शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 09 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून सदर आदेश दि. 11 ते 25 जुलै 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.
00000000
दर रविवारी 'अमरावती ते चिखलदरा दर्शन' विशेष बससेवा
अमरावती, दि. 9 (जिमाका): चिखलदरा या प्रसिद्ध पर्यटन व थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने येत्या रविवार, दि. 12 जुलैपासून दर रविवारी 'अमरावती ते चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांना चिखलदऱ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळाने आधुनिक बीएस प्रकारातील नवीन 'लालपरी' बस उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांचा प्रवास अधिक आनंददायी व्हावा म्हणून या बसला आकर्षक सजावट केली जाईल आणि बसमधील साऊंड सिस्टीमद्वारे मनोरंजनात्मक गाणी देखील वाजवली जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या बसवर विशेषत्वाने निर्व्यसनी चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर विशेष बस चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पाँईट, देवी पाँईट, किल्ला पाँईट, लेक पॉईट, पंचबोल पाँईट, भिमकुंड पाँईट या प्रमुख पॉईंट्सचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदऱ्याला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
पर्यटकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहिती व आरक्षणासाठी प्रवाशांनी स्थानिक आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment