Wednesday, October 21, 2020

जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी‘मनरेगा’मध्ये वैविध्यपूर्ण कामे राबवावीत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल






जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी
‘मनरेगा’मध्ये वैविध्यपूर्ण कामे राबवावीत
            - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

       मनरेगा योजनेत भरीव रोजगारनिर्मितीसह स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक वैविध्यपूर्ण कामांचा समावेश करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दर्यापूर दौ-यात प्रशासनाला दिले.

       जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर, लेहगाव आदी विविध गावांना भेटी देऊन तेथील कामांची पाहणी केली. तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह तालुका प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.  

        ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अधिकाधिक कामे राबवावीत व या कामांत स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन वैविध्य ठेवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

         लेहगाव येथे भेट देऊन जिल्हाधिका-यांनी नरेगाअंतर्गत पांदण रस्ता ,वृक्षलागवड कामाची पाहणी केली.  लेहगाव येथील भोलेश्वरी नदीच्या खोलीकरणाची पाहणीही त्यांनी केली. शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी आवश्यक सुविधा म्हणून बांध बांधण्याचे निर्देश त्यांनी दिले.      

          शिंगणापूर येथे  भेट देऊन वृक्षलागवड, तसेच मशरूम प्रकल्पाची पाहणी केली. वृक्ष लागवड करताना फळझाडांचाही समावेश करावा. सीताफळ, लिंबू, आवळा अशी वेगवेगळी फळझाडांची लागवड करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

          यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी गावकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरणाबाबत निर्देश तालुका प्रशासनाला दिले.

Tuesday, October 20, 2020

पोलीस व सैन्यभरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना विविध मैदाने खुली - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



पोलीस व सैन्यभरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना विविध मैदाने खुली - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

        कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद असल्याने पोलीस, सैन्यभरतीसाठी सराव करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी आता विभागीय क्रीडा संकुलाप्रमाणेच शहरातील इतरही मैदाने खुली करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

         याबाबत विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी क्रीडा विभाग व संबंधित संस्थांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी मैदाने खुली करून देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, डॉ. विशाखा सावजी, डॉ. अंजली ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

         कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलीस, सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. सरावासाठी त्यांना विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठी गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन इतरही मैदाने विद्यार्थ्यांना खुली करून देण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्स व दक्षता नियम पाळून सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

        त्यानुसार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय,  श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय येथील मैदानांसह मालटेकडीवर सराव करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.  क्रीडांगणाची नियमित सफाई व सोशल डिस्टन्स पाळून सरावाचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. ही मैदाने सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत खुली राहतील.  
 

                                    000

जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरणगरीब व गरजू बांधवांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण
गरीब व गरजू बांधवांना लाभ -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात गरजू बांधवांसाठी  शिवभोजन थाळीचे दर पाच रूपये करण्यात आले. त्याचप्रमाणे, या काळात योजनेंतर्गत जिल्ह्यात थाळ्यांची संख्या अडीच हजार प्रतिदिन एवढी वाढविण्यात आली. त्यानुसार साडेतीन लाखांहून अधिक थाळ्यांचे वितरण आतापर्यंत झाले. गरीब, वंचित व गरजू बांधवांना या योजनेचा लाभ मिळत असून, ही योजना आधार ठरली आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

           कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यात काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात गरजू बांधवांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत  प्रति थाळी 5 रुपये इतकी करण्यात आली. बाजार समिती, रूग्णालये व इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांतून ही थाळी उपलब्ध करून देण्यात आली. चिखलदरा तालुक्यातील चुरणीसारख्या ठिकाणाचाही आवश्यकता लक्षात घेऊन समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना यामुळे  मदत झाली, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

         गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरु झालेली ही योजना विस्तार करून तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. त्यामुळे  ठिकठिकाणी ही थाळी उपलब्ध होऊन गरजूंना त्याचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात शिवभोजन योजनेंतर्गत 22 केंद्रे कार्यरत आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सांगितले.

        परतवाडा येथे अनिल उपाहारगृह व कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्ञानेश्वरी उपाहारगृह, धामणगाव रेल्वे येथे भगतसिंह चौकातील गणेश भोजनालय, तसेच अंबिका भोजनालय, तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर गोदावरी महिला बचत गट, दर्यापूरला बसस्थानकानजिक गोपाळ हॉटेल व कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक प्रसाद उपाहारगृह, धारणीला बसस्थानकानजिक गुरूकृपा भोजनालय, नांदगाव खंडेश्वर येथे चव्हाळे शाही भोजनालय व बसस्थानकानजिक राणा उपाहारगृह, चांदूर बाजार येथे बसस्थानकानजिक राहूल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे राजश्री फॅमिली गार्डन येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.

       अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरात महालक्ष्मी उपाहारगृह, जिल्हा रुग्णालयात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ उपक्रम, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भोजनालय, एसटी उपाहारगृह, सरोज चौकात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह  कन्झुमर्स फेडरेशन उपक्रम, भातकुली बसस्थानकानजिक साई योगी फॅमिला गार्डन उपाहारगृह, अंजनगाव सुर्जी येथे समता भोजनालय, वरूड येथे बसस्थानकामागे यशवंत महिला केटरर्स, मोर्शी येथे बसस्थानकासमोर यशवंत महिला केटरर्स आदिवासी बचत गट येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथे_ स्व. हरिराम बाबुलाल बहुउद्देशीय शिक्षण संस्था येथेही थाळी उपलब्ध असून, स्थानिक बांधव त्याचा लाभ घेत आहेत, अशी माहितीही श्री. टाकसाळे यांनी दिली.

        शिवभोजन थाळीसाठी शासनाने निश्चित केलेली किंमत शहरी भागात 50 रुपये प्रति थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून थाळीपोटी केवळ 5 रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त  उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये इतकी आहे.  
                                    000

पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त
    लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे
                           -   जिल्हाधिकारी शैलेश नवाल         

       राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात जनावरांमध्ये लाळखुरकत रोग प्रतिबंधासाठी सहा लाख 12 हजार लसी जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पशुधनाच्या शंभर टक्के लसीकरणासह टॅगिंगचे कामही विहित वेळेत करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.

       पशुरोग निर्मूलन कार्यक्रम समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मोहन गोहोत्रे, डॉ. राधेश्याम बहादुरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

       जिल्ह्यात सुमारे 5 लाख 94 हजार 569 एवढे पशुधन असून, पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी, तसेच 5 लाख 99 हजार 56 टॅग प्राप्त झाले आहेत. संपूर्ण लसीकरणासाठी पुरेशी सामग्री प्राप्त आहे. या कार्यक्रमात विविध 168 संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व तेवढेच प्रायव्हेट व्हॅक्सिनेटरच्या माध्यमातून लसीकरण, टॅगिंग, ईनाफ नोंदणीची व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यात लसीकरण व टॅगिंगचे काम होत आहे. प्रत्येक पशुपालकाच्या सर्व जनावरांचे लसीकरण व टॅगिंग झाले पाहिजे. प्रत्येक जनावराला बारा अंकी बिल्ला लावण्यात यावा. सर्वदूर या कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

        या कार्यक्रमाचे तालुकास्तरावर संनियंत्रण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. जिल्हा समितीमार्फत पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी हे संनियंत्रण करत आहेत.

      पशुपालक बांधवांनीही नाव, पत्ता, आधार क्रमांक, जनावरांची संख्या, लिंग आदी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक कार्यालयाला कळवावी व कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

                                    000

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू



वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू

Ø  कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

अमरावती, दि. 20 : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘आजीबाईच्या  बटव्या’तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत दिले.

आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, यवतमाळचे नवनाथ कोळमकर, वाशिमचे शंकर तोटावार, अकोलाचे यू. एस. नलावडे, बुलडाणाचे नरेंद्र नाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत उपस्थित होते.

बच्चु कडु यांनी वनौंषधी उत्पादनांबाबतचा आढावा घेतांना सांगीतले की, समितीतील तज्‍ज्ञगटानी केलेल्या शिफारशी राज्यस्तरावर सादर करुन वनौंषधी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. विविध शारिरीक व्याधींवर गुणकारी असलेल्या वनौंषधी उत्पादनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये वनौंषधीचे उत्पादन, विपणन आणि बाजारपेठेची स्थिती याबाबतचा समिती अभ्यास करणार आहे. समितीमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा येथील कृषी संशोधक, तज्‍ज्ञांचा समावेश असेल. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. याबाबतही ही समिती शिफारस करील. समितीमार्फत तज्‍ज्ञांच्या अभ्यास दौऱ्यात वनौंषधी पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढविणे, तसेच सद्या असलेले अनुदान वाढविण्यासंदर्भात विचार करेल. वनौषधींची शेकडो वर्षांपासूनची उत्पादन परंपरा पहाता त्या वनौषधींना भोगोलिक चिन्हांकन करुन त्याचे महत्‍त्व कायम ठेवण्याबाबतचा अभ्यासही ही समिती करेल.

विभागीय समितीच्या अभ्यासादरम्यान प्रशासनस्तरावर अस्तित्वात असलेल्या योजनांमधून तात्काळ उपाययोजना संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश श्री. कडू यांनी कृषी विभागाला दिले. संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रस्ताव तयार करुन ते शासनास सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. वनौंषधीवर येणारे रोग, किडीच्या उपाययोजनांची योग्य माहिती नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांना यंत्रसुविधा आणि किटकनाशकाबाबत माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

विषमुक्त शेतीच्या समस्यांवर उपाययोजना करावी

‘सेंद्रिय उत्पादन मिळेल’ असा फलक लावून विषारी उत्पादने विकणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे आयोजित विषमुक्त शेतीविषयी आयोजित बैठकीत दिले.

सेंद्रिय उत्पादनाच्या नावाखाली फळ, भाजीपाला आणि इतर उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे प्रामाणिक सेंद्रिय शेती उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जैविक शेतीचा उत्पादनाच्या प्रसाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात ‘विषमुक्त शेती अभियान पंधरवडा’ राबविण्यात येईल. या माध्यमातून जैविक शेतीचे उत्पादक थेट ग्राहकांशी जोडले जातील. तसेच शेतकऱ्यांना छोटेखानी बाजारपेठ उपलब्ध करुन देता येईल. यात बचतगटांच्या स्टॉलचा देखील सहभाग ठेवावा. पंधरवाड्यादरम्यान शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या पिकांची माहिती घेणे व सेंद्रीय उत्पादक म्हणून शेतकऱ्यांची नोंदणी कृषी विभागाने करावी, असे श्री. कडू यांनी सांगितले. त्याप्रमाणे सेंद्रिय शेती प्रमाणिकरण संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत सहज आणि सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात झाली.

बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू




राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा

                                    -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 20 : परतीचा पाऊस तसेच या अगोदर आलेल्या किडीचा प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश देतानाच ही मदत दिवाळीअगोदर मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले. 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील शेती पिकांची प्रत्यक्षपणे पाहणी श्री. कडू यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव त्रस्त झाला होता. आता शेतात खूप कष्ट करुन घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून गंजीसुध्दा खराब झाली आहे. कापसाची बोंड खराब झाले असून तूरीचे सुध्दा नुकसान झाले आहे. सुरवातीला बियाणे खराब निघाले नंतर किडीचा प्रादुर्भाव व आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

शेतपिकांच्या नुकसान भरपाईसह ज्या शेतीचा पावसामुळे पोत जाऊन नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सुध्दा मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही श्री. कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना दिली.

पाहणी दौऱ्यात राज्यमंत्री कडू यांनी जनूना, टिमटाळा, खिरसाना, सावनेर येथील नुकसानग्रस्त शेतशिवाराची व पिकांची पाहणी केली.

000000

Monday, October 19, 2020

विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात 481 गावांचा समावेश - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम
 बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात 481 गावांचा समावेश
                  -   जिल्हाधिकारी शैलेश नवाल

         विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रम जिल्ह्यातील 481 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व सकस चारानिर्मिती होईल. पशुसंवर्धनासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे व्यक्त केला.

        जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची याबाबत नुकतीच बैठकही झाली. या समितीकडून बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 3 हजार 737 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 2 हजार 78 लाभार्थ्यांना बहुवार्षिक वैरण ठोंबे लागवडीसाठी वितरीत करण्यात आले आहेत. हायब्रीड, नेपिअर, डीएचन-6, 10 अशा विविध चाराप्रकारांचा त्यात समावेश आहे.  जिल्ह्यात सुमारे 45 लाख थोंब्यांचे वितरण झाले आहे. सुमारे 950 एकर क्षेत्रावर लागवड साध्य झाली असून, जिल्ह्यात सर्वदूर हा कार्यक्रम भरीवपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

        लाभार्थ्यांच्या थोंबे अनुदान मागणीनुसार दहा गुंठे, वीस गुंठे किंवा एक एकरपर्यंत लागवड 803 लाभार्थ्यांनी केलेली आहे. याबाबत थोंबे अनुदानही वितरीत करण्यात आले आहे.

      बहुवार्षिक वैरण लागवडीमुळे मोठ्या प्रमाणात, तसेच सकस चारानिर्मिती होणार आहे. बहुवार्षिक चा-याच्या वर्षातून चार ते पाच कापण्या होतात. त्यामुळे वर्षभर चांगला चारा उपलब्ध होतो. पशुसंवर्धन, तसेच दुग्धविकासाठी हा कार्यक्रम लाभदायी आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.

                                    000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...