Thursday, October 12, 2017


जिल्हा ग्रंथालयातर्फे आज बंदीजनांसाठी ग्रंथप्रदर्शन

अमरावती, दि. 12: वाचन प्रेरणा दिनी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे उद्या (दि. 13) सकाळी 11 वाजता येथील कारागृहात बंदीजनांसाठी ग्रंथप्रदर्शन या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार व विकास होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी  ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तरी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी दि. 15 ऑक्टोबर रोजी  ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक किरण गं. धांडोरे तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बन्सोड यांनी केले आहे.
 याच पार्श्वभूमीवर उद्या बंदीजनांसाठी ग्रंथप्रदर्शन कारागृहात आयोजिण्यात आले असल्याची माहिती श्री. बन्सोड यांनी दिली.
                                                                     000

Tuesday, October 10, 2017

         जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे आज चावडीवाचन
                अमरावती, दि. 10 : कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ यासाठी चावडीवाचन कार्यक्रम उद्या दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी (सहकारी संस्था) यांनी केले आहे.
             राज्यातील थकित व नियमित कर्जदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या सदर योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदारांचे चावडी वाचन करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदारांचे चावडी वाचन उद्या होईल.    
स्थळ व तलाठी सज्जे खालीलप्रमाणे :
बचत भवन सभागृह (तहसील कार्यालय) : अकोली, राजापेठ, निंभोरा, सातुर्णा
बचत भवन सभागृह(जिल्हाधिकारी कार्यालय)- म्हसला, वडद, जेवड, बडनेरा, अलियाबाद, वडाळी.
             संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह: नवसारी, शेगाव, तारखेडा, रहाटगाव
भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक)- पेठ अमरावती,  महाजनपुरा,  गंभीरपुरा, बेनोडा.
कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड, बचत खाते क्रमांक, 7/12 यांची माहिती आपण कर्ज घेतलेल्या बँक किंवा सहकारी सेवा संस्थेकडे जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.   .
          
                                                      0000



Friday, October 6, 2017



जिल्ह्यातील गटशेती योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

अमरावती, दि. 6 : जिल्ह्यातील गटशेती योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा आढावा पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
गटशेती योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावांबाबत पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतले. थेट विक्रीमुळे शेतक-यांना  चांगला लाभ मिळेल. त्यामुळे संत्र्यासह सर्वच  उत्पादनांच्या बाबतीत  विक्रीसाठीचे अधिकाधिक पर्याय शेतक-यांना उपलब्ध करुन दिले पाहिजेत, असे ते यावेळी म्हणाले. 
प्रस्ताव परिपूर्ण व मार्केटिंग आणि बँक लिंकेजसह असावेत, याची काळजी घेण्यात आली. उत्पादित मालाचा चांगला दर्जा मिळवण्यासाठी शेतकरी कंपन्यांना आवश्यक यंत्रणा पुरविण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदीदार कंपन्या यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिका-यांना निर्देश दिले आहेत, असे श्री. बांगर यांनी सांगितले.   
                                                            00000
अमृत योजनेंतर्गत शहर पाणीपुरवठा प्रकल्पाला पालकमंत्र्यांकडून पाहणी
प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करावे
-पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
          अमरावती, दि. 6 : शहराची आगामी काळातील वाढ लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्प मुदतीत  पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिले. 
          प्राधिकरणाच्या नव्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाची पाहणी श्री. पोटे- पाटील यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री. चारथळ, कार्यकारी अभियंता श्री. जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पासह प्राधिकरणाच्या विविध कामांचा आढावाही यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.
          श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहराची आगामी काळातील वाढ व लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घ काळ पाणीपुरवठ्याचे नियोजन या प्रकल्पाद्वारे होत आहे. हे काम मुदतीत पूर्ण झाले पाहिजे. त्याचप्रमाणे, पाण्याची बचत करण्याविषयी नागरिकांमध्ये जागृतीही घडवून आणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जागृती, कारवाई आदी उपायांचा अवलंब करावा.
          श्री. जवंजाळ म्हणाले की, या प्रकल्पामुळे आगामी काळात 10 लाख 45 हजार लोकसंख्येला पाणी पुरवणे शक्य होईल. 61 एमएलटीचा साठा शक्य आहे. सध्या होणारा प्रतिदिन 108 दशलक्षलीटर पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेनुसार 135 दशलक्षलीटरपर्यंत वाढणे शक्य आहे. बडनेरा जुनी वस्ती, नागपुरी गेट, खोलापुरी गेट, नवसारी, पार्वतीनगर, बेनोडा ट्रेन्च, मजीप्रा परिसर, रहाटगाव, म्हाडा, मालटेकडी, तपोवन व जलशुद्धीकरण केंद्र येथे उंच जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील नवीन वितरण नलिकांचे काम 76.12 किमी, तर जुनी वितरण नलिका बदलविण्याचे काम 32.6 किमी पूर्ण झाले आहे.              
0000

महाराष्ट्र खाजगी रक्षक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी
-आमदार डॉ. सुनिल देशमुख

          अमरावती, दि.6 : महाराष्ट्र खाजगी रक्षक कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह जिल्हा कामगार अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          आमदार डॉ. देशमुख म्हणाले की,  शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणीकृत व्यक्तींमधूनच करणे बंधनकारक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मान्यता घेऊन सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या कराव्या. संचालक मंडळाने या बाबतीत टाळाटाळ केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत या कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
00000

कीटकनाशक वापराबाबत लोकजागृती करण्याचे प्रशासनाला आदेश
  बंदी घातलेली कीटकनाशके विकणा-यांवर कठोर कारवाई करावी
-पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचे निर्देश
          अमरावती, दि. 6 : कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सर्वदूर जनजागृती करावी, तसेच सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.
          श्री. पोटे- पाटील यांनी कृषी योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते.
          श्री. पोटे -पाटील म्हणाले की, कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्येक गावातील शेतक-यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. कीटकनाशके फवारताना मास्क, ग्लोव्ह्ज वापरणे, दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचार देणे याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. काही लोकांकडून ठराविक रक्कम आकारुन एकरी फवारणी करुन दिली जाते. तथापि, फवारणीबाबतचे निकष पाळले जात नाहीत. काळजी घेण्याबाबत बेपर्वाईही केली जाते. मात्र, कृषी व आरोग्य खात्याने आपल्या यंत्रणांद्वारे गावागावात माहिती पोहचवून योग्य वापराची जाणीव जागृत केली पाहिजे.
         
          दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचार आवश्यक - जिल्हा शल्यचिकित्सक
 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी यावेळी खालील माहिती दिली.
·        फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क यांचा वापर करावा.
·        कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा, डोळे, श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा झाल्यास व्यक्तीला अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याचे कपडे बदलावे.
·        रुग्णाचे अंग / बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करावेत.
·        कीटकनाशक पोटात गेले असल्यास रुग्णाला ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी.
·         दवाखान्यात नेताना किटकनाशकांच्या बाटलीसह डॉक्टरांकडे दाखवावे
·        रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच बिडी/ सिगारेट व तंबाखू देऊ नये.
·        रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टावेलने पुसावा. थंडी वाजत असल्यास पांघरुण द्यावे.
·        श्वासोच्छवास तपासावा. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद असल्यास कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
·        झटके येत असल्यास दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. बेशुध्द पडल्यास त्याला शुध्दीवर आणावयाचे प्रयत्न करावे.
·        बेशुध्द रोग्याला काहीही खाऊ घालू नये.
   
         
                            जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांनी खालील सूचना केल्या
·        पीकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.
·        फवारणी करताना वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास फवारा शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते.
·        फवारणी करताना जवळपास अन्य संबंधित व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असू नये.
·        ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरिन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी. ) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्यावेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
·        फवारणी करताना माहितीपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, मिश्रणाचे प्रमाण योग्य राखावे.
·        शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी विषारी किटकनाशके लहान मुले अथवा जनावरे यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
·        फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

00000

Thursday, October 5, 2017

कीटकनाशके फवारताना काळजी घ्यावी
-जिल्हा कृषी अधिक्षकांचे आवाहन
अमरावती, दि. 5 : शेतक-यांनी कीटकनाशके फवारताना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांनी केले.
  धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव येथे रब्बी हंगामपूर्व शेतकरी सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
धामणगाव तालुका कृषी कार्यालयामार्फत रबी हंगाम पूर्व नियोजन सभा व सेंदरी बोंडअळी व्यवस्थापन जनजागृती सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेत रब्बी हंगामातील पीकांचे नियोजन, पीक लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, ओलीत व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कीटकनाशके फवारताना सोबत दिलेल्या सूचनापत्रकातील सर्व सूचनांचा अवलंब केला पाहिजे, असे श्री. खर्चान म्हणाले.
          तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच अजय कांडलकर, सागर इंगोले, सचिन शिंदे, दिनेश मोंढे आदी उपस्थित होते.
                                                          00000

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी  दै. दिव्य मराठी #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट...