Monday, July 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27.07.2026



 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहात

अमरावती, दि. 27 : सेंट्रल बँक ऑफ इंडियााच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै रोजी 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक संचालक ई. रतनकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पुणे अंचल प्रमुख अजयकुमार सिंह, वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय, एमएसएमई-डीआय संचालक विजय सिरसाठ, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाळे, युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रमोद परहाते, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रमुख महेश डांगे, बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख निर्मेश जी., खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रदीप चेचरे उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये या योजनेची भूमिका, तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांविषयी मार्गदर्शन केले. तसेच नुक्कड नाटकाच्या माध्यमातून योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. लोन उत्सवादरम्यान 356 लाभार्थ्यांना साडेतीन कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.

वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांनी प्रास्ताविक केले. निलेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

00000

 

 

 




 

 

 

 

 

 

टिटंबा आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात मंत्री डॉ. अशोक उईके

यांचा मोठा निर्णय

कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, काही दिवस सेंट्रल किचन बंद ठेवणार

अमरावती, दि. २७ : टिटंबा, ता. धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दखल घेततली. त्यांनी तातडीने धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

शनिवारी टिटंबा आश्रम शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने धारणी येथे भेट देत उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी थेट टिटंबा आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. विद्यार्थी, पालक, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सविस्तर बैठक घेतली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत टिटंबा आश्रमशाळेसाठी सेंट्रल किचनमधून पुरविले जाणारे भोजन तात्काळ बंद करण्याचा निर्णयही मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित संस्थेला कोणीही पाठीशी घालणार नाही. चौकशी अहवालानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करणे, दोषींवर गुन्हे दाखल करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर मंत्री डॉ. उईके यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि लेखी आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी, पालक व आदिवासी संघटनांनी सुरू असलेले आंदोलन मागे घेत मंत्री डॉ. उईके यांचे आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणात मंत्री डॉ. उईके यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

00000

 

 

 

‘पीएम यशस्वीशिष्यवृत्ती योजनेसाठी

31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि.27 (जिमाका) : ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना अकरावीपर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोर्टलवर 'New Registration' करावे. मिळालेला Application ID व पासवर्ड वापरून 'Fresh Login (AY २०२६-27)' अंतर्गत अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याचा तपशील भरून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, गुणपत्रक, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे पीडीएफ, जेपीजीई स्वरूपात अपलोड करावीत. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी. एकदा 'Final Submit' केल्यावर अर्जात बदल करता येत नाही.

अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट काढून शाळेत संपर्क साधावा, जेणेकरून शाळेचे 'Institute Nodal Officer' तो अर्ज ऑनलाईन पडताळू शकतील. वेळापत्रकानुसार विद्यार्थी अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत खुली असली, तरी शाळास्तरावरील पडताळणी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आणि जिल्हा, राज्यस्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना मोबाईल व ईमेल सक्रिय असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो. याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

00000000


नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 27 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत' उपक्रमांतर्गत 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्याभारती महाविद्यालयात होणार आहे.
या अभियानाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि 'विकसित भारत' उभारणीत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविणे आहे.

स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत, सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, लघुपट, रील निर्मिती, घोषवाक्य लेखन, मौखिक काव्य सादरीकरण आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांचे विषय व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली आणि विकसित भारताशी संबंधित असतील. जिल्हास्तरीय स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अधिक माहितीसाठी माय भारत, अमरावती जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'माय भारत'चे जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 27.07.2026

  'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहात अमरावती, दि. 27 : सेंट्रल बँक ऑफ इंडियााच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै र...