Tuesday, November 3, 2020

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे वाटपशेतीतील उत्पादन वाढीला मिळेल चालना- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर




रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे वाटप
शेतीतील उत्पादन वाढीला मिळेल चालना
-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

       कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.  ग्रामबीजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून उत्तम दर्जाचे बियाणे अनुदानावर मिळणार आहे.  या कार्यक्रमामुळे शेतीतील उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
       शासनाकडून कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियानाअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात रब्बी  हंगामासाठी राज्यभरात ३ लाख १४ हजार क्विंटल अनुदानावर वितरीत होणार आहे. त्यासाठी शासनाने ६२.७९ कोटींची तरतूद केली आहे. त्यासोबतच, शाश्वत उत्पन्नवाढीसाठी विविध पीक प्रात्यक्षिकेही राबविण्यात येणार आहेत.
         यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी बियाण्याचे परिपूर्ण नियोजन आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सर्वदूर अनुदानावर बियाणे वितरण व प्रात्यक्षिकांचे नियोजन करून या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

     महाबीज व इतर पुरवठादार संस्थांकडून होणार वितरण

        रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारित-संकरित वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते. १० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू २०००रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे, अशी माहिती ‘आत्मा’चे उपसंचालक अनिल खर्चान यांनी दिली.
        सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू, हरभरा, मका (संकरित), रब्बी ज्वारी, करडई, जवस आदी पीकांचा नियोजित प्रात्यक्षिकात समावेश आहे. याबाबतचे नियोजन कृषी विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

००००

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोविडची नियमावली काटेकोर पाळावी - विभागीय आयुक्त पियूष सिंह


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोविडची नियमावली काटेकोर पाळावी
 - विभागीय आयुक्त पियूष सिंह
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

      अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये राज्य शासनाने कोविड संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले.
     विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     श्री. सिंह यांनी सुरवातीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येईल. या दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येईल. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार असल्याची माहिती दिली.
       कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी दोन वाहने आणि उमेदवारासह दोन व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रचार करतांना परस्परांतील अंतर पाळावे लागणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
       उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरावा लागणार आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकेल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रूपये तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागेल. तसेच उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर करावे लागेल.
       सध्यास्थितीत 34 हजार 690 मतदारांची नोंदणी झालेली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे ज्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी तातडीने नोंदणी करावी. या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडची लागण झालेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी नियमावली विहित केली आहे. तसेच मतदान केंद्रावर दोन व्यक्तींमध्ये परस्पर अंतर पाळण्यात येणार असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.

00000

संख्या घटली, पण धोका कायमचदिवाळीच्या काळातही सतर्कता बाळगावी- जिल्हाधिकारी शैलेश नवाल


संख्या घटली, पण धोका कायमच
दिवाळीच्या काळातही सतर्कता बाळगावी
-  जिल्हाधिकारी शैलेश नवाल

       कोरोनाबाधितांची प्रतिदिन आकडेवारी घटत चालली असली तरीही जोखीम कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन याबाबत सर्वांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
       कोरोनाबाधितांची संख्या रोडावली तरीही अजून संकट टळलेले नाही. याचे भान दिवाळीच्या काळातही विसरता कामा नये. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच गर्दी टाळण्यावर भर द्यावा. अनावश्यकरीत्या बाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी फटाका विक्री केंद्रांना दोन केंद्रात विशिष्ट अंतर राखून परवानगी देण्यात येईल. नागरिकांनी ध्वनीप्रदुषण व धूरप्रदूषण टाळावे. कोरोनामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन फटाक्यांद्वारे होणारे धूरप्रदुषण टाळावे. मिठाईची शुद्धता कायम राखण्यासाठी वेळोवेळी काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

                000

आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटात भरड धान्य खरेदी केंद्रेटिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश


आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटात भरड धान्य खरेदी केंद्रे
टिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

       आधारभूत खरेदी योजनेंतर्गत 2020-21 च्या खरीप पणन हंगामासाठी आदिवासी क्षेत्रात भरडधान्य खरेदीसाठी नऊ केंद्रांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, स्थानिक शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन धारणी तालुक्यातील टिटंबा येथेही भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहेत.
      आधारभूत खरेदी योजनेत मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात या केंद्रांवर ज्वारी, मका आदी भरडधान्याची खरेदी होत आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालविण्यात येत आहेत. धारणी तालुक्यात बैरागड, हरिसाल, सावलीखेडा, धारणी, चाकर्दा, साद्राबाडी येथे, तर चिखलदरा तालुक्यात चुरणी, राहू, गोलखेडा बाजार येथे केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, टिटंबा हे धारणी तालुक्यातील गाव हे साप्ताहिक बाजाराचे ठिकाण असून, परिसरातील शेतक-यांना सोयीचे आहे. या ठिकाणी महामंडळाचे गोदामाची क्षमता 1200 क्विंटल व समाजमंदिराचा वापर केल्यास 1300 क्विंटल असे मिळून अडीच हजार क्विंटल धान्याची साठवणूक होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन हे केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
       खरेदी प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत शासकीय कामाच्या दिवशी सुरू राहणार आहे.  एफएक्यू दर्जाचे भरडधान्य प्रशिक्षित ग्रेडर्सकडून तपासणी करून खरेदी करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. टिटंबा येथील गोदामात खरेदी करून साठवणूक करण्यात येणा-या भरडधान्याची तपासणी करून ताब्यात घेण्याकरिता तहसील स्तरावरून कर्मचा-याची नेमणूक करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी धारणी तहसीलदारांना दिले आहेत.
          योजनेत तांदूळ (धान) (एफएक्यू) पिकासाठी साधारण दर्जा असल्यास आधारभूत किंमत व शेतक-यांना द्यायचा प्रत्यक्ष दर 1 हजार 868 रूपये आहे. धानाचा अ दर्जा असल्यास हा दर 1 हजार 888 रूपये आहे.
         ज्वारी संकरित असल्यास आधारभूत किंमत व शेतक-यांना द्यायचा प्रत्यक्ष दर 2 हजार 620 रू., तर मालदांडी ज्वारीसाठी 2 हजार 640 आहे. बाजरीचा दर 2 हजार 150 रू., मक्याचा 1 हजार 850 रू., रागीचा 3 हजार 295 रूपये आहे.  

                                                000

राज्यातला अनाथ आता “सनाथ” होणारअनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहिमत्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव - राज्यमंत्री बच्चू कडू


राज्यातला अनाथ आता “सनाथ” होणार
अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहिम
त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव
                 - राज्यमंत्री बच्चू कडू

     अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांनी नुकतेच दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही श्री.कडू यांनी यावेळी दिल्या.

      अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील विविध समस्यांचा आढावा घेऊन निर्देश दिले. यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.या वेळी आ.राजकुमार पटेल उपस्थित होते.

      राज्यातल्या अनाथांचा टक्का तो किती? पण संख्या कमी म्हणून त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. आता अनाथ घेणारा नाही तो देणारा झाला पाहिजे म्हणूनच बालसंगोपन योजनेचे आणि संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान एखादे अनाथ मुल संस्थेत दाखल होताच त्याच्या नावावर दरमहा जमा करावी. या दोन्ही योजनेचे अनुदान दरमहा त्याचे नावे जमा केल्यास १८ व्या वर्षी त्याच्या हाती मोठी रक्कम येईल. म्हणजे काळजी आणि संरक्षणाच्या प्रक्रियेतून तो बाहेर पडला तर तो सक्षम आणि “सनाथ” होईल, असे श्री.कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.

      आतापर्यंत किती अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र दिले त्याची माहिती सादर करावी. तसेच प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्यांसदर्भात सुनावणी घेण्यात यावी. अनाथालय अथवा अनाथ आश्रम संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथांची माहिती गोळा करण्याचे निर्देशही श्री. कडू यांनी यावेळी दिले. अनाथ बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच या वर्षी दाखल झालेल्या व अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्यांसाठी येत्या 14 नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            श्री. कडू म्हणाले की, अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा. तसेच ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे, अशा बालकांना ‘ब’ गटात समावून घेण्यासंदर्भात बदल करणे आवश्यक आहे. तसेच नोकऱ्यांमधील अनाथांसाठी असलेला आरक्षणाचा निकष हा एकूण रिक्त पदाच्या एक टक्केनुसार असावा, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.

            सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनाथांना होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या योजनांमध्ये त्यांच्यासाठी 1 टक्का आरक्षण ठेवण्याबाबत व अपंगांच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील एक टक्का निधी अनाथांसाठी खर्च करण्यासंदर्भात संबंधित विभागाना सूचित करण्यात यावे. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर संत गाडगेबाबा अनाथ घरकुल योजना राबविण्यात यावी. तसेच अनाथालयात असलेल्या बालकांना त्यांना बालसंगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीस महिला व बालविकास, कामगार, शालेय व उच्च शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, नगरविकास, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल, परिवहन, ग्रामविकास, उद्योग व सामान्य प्रशासन विभागाचे संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीस अनाथ प्रतिनिधी म्हणून नारायण  इंगळे, अर्जुन चावला, सुलक्षणा आहेर, कमलाकर पवार आदि उपस्थित होते.

0000

Monday, November 2, 2020

कपाशीवरील बोंडसड व बोंडअळी नुकसानाबाबत भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर







पालकमंत्र्यांकडून कठोरा, गोपाळपूर, पुसदा येथे भेट
बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या शेती क्षेत्राची केली पाहणी
कपाशीवरील बोंडसड व बोंडअळी नुकसानाबाबत भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू
                    - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच,  बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या क्षेत्रातील नुकसानाबाबत भरपाईसाठी पाठपुरावा करू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज पुसदा- गोपाळपूर- कठोरा दौ-यादरम्यान सांगितले.
       पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज पुसदा, कठोरा व गोपाळपूर या गावांना भेट दिली व गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी कठोरा येथे स्थानिक शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन बोंडसड व बोंडअळीग्रस्त कपाशी पीकाच्या क्षेत्राची पाहणी केली. तहसीलदार संतोष काकडे, कृषी अधिकारी अविनाश पांडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   
        पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सोयाबीन पीकाचे नुकसान झाल्यानंतर आता कपाशी पीक तरी हाती येईल, अशी सगळ्यांनाच आशा होती. पण बोंडसड व बोंडअळीच्या समस्या येऊन चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. या नुकसानाबाबत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांसह आवश्यक त्या सर्व यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.
         इतरत्र बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांना उपायांची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने सर्वदूर माहिती, मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच हानी झालेल्या क्षेत्राची पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

  रस्त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

         गोपाळपूर- आमला रस्ता तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा. गावांना जोडणाऱ्या अधिकाधिक रस्त्यांचे प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला गोपाळपूर पाहणी दौ-यात दिले. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देऊ. पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी गोपाळपूर पाहणी दौ-यात दिली.

        जनावरांच्या चो-यांचे प्रकार तत्काळ थांबविण्याचे निर्देश

         कठोरा येथे जनावरांच्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. या महिन्यात वीस जनावरे चोरीला गेली आहेत. स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याठिकाणी जनावरांच्या चो-या सातत्याने होत आहेत. अनेकदा अशा गुन्ह्यांमागे एखादी टोळी कार्यरत असते. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा तत्काळ छडा लावावा व चोऱ्यांचे प्रकार तत्काळ थांबवावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

      यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ, शेतकरी बांधव, महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

                                                            000

Sunday, November 1, 2020

‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’चे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



तरंग सुपोषित महाराष्ट्राचा
पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म
‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’चे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

          कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला. स्तनदा माता, बालके यांना पोषण आहाराबाबत माहिती, मार्गदर्शन यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजीटल प्लॅटफॉर्म महिला व बालविकास विभागातर्फे सुरु करण्यात आला आहे. सर्वदूर लोकशिक्षण आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
          कोरोना साथीच्या काळात  स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्यात आला. या साथीच्या काळात अनेक अडचणी ठिकठिकाणी उभ्या राहिल्या हो्त्या. मात्र, विभागाच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह 2020 मधे राज्याचा देशात पहिला क्रमांक आला आहे.  आता ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून त्याद्वारे पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाणार आहे.
        ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा आय.व्ही.आर. (इंटरॲक्टिव्ह वॅाइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित डिजीटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधून सुपोषणाबाबत माहिती, मार्गदर्शन केले जाणार आहे. पोषणविषयक जनजागृतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल , असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
          ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ मधे हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॅाल, व्हॉट्सॲप चॅटबोटचा समावेश आहे. 8080809063 या क्रमांकावरुन गरोदर महिला, स्तनदा मातांना व्हिडिओ, ऑडियो, व्हॅाट्सअप माध्यमातून पोषण, काळजी याची माहिती दिली जाणार आहे. ‘एक घास मायेचा’ ही खास पाककृतींची व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे खास माता आणि बालकांसाठी विविध पाककृतींचे प्रात्यक्षिक आदी दाखविण्यात येणार आहे. ‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या ॲनिमेटेड मालिकेतून लोकांच्या मानसिक परिवर्तनाबाबत रंजक गोष्टींच्या माध्यमातून संदेश दिले जाणार आहेत. ‘पोषणासाठी वडिलांची भूमिका’ ही मोहीमदेखील व्हिडिओच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...