Monday, October 19, 2020

भूजल पातळीत सुधारणेसाठी होणार योजनेची अंमलबजावणी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



राज्यात 13 जिल्ह्यांत अटल भूजल योजना, अमरावतीचाही समावेश
 भूजल पातळीत सुधारणेसाठी होणार योजनेची अंमलबजावणी
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        अटल भूजल योजना अमरावती जिल्ह्यासह राज्यात 13 जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सूक्ष्म सिंचनातून भूजल पातळीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.

         केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार, वरूड व मोर्शी तालुक्याचा या योजनेत समावेश आहे. भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जलसंधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाय योजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. भूजलाच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तालुक्यांतील भूजलपातळीत सुधारणा घडून येण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

         हा कार्यक्रम राबविण्यासाठी  राज्य स्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी व इतर तरतुदींबाबत शासनाकडून निर्णय निर्गमित होतील, अशी माहिती ‘भूजल सर्वेक्षण’चे संजय कराड यांनी दिली.

        योजनेत राज्यातील एकूण 73 पाणलोट क्षेत्र, 1 हजार 339 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 443 गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्राकरीता या योजनेंतर्गत केंद्र शासन व जागतिक बँक यांच्याकडून अधिकतम एकूण रूपये ९२५ कोटी ७७ कोटी रूपये एवढे अनुदान पाच वर्षांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये १८८ कोटी २६ लाख रूपये हे संस्थात्मक बळकटीकरण व क्षमता बांधणी या घटकासाठी आहेत. तर अधिकतम रु. ७३७.५१ कोटी रूपये विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या पूर्ततेअंती प्रोत्साहन अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. 

         राज्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित पाणलोटक्षेत्रांना प्राधान्य देऊन ७३ पाणलोटक्षेत्रातील १४४३ गावांमधून सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

      अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अन्य विभागांमार्फत एककेंद्राभिमुखता (Convergence) करण्यास मान्यता देण्यात आली. या विभागांकडून पूर्ण होणाऱ्या कामांच्या पुर्ततेनंतर केंद्र शासनाकडून प्रोत्साहन अनुदान प्राप्त होईल.  तथापि, पाच वर्षांकरीता योजनेत समाविष्ट विभागांसाठी आवश्यकतेप्रमाणे एकूण रू. ३६८ कोटी ६३ लक्ष रूपयांची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यास करण्यात येणार आहे.

                                                            000

Sunday, October 18, 2020

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीची वेळ वाढलीगरजूंना ऑनलाईन आरोग्य सल्ला मिळवण्यासाठी उपयुक्त सेवा- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीची वेळ वाढली
गरजूंना ऑनलाईन आरोग्य सल्ला मिळवण्यासाठी उपयुक्त सेवा
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

     कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला मिळण्यासाठी शासनाकडून ई- संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली. या सेवेची वेळ आणखी दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. गरजूंना आरोग्य तज्ज्ञांकडून घरबसल्या वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी या सेवेचा लाभ होत आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

      कोरोना साथीच्या व त्यानुषंगाने जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात रूग्णांना घरबसल्या आरोग्य सल्ला मिळावा या हेतूने ई- संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली असून, त्याचा लाभ अनेकांना होत आहे. ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.

       नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडी सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 9.30 ते दु. 1.30 या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जात होता. आता या वेळेत वाढ करुन दु. 3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत देखील ओपीडी सुरु असणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत असतानाच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या सुविधांची भर घालण्यात येत आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा राज्यभर सुरू करण्यात आली. या माध्यमातून एखादा रूग्ण आपल्या आजाराबाबत माहिती देऊन डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकतो. आता दुपारनंतरदेखील ओपीडी सुरू झाल्याने गरजूंना त्याचा लाभ मिळेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

        या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ॲण्ड्राईड आधारीत ॲप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोन धारकांना होत आहे.

      राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो.  

            ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd&hl=en_US

ई-संजीवनी ओपीडी ॲप :

1)   मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

2) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.

3) डॉक्टरांशी चर्चेनंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

000

'दिलखुलास' कार्यक्रमात महिला आणि बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



'दिलखुलास' कार्यक्रमात महिला आणि बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

      माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात 'महिलांचे सक्षमीकरण व बालकांचे संरक्षण' या विषयावर  या विषयावर महिला आणि बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

       ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     या मुलाखतीत कोरोना काळात बालसुधारगृहांची घेतलेली काळजी, टाळेबंदीच्या काळात घरातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारविरोधात विभागाने केलेली मदत,कुपोषण निर्मूलनासाठी केलेले कार्य, कोरोना काळात सुरळीतपणे  ठेवलेली घरपोच पोषण आहार योजना, प्रतिपालकत्व योजना राज्यात उभारण्यात येणारी महिला आणि बालविकास भवन, अंगणवाडयांचा विकास,सीएसआर अंतर्गत कंपन्यांचा विकास अशा विविध मुद्द्यांवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Saturday, October 17, 2020

प्रभावी कार्यासाठी आंतरिक संवाद महत्वपूर्ण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पीआरसीआयतर्फे इंटरनल कम्युनिकेशन ट्रेंडस् 2020 विषयी वेबिनारमध्ये चर्चा
   प्रभावी कार्यासाठी आंतरिक संवाद महत्वपूर्ण
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
           डिजीटल साधनांनी संवादाच्या प्रक्रिया विविध स्तरांवर बदल केले आहेत. आंतरसंवादासाठीही डिजीटल माध्यमांचा मोठा वापर होत आहे. हे बदल सकारात्मकपणे स्वीकारून आंतरसंवाद दृढ केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातील संस्थेच्या व कार्य- आस्थापनांच्या प्रगतीसाठी सहकाऱ्यांमधील आंतरिक संवाद ही महत्वपूर्ण बाब आहे. या दशकात तंत्रज्ञानाने घडवलेले बदल सुसंवादासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

             पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) अमरावती चॅप्टरतर्फे इंटरनल कम्युनिकेशन ट्रेंडस-2020 या विषयावर झूमच्या माध्यमातून राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे रिजनल डायरेक्टर विजय सातोकार, झी 24 तासचे आऊटपूट एडिटर अभिजित कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ‘पीआरसीआय’चे चेअरमन एमीरटस एम .बी.जयराम, नॅशनल प्रेसिडेंट टी. विनयकुमार, सेक्रेटरी जनरल यु. एस. कुट्टी, सुंदरम पिल्लाई,  अन्नू रायना, अंकिता राव, डॉ. लता टी. एस., वेस्ट झोनचे चेअरमन अविनाश गवई, डॉ. आलोक जत्राटकर, विदर्भ प्रदेश समन्वयक राजेश बोबडे यांच्यासह कौन्सिलचे देशभरातील सदस्य व पीआर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना आंतरसंवाद कायम राखण्यासाठी विविध संवाद माध्यमांचा मोठा उपयोग झाला. दक्षतेसाठी अनेक कार्यालयांतून वर्क फ्रॉम होम सुरु असताना विविध कामांना चालना देताना संवादासाठी डिजीटल माध्यमांमुळे कामात सातत्य राखता आले. अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशा विविध घटकांशी थेट संवादाची सुविधा वापरता आली. अनेक महत्वाच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाल्या. 2020 ने निर्माण केलेले आंतरसंवादाचे नवे प्रवाह भविष्यातील सुदृढ सुसंवादासाठी मूलगामी ठरतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

           दिव्य मराठीचे राज्य संपादक श्री. आवटे म्हणाले की, आंतरसंवाद ही जनसंवादाची गुरुकिल्ली आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी आंतरसंवाद अत्यंत महत्वपूर्ण असून प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोविड साथीने निर्माण केलेल्या परिस्थितीत आंतरसंवाद प्रक्रियेवर परिणाम झाले. आंतरसंवादात भावनिकता महत्वाची असून, व्यक्त होण्याइतकेच ऐकणे व जाणून घेणेही महत्वाचे आहे. उत्तम आंतरसंवादाच्या साखळीतून लोकसंवाद प्रभावी होऊ शकतो.  राष्ट्रपिता महात्मा गांधी हे थोर संवादगुरु होते. मिस इन्फर्मेशन व डिसइन्फर्मेशन या संकल्पनाबाबत सोदाहरण सांगताना श्री. आवटे यांनी फोर-डी व इतर नव्या माध्यमांचे महत्वही त्यांनी  विशद केले. ग्राऊंड कॉमेंट, रिझल्ट ओरिएंटेड, इमोशनल कॉमेंट, ॲनालिटीकल ॲप्रोच व ट्रेडसेट अशी ‘ग्रेट’ या शब्दाची उकल करत या बाबी यशस्वी कार्यप्रणालीसाठी उपयुक्त असल्याचेही श्री. आवटे यांनी सांगितले.

          झी 24 तासचे आऊटपूट एडिटर श्री. कांबळे म्हणाले की, कुठल्याही संस्थेचे यशापयश हे संवादावर अवलंबून आहे.  यंत्रणेत काम करताना कार्यकारी, तसेच तांत्रिक या दोन्ही बाजू सांभाळताना आंतरिक संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो. कार्यक्षमता वाढविण्यासाठी व सुदृढ वातावरणनिर्मितीसाठी तो आवश्यक आहे. आंतरसंवादामुळे संवादाची निरंतर प्रक्रिया दृढ होत असल्याचे ते म्हणाले. विविध संस्थांत काम करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले.

         डॉ. विजय सातोकार म्हणाले, कोविडच्या काळात आंतरसंवाद टिकवून ठेवण्यासाठी डिजीटल साधनांना महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, परस्पर संवादात गैरसमजांचे अडथळे येऊ नयेत, यासाठी सुस्पष्टता आवश्यक आहे. प्रत्यक्ष संवाद प्रभावी असतो. मात्र, आंतरसंवादातून लोकसंवादाची साखळी मजबूत करण्यासाठी डिजीटल माध्यमे पुढील काळात महत्वपूर्ण ठरतील. ‘पीआरसीआय’चे चेअरमन एमीरटस एम .बी. जयराम यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

         चॅप्टरतर्फे चेअरमन हर्षवर्धन पवार, व्हाईस चेअरमन डॉ. विलास नांदूरकर, कोषाध्यक्ष भुषण पुसतकर, सचिव फुलसिंह राठोड, सहसचिव विजय राऊत, सदस्य डॉ. लोभस गडेकर, गौरव इंगळे, सागर राणे, योगेश गावंडे, प्रणाली जाधव, रुपल जैन, प्रशांत राठोड, राजश्री चोरपगार, दिपाली खडके, अनिल महल्ले आदी उपस्थित होते.

        श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नांदूरकर यांनी आभार मानले. कु. जाधव कु. जैन यांनी सुत्रसंचालन केले.

 

                                                000

Friday, October 16, 2020

जिल्हाधिका-यांकडून विविध कामांचा आढावाआवास योजनांच्या कामांना गती द्यावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिका-यांकडून विविध कामांचा आढावा
आवास योजनांच्या कामांना गती द्यावी
-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 16 : जिल्ह्यात आवास योजनांत रखडलेली व अपूर्ण कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.

           

बचत भवनात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रताप अडसड, जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र फातले, सर्व नपा मुख्याधिकारी व जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, रमाई आवास योजना व इतरही आवास योजनांतील रखडलेली कामे निश्चित कालावधी ठरवून नियोजनपूर्वक पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेत नगरपरिषद व नगर पंचायत हद्दीतील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेत प्रथम टप्प्यामधील कामे पूर्ण झाली आहेत. दुसरा टप्पाही प्रभावीपणे राबवावा. अनुकंपा प्रस्तावाबाबत यादी जिल्हास्तरावर अद्ययावत करुन पुढील प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी. नागरी भागामध्ये किमान एक प्रेक्षणीय स्थळ किंवा उद्यान असणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकांनी कार्यवाही करावी, तसेच किमान पन्नास विद्यार्थ्यांकरिता नागरी भागात सार्वजनिक वाचनालय करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

   सभेला कर व प्रशासकीय अधिकारी सागर ठाकरे, अमित सा. वानखडे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थीत होते. 

                                                000

कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा- जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश


कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश

      कोरोनाबाबत लक्षणे दिसताच सर्व प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे. यात निदान व उपचाराच्या प्रक्रिया गतीने राबविणे आवश्यक आहे. मृत्यूदर कमी होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

       कोरोना उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेताना ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, आजाराचे निदान होण्यापूर्वी सिटी स्कॅन काढल्यावर त्यावर कोरोनासदृश्य लक्षण आढळल्यास आरटीपीसीआर चाचणीद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे. लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करणे व दाखल करून घेणे ही प्रक्रिया गतीने होण्याची गरज असते. यात कुठेही हलगर्जी होऊ नये. गृह विलगीकरणातील व्यक्तींना टेलिमेडिसिनद्वारे सेवा पुरविण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही योगदान मिळणे आवश्यक आहे. गृह विलगीकरणातील व्यक्तींशी सतत संपर्क असावा. कुठलेही लक्षण आढळल्यास दाखल करणे व उपचाराच्या हालचाली तत्काळ व्हाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

Thursday, October 15, 2020

जिल्हाधिका-यांकडून विविध महसूली कामांचा आढावा पांदणरस्त्यांच्या कामांचे नियोजन तत्काळ सादर करावे- जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिका-यांकडून विविध महसूली कामांचा आढावा
 पांदणरस्त्यांच्या कामांचे नियोजन तत्काळ सादर करावे
-    जिल्हाधिकारी शैलेश नवाल

     जिल्ह्यातील पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आवश्यक तिथे सर्वदूर पांदणरस्त्यांची बांधणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक उपविभागातील अपेक्षित कामांची गरज लक्षात घेऊन या कामाचे नियोजन व प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

      जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी विविध तालुक्यांतील महसूलविषयक कामांचा आढावा उपविभागीय अधिका-यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, प्रियांका आंबेकर, संदीपकुमार अपार, नितीनकुमार हिंगोले, रणजीत भोसले यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पांदणरस्त्यांच्या अपेक्षित कामांचे नियोजन व प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी महाराजस्व अभियानाची परिपूर्ण अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार कार्यवाही करावी. एका महिन्यात सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढावेत.  पीएम किसान योजनेत प्रलंबित कार्यवाही पूर्ण करावी. रोजगार हमी योजनेत अधिकाधिक विकासकामे राबविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.    

  000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...