Friday, January 28, 2022

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा - शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 







शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडून परीक्षांचा आढावा

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा

-          शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 28 : दहावी तसेच बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. गत दोन वर्षापासून कोविड संक्रमणामुळे शिक्षण व परीक्षा पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दत आणि प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी यामध्ये फरक आहे. इंटरनेट अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बरेचदा ऑनलाईन शिकवणीपासून वंचित राहतात. या बाबींचाही सर्वांगिण विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षा पध्दतीचे नियोजन व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या समवेत शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शासकीय विश्रामगृह येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आभासी बैठकीमध्ये दहावी-बारावीच्या होवू घातलेल्या परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम आदींबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयी अभावी विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नये यासाठी या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ मिळावा. सध्या परिवहन महामंडळाच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित सुरु नाहीत. बरेच विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात जातात. असे विद्यार्थी वाहतूकीच्या सोयी अभावी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शाळा तेथे केंद्र’ देण्यात यावे. अथवा अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, याबाबींचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले.

परीक्षा प्रक्रिया राबवितांना सीबीएससी बोर्ड प्रमाणे परीक्षा घेता येतील का, याचेही नियोजन करण्यात यावे. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत नियोजनपूर्वक कार्यपध्दती राबवा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यामध्ये या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या लसीकरणाला वेग येण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी मायक्रोप्लॅनिंग करण्यात यावे. या परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

शासनातर्फे महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना तसेच बाल संगोपन निधी योजना राबविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या महिला व त्यांची अपत्ये या योजनेत बसणार नाहीत त्यांना शैक्षणिक मदत करण्यात येईल. अनाथ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिलांना प्रामुख्याने या योजनेचा लाभ देण्यात येईल. विद्यार्थी दत्तक योजनेबाबतही श्री. कडू यांनी संबंधितांशी चर्चा केली.

महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त समाधान शिंगवे, उपसंचालक डॉ. शिवलींग पटवे, विभागातील पाचही जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यावेळी आभासी पध्दतीने बैठकीला उपस्थित होते.

00000

Thursday, January 27, 2022

नागरी सुविधांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी - बच्चू कडू

 










नागरी सुविधांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी

-      बच्चू कडू

अचलपूर येथे 12 कोटी रुपयांच्या निधीतून विविध  विकासकामांचे भूमिपूजन

 

          अमरावती दि 27 : गावातील रस्ते, पूल, पाणी पुरवठा, वीज या मुलभूत  नागरी सुविधांची निर्मिती करताना कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण  करण्यावर भर द्यावा. शाळेतील वर्गखोल्या, सभागृह, व्यायामशाळांमध्ये  अद्ययावत उपकरणांची व्यवस्था व त्याची वेळोवेळी देखभाल करण्याचे निर्देश  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अचलपूर तालुक्यातील राजनाथ-मेघनाथपूर-बोरगाव पेठ ते निजामपूर रस्त्याचे डांबरीकरण, गावातंर्गत 200 मिटर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे असे 2 कोटी रुपये निधीतून करण्यात आलेल्या कामाचे भूमिपूजन श्री.कडू यांच्या हस्ते आज करण्यात आले.

      सरपंच शिवराज काळे, उपसरपंच विश्वास भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पराग सोटे, उपअभियंता अविनाश बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.

      जिल्हा वार्षिक योजना, विशेष प्राप्त निधी, तांडा वस्ती योजना अशा विविध योजनेतील  सुमारे 12 कोटी रुपयांच्या प्राप्त निधीतून  विविध विकासकामांचे भूमिपूजन श्री.कडू यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते.

         अचलपूर तालुक्यातील भुगाव येथे विशेष निधीतुन प्राप्त ग्रामपंचायत परिसरात महादेव मंदीर सभागृहाचे बांधकाम 21 लक्ष रुपये, 10 लक्ष रुपये निधीतून रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकामाचे लोकार्पण, जिल्हा वार्षिक योजनेच्या 43 लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण श्री.कडू यांनी केले. जवर्डी व शेकापूर येथे ग्रामपंचायत परिसरात सभागृहाची निर्मिती व अंतर्गत  रस्त्याचे काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करण्यात आले. जवर्डी व शेकापूरला 32 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहीती संबंधीतांनी यावेळी दिली.

    निजामपूर ग्रामपंचायतीचे सभागृह, अंतर्गत रस्ता बांधकामाचे 22 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण श्री. कडू यांनी केले. नायगाव येथे समाजमंदिराचे सौंदर्यीकरणासाठी 5 लक्ष, मागासवर्गीय वस्तीतील रस्त्यासाठी 10 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आलेल्या कामाबाबत श्री.कडू यांनी सुचना केल्या. बळेगाव येथे काँक्रीटीकरण व  बौद्ध मंदिराच्या  सौंदर्यीकरणासाठी 17 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.

   बोपापुर, चमक खुर्द, खोजनपुर,सुरवाडा, नायगाव,बोर्डी, चौसाळा,कवीठा, देवमाळी व सावळी उदान या गावातील अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण, सभागृहे आदींच्या कामाचे लोकार्पण श्री.कडू यांनी केले. यावेळी संबंधित अधिकारी नागरिक उपस्थित होते.

                                                     कामे गतीने पूर्ण करावी

        बामणी-बल्लारपूर-चंद्रपूर-यवतमाळ-अमरावती-अचलपूर-हरीसाल-धारणी-बऱ्हाणपूर रस्त्याचे डांबरीकरण व नुतणीकरण करणे, अचलपूर शहरी रस्त्याचे बांधकाम, परतवाडा ते अचलपूर शहर रस्ता,अचलपूर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाची 32 कोटी 46 लक्ष रुपयांच्या निधीतून सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.कडू यावेळी दिले.

                                                                   000000

 

दहा कोटी रू. निधीतून अनेक विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 









दहा कोटी रू. निधीतून अनेक विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते   भूमिपूजन

जिल्ह्यात सर्वदूर विकासकामांना चालना

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २७ : श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पर्यटक विसावा केंद्राच्या पुढील टप्प्याचे काम, यावली-वऱ्हा राज्य मार्ग सुधारणा, तिवसा क्रीडा संकुलात सभागृह अशा अनेक महत्वपूर्ण कामांचे भूमीपूजन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांची विविध कामे पूर्णत्वास जात असताना अनेक नव्या कामांना चालना देण्यात येत आहे, ही विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

गावागावांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांचे भूमीपूजन आज झाले. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून यावली-आडगाव- मोझरी- वऱ्हा राज्यमार्ग सुधारणा, दीड कोटी रुपये निधीतून आडगाव-कार्ला रा. मा. ३०३, सुमारे ७० लक्ष रुपये निधीतून तिवसा क्रीडा संकुलात बहुउद्देशीय सभागृह, तसेच  ६८ लक्ष रुपये निधीतून कौंडण्यपूर येथे पर्यटक विसावा कामाच्या पुढील टप्प्याचे, जि. प. शाळेच्या शिंदवाडी येथील वर्गखोल्या बांधकाम, ८५ लक्ष निधीतून अंजनसिंगी कौंडण्यपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, सुमारे ६९ लक्ष निधीतून अंजनगाव मसदी रस्ता सुधारणा, तळेगाव ठाकूर येथे सुमारे ४९ लक्ष निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची ऑपरेशन थिएटर दुरुस्ती, नवीन सुविधा, कुंपण भिंत, रस्ता काँक्रीटीकरण, सुमारे १० लक्ष निधीतून सार्वजनिक सभागृहाचे आदी कामांचे भूमीपूजन, तसेच दुर्गवाडा, धारवाडा, अलवाडा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले.

 

जि. प. सभापती पूजा आमले, पं.  स. सभापती शिल्पा हांडे, संदीप आमले, वैभव वानखडे, मुकुंदराव देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी  चेतन जाधव आदी उपस्थित होते.

 पालकमंत्र्यांनी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन पर्यटक विसाव्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील विश्रामगृह, घाट आदी ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुधारणा व नव्याने करावयाच्या कामांचे इस्टीमेट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गत दोन वर्षात जिल्ह्यात अनेक महत्वाची कामे झाली.अनेक कामे सुरू आहेत. कामांची गरज ओळखून पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याने विकासाचा प्रवाह गतिमान झाला आहे. यापुढेही आवश्यकतेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 

०००

 

 

 

 

 

 

 

'नवतेजस्विनी'अंतर्गत जिल्ह्यात नऊ केंद्रे सुरू होणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 














नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पात तिवसा गारमेंट व एलईडी प्रशिक्षण केंद्र

'नवतेजस्विनी'अंतर्गत जिल्ह्यात नऊ केंद्रे सुरू होणार

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २७ : सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलाभगिनींमध्ये कौशल्य विकासाबरोबरच उद्यमशीलतेचा विकास करण्यासाठी जिल्ह्यात 'नवतेजस्विनी'अंतर्गत नऊ ठिकाणी प्रशिक्षण व उत्पादन निर्मिती केंद्रे सुरू करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

तिवसा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि सक्षम लोकसंचालित साधन केंद्रातर्फे रेडिमेड गारमेंट व एलईडी लाईटनिर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सभापती पूजा आमले, पं. स. सभापती शिल्पा हांडे, 'माविम'चे सुनील सोसे व एमसीईडीचे प्रदीप इंगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिलांना प्रगती साधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नवतेजस्विनी उपक्रमाची आखणी केली. या उपक्रमातून अनेक महिलांना प्रशिक्षणाबरोबरच उद्यमशीलतेचाही विकास व्हायला मदत होईल. तिवसा येथे केंद्रासाठी आवश्यक मोठी जागा मिळवून देऊ, तसेच नांदगावपेठेतही युनिट उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बचत गटांच्या सदस्य महिला, प्रशिक्षक व नागरिक उपस्थित होते.

00000

 

परिणामकारक अंमलबजावणीसाठी जाणिवेने प्रयत्न करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 



अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या

परिणामकारक अंमलबजावणीसाठी जाणिवेने प्रयत्न करा

                                               -जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि. 27 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात प्रलंबित पोलीस तपासावर असणाऱ्या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यात यावा. अशा प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन पीडितांना लवकर न्याय मिळण्यासाठी जाणीवेने प्रयत्न व्हावेत, असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, सरकारी अभियोक्ता गजानन खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक के. पी. सुलभेवार, समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सुदेश कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत डिसेंबर 2021 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती श्रीमती कौर यांनी जाणून घेतली. ही प्रकरणे निकाली निघण्यासाठी सुरु असलेल्या कार्यवाहीची संबंधितांना विचारणा केली. सन 2016 पासून प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा तात्काळ पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. गंभीर गुन्हे घडलेली गावे, वस्त्या व याबाबत पोलीस विभागाची कार्यवाही याचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्हा प्रशासन व पोलीस विभागानी तत्पर कार्यवाही करून संबंधित पिडीतांना लवकर न्याय मिळून द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

उपविभागीय दक्षता समितीमध्ये अशासकीय सदस्यांची निवड करण्याबाबत माननीय पालकमंत्री महोदय यांना विनंती करण्यात आली आहे. तसेच अधिनियमांतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या पीडितास किंवा त्यांच्या वारसदारांना निर्वाह भत्ता, रमाई घरकुल आवास, पीडितांच्या अपत्यांना शिक्षणासाठी मदत, अत्याचारग्रस्त कुटुंबाला अन्न-धान्य, वस्त्र, वैद्यकीय मदत व इतर आवश्यक सुविधा देण्याची तरतूद आहे. अर्थसहाय्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी वेळीच कागदपत्रे सादर केल्यास अर्थसहाय्याची कार्यवाही लवकर पूर्ण होऊ शकेल, असे श्रीमती माया केदार म्हणाल्या.

00000

Wednesday, January 26, 2022

आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होणे हा प्रत्येक गावकऱ्यांचा हक्क - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

 














आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होणे हा प्रत्येक गावकऱ्यांचा हक्क

- पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

प्रजासत्ताकदिनी 17.65 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन

 

      अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील 17.65 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन केले.

अचलपूर तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र, येसुर्णा येथील नवीन इमारत व निवासस्थानाचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. गावातील एकही नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी येसुर्णा आरोग्य वर्धिनी केंद्र अत्यंत महत्तवपूर्ण आहे. गावकऱ्यांना गावातच सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारण्यात याव्यात तसेच इमारतीच्या बांधकामातील राहिलेल्या कामांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी, अशा सूचना त्यांना यावेळी दिल्या. गावाच्या विकासात्मक कामासाठी गावकऱ्यांनीही आग्रही असावे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी येथील प्रयोगशाळा, शस्त्रक्रियागृह, प्रसुती कक्ष, हिरकणी कक्ष आदींची जातीने पाहणी केली. या आरोग्य केंद्रासाठी स्व. वासुदेव काळे यांनी त्यांची जमीन उपलब्ध करुन दिली होती. त्याचे स्मरण म्हणून आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची पत्नी आणि मुलाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

अचलपूर तालुक्यातील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र,असदपूर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण

        श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीचे बांधकाम तसेच येथे उपलब्ध आरोग्य सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत आणि निवासस्थानाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. आरोग्य सुविधा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून प्रत्येकाला आपल्या गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी अशा आरोग्य केंद्राचे महत्त्व वादातीत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी खल्लार ते आसेगाव या रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले. या कामाची किंमत 12.55 कोटी एवढी आहे. तसेच अचलपूर तालुक्यातील खांडवी, मेंढवळ, पातुर्डा, नेर, नांदखेड, किनखेड, दर्यापूर, चांदूरबाजार या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले. या कामाची एकूण किंमत 500 लक्ष एवढी आहे. या विकास कामांमध्ये आसेगाव ते दर्यापूर रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. असदपूर येथील मिशनरी दवाखान्याकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचेही यावेळी भूमीपूजन करण्यात आले. या कामाची एकूण किंमत 10 लक्ष एवढी आहे.

     महिमापूर येथील ऐतिहासिक सात मजली पायविहीरची पाहाणी श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. या विहीरीचे बांधकाम अंदाजे तेराव्या शतकातले असून पुरातत्तव विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकमध्ये (विहीर) याचा समावेश होतो. या विहीरीला 85 पायऱ्या असून ती 110 फुट खोल आहे. तसेच विहीरीच्या आत अकरा कमानी असून पाच चौक आहेत. ऐतिहासिक विहीरीचा बराचसा भाग खचत असून डागडूजीची अत्यंत आवश्यकता आहे. पुरातत्त्व विभागामार्फत या विहीरीच्या डागडूजीसाठी लवकरच कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. श्रीमती ठाकूर यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून लवकरच या ऐतिहासिक विहीरीचे जतन करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     आमदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, वैद्यकीय अधिकारी अभिजीत काळे तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

 

अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 






अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

इमारतीचे काम फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. या कामांत अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे कामही महत्वाची उपलब्धी ठरेल. हे काम गुणवत्ता राखून फास्ट ट्रॅकवर पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

अमरावती तालुका प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता अरूंधती शर्मा, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. अमरावती तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कार्यालयांचा समावेश असलेली एक उत्तम इमारत उभी राहणार आहे. हे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण व्हावे. इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विविध कार्यालयांचा समावेश

तालुका प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल सेतू कार्यालय, मुद्रांक कार्यालय, लोकअदालत, भूमि अभिलेख तालुका निरीक्षक, तहसील कार्यालय, महसूल कार्यालय, उपकोषागार कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वन कार्यालय, तालुका कृषी अधिकारी आदी कार्यालयांचा समावेश असेल. तळमजल्याचे 1 हजार 827.67 चौ. मी., तर पहिल्या मजल्याचे क्षेत्र 1 हजार 801.65 चौ. मी. असेल. या कामासाठी 14 कोटी 97 लक्ष रू. प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. काम पूर्ण कालावधी 10 महिने आहे.

 

00000

 

 

 

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...