टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती
अमरावती, दि. 26 (जिमाका): भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी केले आहे.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण (किंवा समतुल्य) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीतील कामगिरी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विमा क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानावर आधारित केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम (NSC किंवा KVP स्वरूपात) जमा करावी लागेल. प्रशिक्षणांनंतर उमेदवारांना सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल. मात्र, नियुक्तीच्या तीन वर्षांच्या आत आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच हा परवाना कायमस्वरूपी केला जाईल.
ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444620 येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. निवड प्रक्रियेबाबतचे अंतिम अधिकार भारतीय डाक विभागाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
00000
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत
अमरावती, दि. 26 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांसाठी ही स्पर्धा असून, पात्र साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत सन 2025 च्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका आणि पुस्तके या विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करणे आवश्यक आहे. 30 जानेवारीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज आणि पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठविली जाणार आहेत. मराठी साहित्यातील विविध प्रकारांमधील उत्कृष्ट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
000000
शहरात कलम 37 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 26 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 28 डिसेंबर ते दि. 11 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.
000000
वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन
अमरावती, दि. 26 (जिमाका) : वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ 26 डिसेंबर हा दिवस सन 2022 पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.
बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
000000
नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा
अमरावती, दि. 26 (जिमाका): मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग खेळण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा संदर्भात अत्यंत कठोर पवित्रा घेतला असून, वापरकर्ते आणि विक्रेत्यांवर 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड प्रस्तावित केला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्याच्या पालकांना 50 हजार रुपये दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना सापडल्यास त्यांनाही 50 हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा सापडेल, त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार रुपये दंड आकारण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांना 5 जानेवारी 2026 रोजी नागपूर खंडपीठासमोर हजर राहून आपले निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जर कोणीही हजर राहिले नाही, तर जनतेचा या दंडाच्या रकमेला आक्षेप नाही असे गृहीत धरून ही कारवाई अंमलात आणली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.
सन 2021 पासून नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जातात किंवा गंभीर दुखापत होते. या गंभीर समस्येची दखल घेत न्यायालयाने आता आर्थिक दंड लावून अंकुश ठेवण्याचे ठरवले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment