Monday, July 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.07.2026

 जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीमध्ये विविध प्रकरणांचा यशस्वी निपटारा;

4.13 कोटी रुपयांची तडजोड

अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे नुकतेच विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत येणाऱ्या 'धनादेश बाऊन्स' प्रकरणांवर तडजोडीसाठी भर देण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

विशेष लोक अदालत पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 18 पॅनल (मंडळ) तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या लोक अदालतीसमोर एकूण 2 हजार 740 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 229 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या 4 जुन्या प्रकरणांमध्येही दोन्ही पक्षांत तडजोड घडवून आणण्यात यश आले. या संपूर्ण प्रक्रियेतून एकूण 4 कोटी 13 लाख 45 हजार 372 रुपयांच्या तडजोडीच्या रक्कमेचे दावे निकाली काढण्यात आले.

लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. या कार्यात जिल्हा न्यायाधीश-1 ए. जी. जोशी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, वकील वर्ग, बँक व पतसंस्थांचे प्रतिनिधी तसेच पक्षकारांचे सहकार्य लाभले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही लोक अदालत यशस्वी झाल्याचे सांगत सचिव संजय सहारे यांनी सर्वांचे आभार मानले.

00000000

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांकडून अर्ज आमंत्रित;

1 सप्टेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 20 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या विशेष गौरव पुरस्कारासाठी काही प्रमुख निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या माजी सैनिक किंवा वीर पत्नींच्या पाल्यांना इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत, ते या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षात आयआयटी , आयआयएम  आणि एम्स यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश असेल. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले माजी सैनिक, वीर पत्नी अथवा त्यांचे पाल्यदेखील या गौरव पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.

00000000

 

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 22 जुलैपर्यंत मुदतवाढ:

समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 22 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन स्वरूपात अर्ज जमा करावा. अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3 व निंभोरा) आणि संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींकरिता कॅम्प व जेल रोड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहे आणि तालुका स्तरावरील सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत 22 जुलै 2026 राहील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहिती व संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000000

जिल्हास्तर सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत सहभागासाठी 21 जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन:

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका):क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी करण्याची मुदत दि. 21 जुलै 2026 पर्यंत आहे.

 प्राथमिक स्तरावरील सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी सर्व इच्छुक संघांनी सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या https://www.subrotocup.in/register या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेकरिता 15 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतरचा असावा, तर 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतरचा असावा. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 21 जुलै 2026 पर्यंत विहित नमुन्यातील प्रवेशपत्र भरून करावयाची आहे. तसेच त्याबाबतचे 100 रुपये शुल्क आकारून अधिकृत पावती प्राप्त करून घ्यावी. स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूकडे आधारकार्ड, वयाच्या पडताळणीसाठी जन्माचे 5 वर्षांपर्यंतचे शासकीय दाखले व विहित नमुन्यातील ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संघासोबत जबाबदार क्रीडा शिक्षक किंवा मार्गदर्शक असणे बंधनकारक राहील. वेळेत नोंदणी झालेल्या संघांनाच पुढील स्पर्धेचे वेळापत्रक कळविले जाईल आणि वेळेवर येणाऱ्या कोणत्याही संघास प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000000

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी इयत्ता 11 वी, 12 वी व बिगर व्यावसायिक

अभ्यासक्रमांच्या अर्जांना 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

अमरावती (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरिता इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जांची मुदत दि. 22 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 विविध संघटना, विद्यार्थी व क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ती मुदत पूर्ववत राहील. सध्या ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त होणाऱ्या इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्जांची छाननी  गृहपाल, निरीक्षक व सहायक आयुक्त स्तरावर तात्काळ सुरू करण्यात आली आहे. वाढीव मुदतीनुसार पोर्टलवर प्राप्त सर्वच्या सर्व अर्जांची छाननी संबंधित अधिकाऱ्यांनी दि. 24 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करून घ्यावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे समाज कल्याण आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000000

पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन:

सुशिक्षित बेरोजगारांना कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

अमरावती, दि. 20 (जिमाका):नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित उमेदवारांना स्थानिक व इतर जिल्ह्यातील खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या वतीने उद्या, येत्या 21 जुलै 2026 रोजी पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात जाधव गिअर्स लि. अमरावती, कोलब्रो ग्रुप प्रा. लि. अमरावती/नागपूर, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण प्रा. लि. अमरावती आणि स्विगी लि. (क्यूस कॉर्पोरेशन) या कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती व लेखी परीक्षा घेतील आणि पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळवून देतील.

तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 21 जुलै 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. काही अडचण असल्यास उमेदवारांनी 0721-2566066, 8983288982, 8605654025 या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा amravatirojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 20.07.2026

  जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीमध्ये विविध प्रकरणांचा यशस्वी निपटारा; 4.13 कोटी रुपयांची तडजोड अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्हा व सत्र न्याय...