Wednesday, February 9, 2022

परतवाडा अंतर्गत पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरु

 

परतवाडा अंतर्गत पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरु

अमरावती दि. 9 : राज्यात कोविड-19 रोगाचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागा अंतर्गत   पर्यटनासाठी दि. 11 जानेवारी 2022 पासून पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते.

महाराष्ट शासन महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापण मदत व पुनर्वसन मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार  पर्यटनासाठी दि. 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात येत आहे. पर्यटकांनी प्रवेशाच्या वेळी त्यांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील, यांची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी.

00000

धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान संबंधित संस्थांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

संबंधित संस्थांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

अमरावती, दि. ९ : धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते. त्यासाठी संस्थांनी १८ फेब्रुवारीपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी, अनुदानित व विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते.  मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ज्यू आदी अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनातील नियोजन शाखेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

खालील सुविधांसाठी मिळते अनुदान

 

शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने, एलसीडी प्रोजेक्टर, सॉफ्टवेअर आदी, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे व अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, दुरूस्ती, झेरॉक्स मशिन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदींसाठी अनुदान मिळते.

 

प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डीआयईएस कोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी इन्स्टिट्यूट कोड, तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

00000

 

 

 

 

 

Friday, February 4, 2022

ग्रामीण भागाच्या विकासाला पक्क्या रस्त्यांमुळे येणार गती - राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 










ग्रामीण भागाच्या विकासाला पक्क्या रस्त्यांमुळे येणार गती

-          राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

चांदूर बाजार येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण

 

अमरावती, दि. 04 : ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्यास त्या भागातील विकास वेगाने होतो. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात ग्रामीण रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदुरबाजार येथे केले.

चांदुरबाजार तालुक्यातील टाकरखेडा पुर्णा, आसेगाव, गोविंदपूर, राजनापूर्णा, सर्फाबाद, हिरूळपूर्णा, तुळजापूर गढी, बेलज, तोंडगांव, लाखनवाडी, तळेगाव मोहना, मासोद या ग्रामीण भागात राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले.

चांदुरबाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा येथील बेलदारपुरा येथे सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे भूमीपूजन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी 3 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. हिरुळपूर्णा येथीलच तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत नाली बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या बांधकामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. तसेच सर्फाबाद येथील हनुमान मंदिराजवळील सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी 14 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्फाबाद फाटा ते जवळा शहापूर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमीपूजन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

तुळजापूर गढी येथील कांडली-कविठा-घोडेगाव ते तुळजापूर हिरुळ, सर्फाबाद या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमीपूजन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच तुळजापूर गढी येथीलच काँक्रिट नाली बांधकामाचा लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला.

टाकरखेडा पूर्णा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम त्याचप्रमाणे विविध वार्डातील अंतर्गत रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात आले. आसेगाव येथील सिमेंट काँक्रिट रस्ता, भांडारगृहाचे बांधकाम तसेच येथील सभागृहाच्या बांधकामाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. राजणापूर्णा येथील 82 किमी रस्त्याच्या दुरुस्ती बांधकामाचेही भूमीपूजन करण्यात आले.

चांदुरबाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला गणेशकर, जिल्हा परिषद सदस्या दुर्गा पिसे, सर्फाबादचे सरपंच शेख मुस्ताक शेख दुल्लु, तुळजापूर गढीच्या सरपंच संजीवनी इंगळे, उपसरपंच मुक्ता ठाकरे, मंगेश देशमुख  तसेच सबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000

Thursday, February 3, 2022

जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा जिल्हाधिकारी पवनीत कौर






 जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा

जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

 

अमरावती, दि. 03 : राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चालणाऱ्या जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून यावर कडक कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत राजे, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर तसेच अशासकीय सदस्यांमध्ये चंदू कडू, महेश देवळे, डॉ. सुनील सुर्यवंशी, विजय शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती कौर यांनी जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली. राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावांमधून, परराज्यातून विशेषत: मध्यप्रदेशातून येणारी सक्षम जनावरे, गोवंश येथे विकले जातात. त्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अमरावती पोलीस आयुक्त यांनी सन 2020 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीबद्दल 9 गुन्हे दाखल करुन 201 जनावरांची यातून सुटका केली आहे. तर सन 2021 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीवर 17 गुन्हे दाखल करण्यात आली असून 360 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी सन 2020 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीचे 75 गुन्हे दाखल केले असून यापैकी 1054 जनावरांची सुटका केल्याची माहिती पोलीस विभागाने यावेळी दिली. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अवैध वाहतुकीवर 6 गुन्हे दाखल केले असून त्यातील 3 प्रकरणावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित 3 प्रकरणांवर कार्यवाही सुरु असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सांगण्यात आले.

जनावरांची वाहतुक करतांना पोलीस विभागामार्फत पावती बघून जनावरे सोडण्यात येतात. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार यासंबंधी परवानगी असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्राण्यांची वाहतुक करणाऱ्यांवर बंदी घालावी, असे श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.

जनावरांची खरेदी-विक्री करतांना त्यांना चिन्हांकित (टॅगिंग) करणे आवश्यक करावे. खेड्या-पाड्यात गायरान जागेवर अतिक्रमण झाले आहे. गोवंश सांभाळण्यासाठी गौरक्षणाला चाऱ्याची आवश्यकता असते. तरी अशा ठिकाणावरील अतिक्रमण उठवून ती जागा गौरक्षण संस्थांना चाऱ्यासाठी उपलब्ध करुन देण्याची समितीच्या सदस्यांनी यावेळी मागणी केली. अशा जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची यादी त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी समितीचे स्वतंत्र बँक खाते उघण्याचेही ठरविण्यात आले.

इतर खाद्यान्ने खातांना जनावरे अनावधानाने प्लास्टिकही खातात. यासाठी प्लास्टिक बंदीवर कडक कारवाई करण्यासाठी नगर प्रशासन व मनपा आयुक्त यांनी समितीच्या पुढील आढावा बैठकीला उपस्थित रहावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. मोकाट कुत्र्यांच्या संगोपनासाठी ‘डॉग शेल्टर’ निर्माण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यात प्राणी कल्याण बोर्डासाठी अमरावती जिल्ह्यातील शुभम सायंके आणि डॉ. राधेशाम बहादुरे या दोन अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये समाप्त होत आहे. पुढील समितीसाठी अशासकीय सदस्य पदासाठी 15 अर्ज प्राप्त झाले असून समितीच्या ठरावाने सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

00000

गावातील नागरिकांसाठी प्रस्तावित सुविधा निर्मितीची कामे गतीने पूर्ण करावी - बच्चू कडू

 












गावातील नागरिकांसाठी प्रस्तावित सुविधा निर्मितीची कामे गतीने  पूर्ण करावी

- बच्चू कडू

चांदुर बाजार येथे 43 कोटी 63 लक्ष रुपये निधींतून  विविध विकासकामांचे भूमिपूजन

 अमरावती, दि. 3 : गावाच्या विकासप्रक्रियेत  नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची प्राधान्याने निर्मिती करण्यात येईल. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन स्तरावर वेळोवेळी  उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिली.  गावात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश बच्चू कडू यांनी यावेळी दिले. आज (दि.3) विविध योजनेअंतर्गत प्राप्त 43 कोटी 63 लक्ष रुपयांच्या निधीतून  चांदुर बाजार तालुक्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शारदा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ललित बोबडे, उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता नितीन झगडे आदी उपस्थित होते.

बेलोरा येथे 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामे

बेलोरा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम, स्थानिक अहिल्याबाई होळकर नगर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत  कृषि उत्पन्न साठवण गृह गोदाम व विक्री केंद्राचे बांधकाम, मौजा बेलोरा येथे सिमेंट कॉकीट रस्ता बांधकामाचे  असे एकून 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामांचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटींची विकासकामे

बेलोरा,शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन श्री कडू यांनी केले. चांदुर बाजार- वलगाव रस्ता,जुनी पंचायत समिती ते परसोडा फाट्याचे चौपदरीकरणाचे 13 कोटी 19 लक्ष रुपये निधीतून भूमिपूजन करण्यात आले. बेलोरा येथे युवकांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण श्री कडू यांनी केले. युवकांनी सुदृढ व मजबूत शरीरयष्टी कमविण्यासाठी या व्यायामशाळेतील आधुनिक उपकरणांचा वापर करावा. व्यायामशाळेतील उपकरणांची वेळोवेळी योग्य ती देखभाल करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. 

चिंचोली काळे, वाठोडा येथे रस्ता, नाली व सभागृहाची निर्मिती

चिंचोली काळे गावात  तांडावस्ती योजनेअंतर्गत प्राप्त 10 लक्ष रुपये निधीतुन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम भुमिपुजन श्री कडू यांनी केले. वाठोडा येथे 18 लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह बांधकाम करणे व हनुमान मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकामाचे भुमिपूजन यावेळी करण्यात आले. चांदुर बाजार, नानोरी, सोनोरी, घाटलाडकी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 8 कोटीच्या निधीतून करण्यात आले. सुरळी येथे 6 कोटी 15 लक्ष रुपयांच्या निधीतुन रस्ता बळकटीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले.

वारुळी फाटा ब्राम्हणवाडा थडी येथील घाटलाडकी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन 22 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. परसोडा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गतथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम 10 लक्ष निधीतुन करण्यात येत आहे. चिंचकुंभ येथील अडगाव विचोरी तळेगाव, विण्मोरा, खेड, सायवाडा,, गणेशपुर, चिचकुंभ रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

घाटलाडकी येथे 3 कोटी 75 लक्ष रुपये निधीतुन विविध विकासकामांचे भुमिपूजन

घाटलाडकी, राजस यांचे घर ते राममंदिर पर्यंत रस्ता व बांधकामाचे लोकार्पण, कब्रस्थान, संरक्षकभिंत, ओटा व रस्ता बांधकाम करणे, शांतिनगर गवळी येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे. तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी केले. दलितवस्ती, मातंग समाज व अण्णाभाऊ साठे परिसराचे सौदर्यकरणाचे कामाचे भुमिपुजन, घाटलाडकी येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम करणे, सिमेंट कॉक्रीट जोडरस्ता बांधकामाचे, सभागृह बांधकामाचे व येथील सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकामाचे सुमारे 3 कोटी 75 लक्ष प्राप्त निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमिपूजन आज श्री कडू यांनी केले.

ब्राम्हणवाडा येथे विकासकांमांचे भुमिपूजन

बाम्हणवाडा थडी येथे 61 लक्ष निधीतून मोठया पुलाचे बांधकाम, तांडावस्ती योजनेअंतर्गत 5 लक्ष निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम, नागोवा तांडा येथे 4 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, 90 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम, 60 लक्ष रुपयांच्या निधीतुन सभागृहाचे बांधकाम, 51 लक्ष रुपयांच्या निधीतुन सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकाम करणे, सभागृह व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

00000

Wednesday, February 2, 2022

बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस - राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 









बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस

- राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

परतवाडा येथे मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ

 

अमरावती, दि. 02 : बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मध्यान्य भोजन योजना कामगारांना निश्चितच मदतनीस ठरणार, असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेंतर्गत मध्यान्य भोजन योजना राबविण्यात येते. अचलपूर उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार मदन जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभयकुमार बारब्दे, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे आदी यावेळी उपस्थित होते.

मजूरांना पूर्ण व सकस अन्न उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून श्री. कडू म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात येतात. कामानिमित्त मजूरांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणावर होते. कामाच्या अनिश्चिततेचा परीणाम त्यांच्या जेवणावर होतो. याचा परीणाम कामगारांच्या शारिरिक क्षमतेवर होतो. यासाठी कामगारांना रोज सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात येते.  कोरोना काळ असल्यामुळे सध्या मध्यान्य भोजन योजनेत कामगारांना मोफत भोजन देण्यात येत आहे. नोंदणीकृत मजूरांची संख्या लक्षात घेऊन भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु नोंदणी अभावी एकही बांधकाम कामगार उपाशी राहू नये, याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. नोंदणी न झालेल्या बांधकाम कामगारांची त्वरित नोंदणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मध्यान्य भोजन योजनेमध्ये कामगारांना एका वेळच्या भोजनात बाराशे कॅलरीज मिळतील एवढा आहार देण्यात येतो. या आहारात पोळी, दोन भाज्या, डाळ, भात व इतर आहाराचा समावेश आहे. या योजनेमुळे कामगारांच्या स्थलांतरावर आळा बसून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. परतवाडा येथे प्रथमच कामागारांसाठी मध्यान्य भोजन योजना सुरु होत असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मध्यान्य भोजन योजना सध्या अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु राहील. गरजेप्रमाणे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मजूरांना भोजन उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती राहुल काळे यांनी यावेळी दिली.

 

जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाला लवकरच नवीन इमारत

 

जिल्हा व अप्पर जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघामार्फत राज्यमंत्री श्री. कडू यांचा सत्कार करण्यात आला.  वकील संघासाठी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी संघामार्फत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयीन कामांना वेग येऊन प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी न्याय व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. न्यायदानाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज असावी. विधीज्ञांना बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र कक्षांचा त्यात समावेश करण्यात  येईल. तसेच आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन न्यायालय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले. वरिष्ठ विधिज्ञ ॲङ सुरेश गुलक्षे, संघाचे अध्यक्ष ॲङ विजय गोडबोले, उपाध्यक्ष ॲङ. मोहम्मद सलिम, सचिव ॲङ आशिष अग्रवाल तसेच विधिज्ञ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष हिवराळे तर आभार श्री. सलिम यांनी मानले.

 

श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परीसरातील रस्ते बांधकामाचा शुभारंभ

 

परतवाडा येथील श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परिसरात रस्ते बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण कामाचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हे विकास काम करण्यात येणार असून यासाठी 51 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता संस्थानामार्फत श्री. कडू यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मिश्रा चौक येथील गणपती सभागृह बांधकाम, टिळक चौकाचे डांबरीकरण, आठवडी बाजार ते पोलीस स्टेशन रोड डांबरीकरण तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

00000

 

                                                                                               

Tuesday, February 1, 2022

कोविड-19 निर्बंधांत शिथीलता पर्यटनस्थळे, सफारीला परवानगी अंत्यविधीला उपस्थित संख्येवरील मर्यादा काढली





कोविड-19 निर्बंधांत शिथीलता

पर्यटनस्थळे, सफारीला परवानगी

अंत्यविधीला उपस्थित संख्येवरील मर्यादा काढली

 

अमरावती, दि. 1 : कोविड प्रतिबंधासाठी लागू काही निर्बंधात राज्य शासनाच्या आदेशानुसार शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानुसार पर्यटन सफारीवरील निर्बंध हटवल्याने जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सफारी आदी सुविधा पुन्हा सुरू होत आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे.

 

हे आदेश दि. 1 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण लागू आहेत.

 

दोन्ही मात्रांचे लसीकरण आवश्यक

 

आदेशानुसार, जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, त्याअंतर्गत येणा-या चिखलदरा येथील संरक्षित क्षेत्रातील निसर्ग पर्यटन, जंगल सफारी, तसेच गाविलगड किल्ला, चिखलदरा तिकीट विक्री आदींसह सर्व प्रकारची पर्यटनस्थळे, सफारी सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पर्यटनासाठी भेट देणा-या सर्व अभ्यागतांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

 

स्पाबाबत

 

सर्व प्रकारचे स्पा हे त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 *टक्के* क्षमतेसह सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापि, यापूर्वीच्या आदेशात केशकर्तनालये, ब्युटी पार्लर्सला लागू निर्बंध स्पाला ही लागू राहतील.

 

अंत्यविधी कार्यक्रमाला उपस्थित संख्येची मर्यादा हटवली

 

त्याचप्रमाणे, अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी व्यक्ती संख्येवर मर्यादा राहणार नाही.

 

लसीकरण वाढण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

 

राज्यात ज्या जिल्ह्यांचे कोविड प्रतिबंधक प्रथम मात्रेचे लसीकरण 90 टक्के व दुस-या मात्रेचे लसीकरण 70 टक्के पूर्ण झाले, त्यांना अधिक प्रमाणात शिथीलता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी  विविध माध्यमे, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आदी जनजागृती करून नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पॉझिटिव्हिटी रेट घटल्यास शाळा सुरू होतील

 

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्के असल्याने शाळा- महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यास त्याबाबत निर्णय होईल.

 

कोविडबाधितांची संख्या अद्यापही मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तणूकीचे पालन करावे. ज्यांचे अद्यापही लसीकरण झाले नाही किंवा दुसरी मात्रा झाली नसेल त्यांनी ते करून घ्यावे. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनीही लसीकरण करून घ्यावे जेणेकरून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणे प्रशासनाला सुलभ होईल. बुस्टर डोसही फ्रंटलाईन वर्कर्स, कोमॉर्बिड व ज्येष्ठांना देण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

 

000

 

 

--

 


#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...