शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी
-
जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 29 : राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघाताच्या
पार्श्वभूमीवर शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंद घालण्यात यावीत, तसेच शहरात जड वाहतूक
प्रवेशाच्या ठिकाणी चेकपोस्ट उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी
दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील अपघाताबाबत बैठक घेण्यात
आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदने प्राप्त
झाली आहे. त्यानुसार शहरातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे
शहरात जड वाहने प्रवेश करीत असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. ही कार्यवाही आजपासूनच
सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले. शहरात सकाळी सहा ते रात्री
10 वाजेपर्यंत जड वाहतुकीस बंदी आहे. याबाबत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या वेळेत
शहरात येणाऱ्या जड वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
शहरातील उड्डाणपूलावर पूल संपताच काही वाहने उजवीकडे वळण्यासाठी
जागा आहे. मात्र यामुळे अपघाताचा धोका असल्यामुळे याठिकाणी दुभाजक निर्माण करण्यात
यावे. तसेच पुलावर तातडीने दुभाजकाची व्यवस्था करण्यात यावी. रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना
करण्यासाठी रस्ता सुरक्षेचा निधी उपयोगात आणावा किंवा आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजनमधून
निधीची मागणी करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
00000
मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
अमरावती, २९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन
शिबिर पार पडले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी कारागृहातील
बंद्यांना प्ली बार्गेनिंग म्हजेच शिक्षा किंवा आरोप कमी करून घेण्यासाठी आरोपीने न्यायालयात
अथवा फिर्यादीसोबत केलेला गुन्हा कबूल करण्याचा करार, वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेबद्दल
मार्गदर्शन केले. न्यायरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिवक्ता ॲड. जितेंद्र देशमुख यांनी
उपस्थितांना कायदेविषयक विविध हक्क आणि स्पृहा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.
कारागृह उपअधिक्षक प्रदिप इंगळे यांनी प्रास्ताविक केले.
न्यायरक्षक कार्यालयातील सहायक अधिवक्ता ॲड. प्राजक्ता वरुडकर यांनी सूत्रसंचालन केले.
सहायक अधिवक्ता ॲड. सृष्टी शिरभाते यांनी आभार मानले.
00000







No comments:
Post a Comment