अंजनगाव बारी येथे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न;
70 रुग्णांची तपासणी
अमरावती, दि. 13 (जिमाका): विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल), अमरावती अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संयुक्त विद्यमाने अंजनगाव बारी येथे नुकतेच भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नराटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय उपचार व सल्ला जागेवरच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या विशेष तपासणी शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदूरोग, बालरोग यांसारख्या गंभीर आजारांसह लघवी व किडनी संबंधित विकार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी आणि कान-नाक-घसा संबंधित आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तसेच एन.सी.डी. (बिगर संसर्गजन्य आजार) अंतर्गत येणाऱ्या रुग्णांचेही स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या 6 रुग्णांना अमरावती येथील मुख्य विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. या रुग्णांवर पुढील सर्व उपचार शासकीय योजनांतर्गत मोफत केले जाणार आहेत.
शिबिरामध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना गुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंकुजय केचे, शिबीर समन्वयक अधिकारी भूपेंद्र जेवडे, अधिपरिचारिका कशिश दामले, अधिपरिचारक मिलिंद भगत, फार्मासिस्ट प्रतिमा राठोड, रुग्णवाहिका चालक दीपक शर्मा, कक्षसेवक अभिजीत उदयकर आणि आरोग्य सेविका सुजाता रोंडगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
00000000
पावसाच्या खंडात सोयाबीन उत्पादकांनी घाबरू नये; कृषी संशोधन केंद्राचा सल्ला
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात जून अखेरीस पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाची अवस्था सध्या 12 ते 15 दिवसांची असून, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता, कोणत्याही महागड्या फवारण्या न करण्याचे आवाहन अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्र ( डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) मार्फत कळविण्यात आले आहे.
या संवेदनशील काळात जमिनीतील ओलावा टिकवणे आणि मुळांची वाढ चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमीन वाफशावर असल्यास शेतकऱ्यांनी उथळ डवरणी व कोळपणी करावी; ज्यामुळे वरचा पापुद्रा फुटून तणांचे नियंत्रण होईल आणि जमिनीतील ओलावा टिकून राहील. संरक्षित सिंचनाची सोय असल्यास व रोपे दुपारी कोमेजू लागल्यास हलके स्प्रिंकलर सिंचन द्यावे. 3-4 दिवसांच्या खंडासाठी टॉनिक किंवा 19:19:19 ची गरज नाही, मात्र पाण्याचा ताण 7 ते 10 दिवसांपेक्षा वाढल्यास 1 टक्के पोटॅशियम नायट्रेट किंवा 19:19:19 ची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. तीव्र ताण व जास्त तापमान असताना तणनाशकांचा वापर टाळावा.
दुसरीकडे, ज्या भागात अत्यल्प पावसामुळे अद्याप पेरणी झालेली नाही, तिथे उशिरात उशिरा 23 जुलैपर्यंत सोयाबीन पेरता येईल. मात्र, यामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के घट होऊ शकते. अशा वेळी जे एस 20-34, जे एस 95-60, पिडीकेव्ही अंबा, एमएयूएस 725 यांसारख्या लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. हेक्टरी रोपांची संख्या राखण्यासाठी दोन ओळींत 30 से.मी. अंतर ठेवून, बियाणे दर वाढवावा आणि पेरणी बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीनेच करावी. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरेल. जर 25 जुलैपर्यंत पेरणी शक्य झाली नाही, तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड न करता सूर्यफूल किंवा मका या पर्यायी पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
00000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment