Tuesday, December 22, 2020

पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता अमरावती शहरात रात्र संचारबंदी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 



ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार

पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता

अमरावती शहरात रात्र संचारबंदी

- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

            अमरावती, दि. 21: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.  अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात 22 डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 वाजतापासून सकाळी सहा वाजतापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

 

            ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे.  कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून यापूर्वीच संचारबंदी लागू होती. तथापि, व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी मिशन बिगिन अगेन धोरणांतर्गत दक्षता नियमांचे पालन करण्याच्या अटीसह टप्प्याटप्प्याने शिथीलता आणण्यात आली. त्यावेळी पारित केलेले सर्व आदेश व सूचना 31 डिसेंबरपर्यंत कायम आहेत. त्याचप्रमाणे, शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  या आदेशाचा भंग करणा-याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 नुसार कारवाई करण्याचे निर्देशही  जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

 

नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे

 

००००

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...