Tuesday, November 10, 2020

दिवाळीनिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीरदीपोत्सव घरगुती स्वरूपात साजरा व्हावा- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

दिवाळीनिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
दीपोत्सव घरगुती स्वरूपात साजरा व्हावा
-   जिल्हाधिकारी शैलेश नवाल

         कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी दिवाळी सण साध्या पद्धतीने व एकत्रित न येता साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
         दीपावली उत्सवानिमित्त शासनाकडून विविध मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोविड संसर्गामुळे राज्यातील धार्मिक स्थळे अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दीपावली उत्सव घरगुती स्वरूपात साजरा व्हावा. उत्सवाच्या काळात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी व सोशल डिस्टन्स पाळावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

                       आतषबाजी टाळाच

        दीपावलीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, त्यामुळे वायू व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोरोनाबाधित, तसेच विलगीकरणातील व आजारातून बरे झालेल्यांनाही अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे यंदा आतषबाजी टाळावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे._

                      पाडवा पहाट ऑनलाईन करा

           दीपावलीनिमित्त  आयोजिण्यात येणारे पाडवा पहाट आदी सार्वजनिक कार्यक्रम हे ऑनलाईन माध्यमांचा वापर करून आयोजित करावेत. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम हाती घ्यावेत. विषाणूजन्य आजारांविषयी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

            कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने व विविध विभागांनी यापूर्वी लागू केलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. दीपावली हा मांगल्याचा सण आहे. सर्वांच्या निरामय आरोग्यासाठी संयम आणि विवेकाची जोड देऊन सर्वांनी दीपोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्यात करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे

                                                            000

Monday, November 9, 2020

बालविवाह प्रतिबंध नियमाची काटेकोर अंमलबजावणी करा- महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश



बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित
बालविवाह प्रतिबंध नियमाची काटेकोर अंमलबजावणी करा
- महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश

       बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. निर्मला सामंत  प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. बालविवाह प्रतिबंध नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बैठकीत दिले.
       बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, उपायुक्त रवी पाटील, उपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मनिषा बिरासीस, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.
        मंत्री ॲड. ठाकुर म्हणाल्या, बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील.
       यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे. समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
       राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा  श्रीमती ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये श्रीमती रमा सरोद, डॉ.आशा बाजपेयी, डॉ.जया सागडे, 'मासूम'च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्ते, विधायक भारतीचे संतोष शिंदे, सोशल बिहेव्हेर चेंज कम्युनिकेशन निशिध कुमार, युनिसेफच्या अल्पा वोरा, उपायुक्त (बालविकास) रवी पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य या समितीमध्ये आहेत.

Saturday, November 7, 2020

कोरोना संकटकाळात ऑनलाईन मेळाव्यांतून बेरोजगारांना रोजगारऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


कोरोना संकटकाळात ऑनलाईन मेळाव्यांतून बेरोजगारांना रोजगार
ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे
-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने कोरोना संकटकाळात ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. यापुढेही या उपक्रमांत सातत्य राखणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्वदूर लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाधिक नोंदणीसाठी प्रभावी जनजागृती व ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य राखण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
         कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाकडून लॉकडाऊन लक्षात घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरु करण्यात आली. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत  अमरावती विभागात एक हजाराहून अधिक व जिल्ह्यात सुमारे अडीचशे तरूणांना या माध्यमातून रोजगार मिळाला. तथापि, अधिकाधिक पात्र उमेदवारांना रोजगार, तसेच उद्योग- व्यवसायांना सक्षम मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हे उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच त्याची माहिती वेळोवेळी सर्वदूर पोहोचवावी जेणेकरून अधिकाधिक तरूण नोंदणी करून या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतील, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
           बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. या वेबपोर्टलवर नोकरीइच्छूक उमेदवारांनी आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करावी. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.  यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
          नोकरी मिळविण्यासाठी इच्छूक तरुणांनी  या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

०००

Thursday, November 5, 2020

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीविभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वितआचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी करता येणार तक्रार


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
विभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी करता येणार तक्रार

अमरावती, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी विभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या घोषित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आजपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. त्यानुषंगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कुठलीही तक्रार असल्यास अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांना आपली तक्रार विभागस्तरावरील तक्रार निवारण कक्षास करता येणार आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला माळा, अमरावती, दुरध्वनी क्रमांक 0721-2661364 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.

00000

विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी




विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

     शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र विलासनगर गोडाऊन येथे राहणार असून, मोजणी केंद्राच्या अनुषंगाने तिथे आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षितता उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
       शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने या जागेची पाहणी श्री. सिंह यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.    
     मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाययोजना, आवश्यक सूचनाफलक आदी सर्व तजवीज ठेवावी. आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी दिले. गोडाऊनच्या सर्व परिसराची श्री. सिंह यांनी पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.
       मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर दोन हॉलमध्ये मोजणीची सुविधा असेल. एकूण 14 टेबल असतील. जिल्ह्यात 25 मतदान केंद्रे असून, एक डिसेंबरला मतदान होईल.

                                    000

Wednesday, November 4, 2020

जि. प. प्रशासनाकडून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांच्या कामांचे होणार मूल्यमापनमेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी परिपूर्ण माहिती द्यावी- जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे


जि. प. प्रशासनाकडून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांच्या कामांचे होणार मूल्यमापन
मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी परिपूर्ण माहिती द्यावी
-  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे

      मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे मूल्यमापन व इतर माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे मेळघाट क्षेत्रातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

      जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमार्फत विविध योजनांची कामे, शासनाचे उपक्रम राबवताना स्वयंसेवी संस्थांची मदत होत असते. मेळघाटातील 305 गावांसाठी 321 स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आहेत, तथापि प्रत्यक्षात कार्यरत संस्थांची माहिती संकलित झालेली नाही. त्यामुळे अशा संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन जि. प. कडे नोंदणीकृत संस्थांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

      मेळघाट क्षेत्रात काम करणा-या संस्थांनी आपले कार्यक्षेत्र, कार्य विषय, मागील पाच वर्षात केलेली कामगिरी आदी माहिती पत्ता आदी तपशीलासह द्यावी. जि. प. कडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांनीच ही माहिती द्यायची आहे. त्यानुसार संस्थांनी आपली माहिती धारणी व चिखलद-याच्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडे किंवा bdo_chikhaldara@rediffmail.com , तसेच bdodharni.1848@rediffmail.com   किंवा ceozp.amravati@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                000

मतिमंद, बहुविकलांग मुलांच्या पालकांनी निरामया विमा योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



मतिमंद, बहुविकलांग मुलांच्या पालकांनी निरामया विमा योजनेचा लाभ घ्यावा
        -  जिल्हाधिकारी शैलेश नवाल

       राष्ट्रीय न्यास कायद्यांतर्गत निरामया विमा योजनेचा 18 वर्षांवरील मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल केले.  
       अठरा वर्षांवरील मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांना राष्ट्रीय न्यास कायद्यांतर्गत पालकत्व योजना राबविण्यात येते. या कामासाठी ऑनलाईन समिती जिल्हास्तरावर गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष व जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रयास विशेष शाळेचे विनायक कडू, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी सदस्य आहेत.
        या समितीच्या कार्यवाहीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी श्री. नवाल म्हणाले की, मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांच्या पालकांनी पालकत्व योजनेंतर्गत www.thenationaltrust.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, तसेच निरामया या विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

      वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र दाभाडे, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक चंदू धकिते, सदस्य गजानन गोस्वामी, ज्ञानेश्वर आमले, महेश शेळके आदी उपस्थित होते.

             000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...