Wednesday, July 22, 2026

DIO NEWS AMRAVATI 22.07.2026


                        जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांना अभिवादन

अमरावती, दि. 22 (जिमाका) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

00000

मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी विशेष मोहीम

*गणनापत्रक भरून देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पूर्णपणे नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी दि. 24 ते 26 जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मतदानकेंद्रावर जाऊन गणनापत्रक भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

मतदारांनी गणनापत्रक भरून दिले नसल्यास त्यांची नावे आगामी प्रारूप मतदारयादीमधून वगळल्या जातील. त्यामुळे मतदारांनी वेळेत हे पत्रक जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित मतदारांचे नाव मतदारयादीत यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. शुक्रवार, दि. 24 जुलै ते रविवार, दि. 26 जुलै दरम्यान दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व संबंधित विधानसभा मतदान केंद्रे ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी गेल्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीत ज्या केंद्रावर मतदान केले आहे, त्याच ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे. उपस्थित बीएलओकडून गणनापत्रक प्राप्त करून घ्यावे, तसेच सदर अर्ज पूर्ण भरून बीएलओकडे त्वरित जमा करावे. यामुळे मतदार यादीत मतदारांचे नाव समाविष्ट होण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही.

जिल्ह्यातील एकूण 25 लाख मतदारांपैकी सुमारे 16 लाख मतदारांनी आपले गणनापत्रक भरून दिले आहे. उर्वरीत 9 लाख मतदारांनी संबंधित 'बीएलओ' यांच्याकडे गणनापत्रक जमा केलेले नाही. त्यामुळे मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे आणि एकही मतदार वगळला जाऊ नये, यासाठी सर्व मतदारांनी तातडीने गणनापत्रक भरून देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

00000

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

*अंतिम यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

अमरावती, दि. 22 :पावसामुळे मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरोघरी भेटी व गणना कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. नागरिकांची व प्रशासकीय यंत्रणेची गैरसोय टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण 2026 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता अंतिम यादी दि. 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. दि. 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत ही सुधारीत मतदारयादी तयार करण्यात येत आहे. यात 30 जून ते 8 ऑगस्ट दरम्यान बीएलओमार्फत घरोघरी भेटी, 8 ऑगस्टपर्यंत मतदानकेंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, 17 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरपर्यंत नोटीस कालावधी, दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबर, 2026 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी होणार आहे.

मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मयत व्यक्तींची नावे कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांचा समावेश करून अचूक व पारदर्शक मतदारयादी तयार करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

सर्व मतदारांनी बीएलओकडे विहीत नमुन्यातील गणना अर्ज मुदतीत सादर करावा. तसेच दि. 17 ऑगस्ट रोजी प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यावर आपले नाव तपासून घ्यावे आणि दावे किंवा हरकती असल्यास दि. 16 सप्टेंबर 2026 पर्यंत दाखल करावे. तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 'बूथ लेव्हल एजंट'ची नियुक्ती करून या पुनरीक्षण कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

शबरी महामंडळाच्या 11 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

अमरावती, दि. 22 (जिमाका) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतील 11 पात्र लाभार्थ्यांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या प्रशासन महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शासनाच्या विविध स्वयंरोजगार व आर्थिक सक्षमीकरण योजनांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

0000000

शबरी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची आमझरी, खटकालीला भेट

अमरावती, दि. 22 (जिमाका) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिकतर्फे राज्यातील 25 गावांमध्ये आदि ग्राम पर्यटन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आमझरी आणि खटकाली (ता. चिखलदरा) दोन गावाची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांना शबरी महामंडळ महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान होमस्टे लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच मध्यप्रदेशातील अभ्यास दौऱ्यास भेट दिलेल्या लाभार्थ्यांकडून त्यांच्या अनुभवाची माहिती जाणून घेण्यात आली. त्यानुसार स्थानिक पर्यटन विकास, पर्यटकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच होमस्टेच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शबरी आदि पर्यटन योजनेंतर्गत होमस्टेसाठी निवड करण्यात आलेल्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटनक्षम वातावरण यावर आढावा घेण्यात आला. तसेच प्रकाश होमस्टे येथे भेट देऊन कॉफी प्लॉटची पाहणी करण्यात आली. परिसरातील नैसर्गिक पर्यटन क्षमता, उपलब्ध सुविधा व पर्यटन विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आले.

लाभार्थ्यांना शबरी आदि पर्यटन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मंजूर कॉर्पस निधीचा उद्देशपूर्ण आणि नियमानुसार वापर करण्याबाबत लाभार्थ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. होमस्टे विकास, परिसर स्वच्छता, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक संस्कृतीचे जतन व रोजगारनिर्मिती या बाबींवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी प्रकल्प व्यवस्थापक राजेश पवार, प्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे, शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, सल्लागार उपजीविका मनोहर मोहिते, प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख, सुनील जांबेकर, ग्राम समन्वयक वासुदेव हेकडे आदी उपस्थित होते.

0000000

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी ॲप सुविधांचे माहेरघर

अमरावती, दि. 22 (जिमाका) : राज्य शासनाच्या सेवेतील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेले महा-उपलब्धी हे ॲप माहिती आणि सुविधांचे माहेरघर सिद्ध होत आहे. या मोबाईल ॲपची माहिती, तसेच पेंशनधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात पेन्शन अदालत पार पडली.

यावेळी सहाय्यक संचालक दीपक भिलपवार, सहाय्यक संचालक प्रल्हाद तुमने, अप्पर कोषागार अधिकारी जयश्री उताणे, वीरेंद्र दीक्षित प्रमुख उपस्थित होते.

निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी, 'महा-उपलब्धी' ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना दरमहाची पेमेंट हिस्ट्री, इन्कम सर्टिफिकेट, फॉर्म-१६, ई-पीपीओ लायब्ररी, ह्यातीचा दाखला आणि निवृत्तीवेतनविषयक शासन निर्णय आदी सुविधा उपलब्ध होत आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या मोबाईल ॲपचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

कनिष्ठ लेखापाल लुकेश मोहोरे व आदित्य सुरजुसे यांनी लाइव्ह प्रोजेक्टरद्वारे ‘महा-उपलब्धी’ ॲपमधील डिजिटल सेवांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच लेखालिपिक कोमल गोसावी यांनी निवृत्तीवेतनधारकांचे मोबाईल क्रमांक निवृत्तीवेतन वाहिनीवर अद्यावत करण्यासाठी 'महाकोष' पोर्टलवर स्वतःचे लॉगिन करून मोबाईल क्रमांक अपडेट करण्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ सादर केला.

पेंशन अदालतीमध्ये उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या व तक्रारींचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरसन केले. अनेक क्लिष्ट प्रकरणांवर जागेवरच सकारात्मक निर्णय घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला.

कनिष्ठ लेखापाल नयना सोलव यांनी प्रास्ताविकातून निवृत्तीवेतनाबाबत शासन निर्णय आणि इतर सुविधांबाबत कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ लेखापाल साजिया मोहम्मद यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी वरिष्ठ लेखापाल राम जाधव, यामिनी खरड, कनिष्ठ लेखापाल चंदन गजभिये, लेखालिपिक मनीषा भालचक्रे, वर्षा नावाडे यांनी पुढाकार घेतला.

00000000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 22 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 23 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे सकाळी 10.30 वाजता तिवसा तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानास उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबीराचे उद्घाटन करतील. हे शिबीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 चिखलदरा येथील पोलीस स्टेशनच्या कवायत मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आणि मुख्यमंत्री जनआरोग्य अभियानांतर्गत मेळघाटातील बालकांमधील जन्मजात हृदयरोगावर मोफत उपचारासाठी आयोजित 'प्रोजेक्ट डीईव्हीए' कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.

000000000

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका): खादी व ग्रामद्योग मंडळाच्या वतीने ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 साठी नामांकने मागविण्यात आली आहे. यशस्वी उद्योजकांनी नामांकने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सन 2023 पासून हा पुरस्कार सुरू केला आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. पुरस्कार योजनेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येणार असून काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिला जाणार आहे.

नामांकन अर्ज मंडळाच्या mskvib.org या संकेतस्थळ, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि. 28 जुलै 2026 पुर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

ग्रामीण भागात  कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 23 जुलै 2026 ते  5 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे  यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : योजनेचा लाभ मिळेपर्यंत पीककर्जावर व्याज न आकरण्याचे सहकार विभागाचे आदेश..

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : योजनेचा लाभ मिळेपर्यंत पीककर्जावर व्याज न आकरण्याचे सहकार विभागाचे आदेश #शेतकर...