मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा
अमरावती, दि. 24 (जिमाका) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या शनिवार, दि. 25 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्रीमती तटकरे ह्या दि. 25 जुलै रोजी भोकरबर्डी, धुळघाट रोड व कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतील. तसेच स्थानिक आदिवासी महिला बचत गटांच्या महिलांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजता धारणी येथील एनआरसी केंद्रास भेट देऊन कामकाजाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता धारणी शासकीय विश्रामगृहात कुपोषण, बालमृत्यू आणि विविध स्थानिक समस्या व उपाययोजनांबाबत प्रशासकीय बैठक घेतील. तसेच लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिल्यानंतर सायंकाळी त्या परतवाडामार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील. रात्री अमरावती शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.
रविवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता समृद्धी महामार्गाने वाशीमकडे प्रयाण करतील.
0000000
एमएफआयएनतर्फे आर्थिक साक्षरता, फसवणूक जनजागृती कार्यक्रम
अमरावती, दि. 24 (जिमाका) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्क या राष्ट्रीय स्वयं-नियामक संस्थेच्या वतीने अंबा मंगलम येथे आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिला कर्जदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
उद्घाटनाला आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वागणे, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पांचाळ, अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, आरसेटी संचालक निखिल भस्मे, निवृत्त पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे, एमएफआयएन प्रादेशिक प्रमुख देवेंद्र शहापूरकर उपस्थित होते.
श्री. वागणे यांनी वाढत्या सायबर व आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोबाईल, आधार, पॅन किंवा ओटीपीची माहिती कोणाशीही शेअर करू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर किंवा एमएफआयएनच्या टोल-फ्री क्रमांक १८००-१०२-१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
श्रीमती पांचाळ यांनी कर्ज घेण्यापूर्वी कुटुंबाचे उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्जमाफीच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळणे कठीण होत असल्याचे सांगितले.
श्री. हेडाऊ यांनी दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यात मायक्रोफायनान्स संस्थांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. श्री. भस्मे यांनी वेळेवर कर्ज परतफेडीचे महत्त्व सांगून त्यांनी एमएफआयएनने असे उपक्रम तालुका व ब्लॉक स्तरावरही राबवावेत, अशी सूचना केली. श्री. कोल्हे यांनी मोबाईलच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले.
श्री. शहापूरकर यांनी अनधिकृत घटकांकडून पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला आळा घालण्यासाठी भविष्यात मेळघाट आणि चिखलदरा भागातही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रम ॲक्सिस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., मुथूट मायक्रोफिन, सतीन क्रेडिटकेअर, स्पंदना स्फूर्ती आणि स्वतंत्र मायक्रोफिन यांच्या सहकार्याने पार पडला.
0000000
राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापनदिनानिमित्त
रोजगार मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 24 (जिमाका) : केंद्र शासनाच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या 6 उद्योजक प्रतिनिधींनी उपस्थित राहून नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात 128 उमेदवार सहभागी झाले होते. मेळाव्यात क्रेडीट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड, प्रेसीजन मॅपिंग जीआयएस, क्वेस कॉर्पोरेशन, ईसीई एनर्जीज, स्वॅगी, आणि जाधव गिअर्स लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग नोंदवून तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. तसेच कौशल्य विकास अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शासकीय उपक्रमांतील उपलब्ध संधीचा लाभ घेऊन करिअर घडवण्याचे आवाहन केले.
वैभव तेटू यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यासाठी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव, यंग प्रोफेशनल क्रपा अरगुलेवार, दिलीप तांभारे, प्रथमेश सोहाळे आणि जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी पुढाकार घेतला.
रोजगार आणि कौशल्याशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ncs.gov.in आणि mahaswayam.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0000000

.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment