुलै 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आयोजित या लोकअदालतीमध्ये परकाम्य संलेख अधिनियम, कलम 138 (N.I. Act 138 - चेक बाऊन्स प्रकरणे) अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून पक्षकारांना वेळेत दिलासा मिळावा आणि परस्पर संमतीने व सलोख्याने हे वाद तात्काळ मिटवता यावेत, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे.

            या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपापसांतील प्रलंबित प्रकरणांचे सलोख्याने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांनी केले आहे.

 

0000000

 

 

टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी 24 जुलै रोजी अमरावतीत ‘पेन्शन अदालत’;

23 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 16 (जिमाका): प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांच्या वतीने टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी  11 वाजता विशेष 'डाक पेन्शन अदालत' चे आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत अमरावती येथील प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालतमध्ये टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाईल, ज्यांची महाराष्ट्र आणि गोवा राज्य स्तरावर 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, मात्र वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढवणे, धोरणात्मक बाबी तसेच शिस्तभंग आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या पूर्णपणे कायदेशीर प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांनी आपली तक्रार केवळ वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नसावी) विहित नमुन्यातील अर्जाच्या तीन प्रतींसह प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती (444602) या पत्त्यावर दिनांक 23 जुलै 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी; मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही, असे डाक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी