Wednesday, July 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.07.2026

 आदिवासी सुशिक्षित तरुणांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी;

विद्यावेतनासह मिळणार पुस्तक संच

अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अचलपूर येथील 'आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र' यांच्या वतीने विविध सरकारी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी साडेतीन महिन्यांचे विशेष मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा 1 हजार  रुपये विद्यावेतन आणि मोफत अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, हे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पुढील अभ्यासासाठी पुस्तकांचा संचही मोफत दिला जाणार आहे.

या प्रशिक्षण सत्राचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026 असा असेल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 23 जुलै 2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत लालपूल जवळील जयस्तंभ रोड, अचलपूर कॅम्प, परतवाडा येथील कार्यालयात सादर करावे. प्रवेश अर्ज वाटप आज 15 जुलैपासून सुरू झाले आहे. या प्रवेशासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील किमान 10 वी उत्तीर्ण आणि 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरतील. तसेच उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.

अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखत 24 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता संबंधित कार्यालयात घेतली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने सर्व मूळ कागदपत्रांसह (शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, 10 वीचे गुणपत्रक, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक व रोजगार नोंदणी कार्ड) उपस्थित राहावे. निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7709432024 किंवा 9359976243 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000000

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान; कृषी विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 15 (जिमाका) : राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी करण्यासाठी शासनामार्फत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध शासकीय योजनांच्या समन्वयातून या प्रवर्गातील शेतकऱ्यांना आता तब्बल शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाणीबचत करून पिकांची उत्पादकता वाढवणे आणि वंचित घटकांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये आणखी भर घालत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारकांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते. याशिवाय, उर्वरित रक्कम जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून (अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी 10 टक्के आणि इतरांसाठी 15 टक्के) पूरक अनुदान  असे एकूण 90 टक्के म्हणून दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून त्यांना एकूण 100 टक्के अनुदान प्राप्त होईल.

या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकी हक्काचा चालू 7/12 उतारा, 8-अ उतारा असणे तसेच शेतात ओलीताची (पाण्याची) शाश्वत सोय असणे बंधनकारक आहे. पात्र व गरजू शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज सादर करावेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

00000000

'मिशन लक्षवेध' अंतर्गत आर्चरी व बॅडमिंटन खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;

21 व 22 जुलै रोजी निवड चाचणी

अमरावती, दि. 15 (जिमाका): ऑलिम्पिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करण्यासाठी राज्य शासनामार्फत 'मिशन लक्षवेध' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात 'जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' सुरू करण्यात येत असून, आर्चरी (तिरंदाजी) आणि बॅडमिंटन या दोन खेळांसाठी प्रत्येकी 20 गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या विशेष अनिवासी प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी 21 आणि 22 जुलै 2026 रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, प्रशिक्षक आणि वैद्यकीय विम्यासह सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. या चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूचे वय 21 वर्षांखालील असावे आणि त्याने शालेय किंवा अधिकृत संघटनेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्य स्तरावर सहभाग किंवा पदक मिळवलेले असावे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि क्रीडा कामगिरीच्या प्रमाणपत्रांसह 20 जुलै 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

निवड चाचणी 21 व 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. यामध्ये आर्चरीची चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड (तपोवन गेटजवळ) येथे, तर बॅडमिंटनची चाचणी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे घेतली जाईल. ही निवड प्रक्रिया क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन चाचणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000000

राजापेठ-अंबादेवी मंदिर रस्ता 16 जुलैपासून वाहतुकीसाठी बंद;

सौंदर्यीकरण आणि प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे प्रशासनाचा निर्णय

अमरावती,दि. 15 (जिमाका): शहरातील राजापेठ परिसरातील अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था 16 जुलै ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातील 'एच अँड एफ' (H&F) शोरूमसमोर भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील टप्प्यातील सौंदर्यीकरणाचे काम सुरू असताना कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊ नये, या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

या कालावधीत अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी दोन मुख्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नवाथे नगरकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनधारकांनी 'कुशल ऑटो'कडून भूतेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. तसेच, कंवर नगर परिसराकडून येणाऱ्या नागरिकांनी 'मोनालिसा कॉम्प्लेक्स' जवळील रस्त्याचा वापर करावा. या पर्यायी मार्गांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.

हा वाहतूक बदल 3 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत वाहनचालक, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घातलेल्या नियमांचे व निबंधांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम वेळेत व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी सर्व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता विनोद बोरसे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी