Friday, December 19, 2025

DIO NEWS 19-12-2025

                             

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त

विविध सामाजिक उपक्रम

अमरावती, दि. 19 ( जिमाका): देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 115व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती क्षेत्रीय कार्यालयाने 'सेवा ही संकल्प' ही संकल्पना राबवत वर्धापन सप्ताह साजरा केला. 15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात बँकेने नफ्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.

या उपक्रमाचा मुख्य भाग म्हणून क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी वलगांव येथील श्री संत गाडगे महाराज परमधाम वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी बँकेच्या वतीने वृद्धाश्रमासाठी प्रवेशद्वाराची कमान, फूड ट्रॉली आणि सुका मेवा प्रदान करण्यात आला. बँकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक वर्गणीतून किराणा माल, फळे आणि ४ सीलिंग फॅनची भेट देऊन वृद्धाश्रमातील सोयी-सुविधांमध्ये भर घातली.

बँकेचा हा सेवायज्ञ केवळ वृद्धाश्रमापुरता मर्यादित न राहता, अमरावती येथील अपंग कल्याण संस्थेलाही 10 सीलिंग फॅन भेट देण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने बँकेने शहराच्या विविध भागांत 115व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 115 वृक्षांची लागवड केली. या सर्व उपक्रमांविषयी बोलताना जिल्हा अग्रणी प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी ग्वाही दिली की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया भविष्यातही समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील. या यशस्वी आयोजनासाठी मुख्य प्रबंधक दीपक दाभोळे, शीतल मेश्राम, राजकुमार तरटे यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर;

अमरावतीत राज्यस्तरीय स्पर्धा

अमरावती, दि. 19 :(जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा स्पर्धेतून झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर 20 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. इंडियन राऊंड या क्रीडा प्रकारात झालेल्या चुरशीच्या लढतींमधून 17 व 19 वर्षांखालील गटात प्रथम चार क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 17 वर्षांखालील मुले गटात ऋषिराज लायबर (अमरावती), संस्कार खिल्लारे (पुणे), ऋचीर चौधरी (पुणे) आणि प्रतुष मोयर (अमरावती) यांचा समावेश आहे. मुलींच्या याच वयोगटात जान्हवी पवार (पुणे), राशी गर्दे (कोल्हापूर), स्वरांजली बनसुडे (पुणे) आणि श्रावणी पवार (अमरावती) यांनी बाजी मारली. 19 वर्षांखालील मुले गटात प्रथमेश पारते (पुणे),यश पाटील (कोल्हापूर), निखील कडवे (पुणे) आणि स्मित जोरवलकर (नागपूर) यांची निवड झाली, तर मुलींच्या गटात तनुश्री सोनवणे (नाशिक), श्रेया केसकर (कोल्हापूर), केतकी सातपुते (नाशिक) आणि आनंदी लायबर (अमरावती) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यशस्वी खेळाडूंना जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी राजू वढते, सलीम शेख आणि विविध समित्यांमधील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धांना पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य विभागानेही मोलाचे सहकार्य केले असून, क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग;

अनुभवी पुरवठादारांकडून दरपत्रके आमंत्रित

अमरावती, दि. 19 ( जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होणार असून, केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार होणाऱ्या संपूर्ण वाहन तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या मान्यतेनुसार, ही व्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया भाडे तत्त्वावर राबवली जाणार असून, यासाठी अनुभवी व्हिडिओ रेकॉर्डिस्ट आणि पुरवठादारांकडून मोहोरबंद दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक अनुभवी व्यक्ती किंवा संस्थांनी आपली दरपत्रके 'प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. दरपत्रके सादर करण्याची अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. वाहन चाचणीच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा उपक्रम प्रस्तावित करण्यात आला असून, विहित मुदतीत जास्तीत जास्त अनुभवी अर्जदारांनी आपले दरपत्रक सादर करावे, असे आवाहन आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

000000


आंतरराष्ट्रीय एआय परिषदेचे उद्घाटन संपन्न;

डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 19 ( जिमाका): शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे 'सामाजिक विकासासाठी एआय नवकल्पना' (ICAIISD-2025) या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज संपन्न्‍ा झाले.

प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून संशोधन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग जगतातील दुवा अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना जागतिक संशोधनाची दिशा समजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 'बुक ऑफ ॲबस्ट्रॅक्ट'चे प्रकाशन करण्यात आले.

समीर सावरकर यांनी आरोग्य क्षेत्रात एआयच्या भूमिकेबाबत सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी एआय आधारित स्क्रीनिंग तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरू शकते. तसेच, एसीएम नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष रविंद्र केसकर यांनी संशोधनातील डेटा विश्लेषणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. निरंजन जोशी यांनी अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. परिषदेतील मुख्य आकर्षण ठरलेल्या विशेष सत्रात आयआयएससी बंगळुरूचे प्रा. डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी यांनी 'डिजिटल हेल्थ'वर मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्य क्षेत्रातील एज कम्प्युटिंग, थ्री-डी संकल्पना आणि एआय समोरील आव्हाने याविषयी माहिती दिली. आयोजन समितीचे समन्वयक डॉ. शंतनु लोही यांनी आभार मानले.

000000





स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करावे

-सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा

अमरावती, दि. 19 (जिमाका): केंद्रीय आणि राज्य शासनात सेवेमध्ये रूजू होण्यासाठी स्पर्धा परिक्षा हा मार्ग आहे. यात प्राथमिक चाचणी, मुख्य परिक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यातून निवड केली जाते. या परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला वाशिम येथील सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांनी दिला.

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनिल टाकळे यांचे  मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी कौशल्या एस., सहायक आयुक्त विकास खंदारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, ग्रंथालय सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024च्या परिक्षेत 20वा क्रमांक पटकाविलेले आकाश वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्री. वर्मा यांनी, परिक्षा देण्यामागील उद्देश काय आहे, याचा विचार करून ही परिक्षा द्यावी. परिक्षा देण्याची संधी ही प्रत्येकाला असल्याने शासनात काम करण्याची संधी प्राप्त होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमुळे देशपातळीवर तसेच देशाबाहेरही सेवेची संधी प्राप्त होते. या परिक्षांची तयारी करीत असताना प्रामुख्याने अभ्यासक्रमावर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे. परिक्षांमध्ये काही प्रश्न हे अत्यंत कठिण असतात. त्यावेळी दिलेल्या पर्यायापैकी कोणते उत्तर योग्य राहिल, याची पडताळणी केल्यास मार्क वाढविण्यास मदत होईल. प्रामुख्याने राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास करावा.

परिक्षांमध्ये वेळेचा सदुपयोग आणि यश मिळविण्यासाठी चाचणी परिक्षा देणे आवश्यक आहे. यामुळे परिक्षेचा सराव होण्यास मदत मिळते. निबंध लिहिताना दिलेल्या विषयाला न्याय देणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय संविधान, चालू घडामोडी आणि इतर साहित्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच मुलाखतीला समोर जाताना समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय देण्याची तयारी केलेली असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य आणि संयम असणे आवश्यक असल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.

श्री. टाकळे यांनी, स्पर्धा परिक्षा देण्यामागील उद्देश स्वच्छ असणे आवश्यक आहे. परिक्षेची तयारी करताना परिक्षांचा आकृतीबंध समजावून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम आणि आयोगाची गेल्या वर्षातील प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. याचा सखोल अभ्यास करून या परिक्षांची तयारी करावी. प्राथमिक परिक्षा आणि मुख्य परिक्षांमध्ये कमी कालावधी असतो. त्यामुळे चाळणी परिक्षांची तयारी करताना मुख्य परिक्षेचा अभ्यास केल्यास लाभ मिळतो. त्यासोबतच केलेल्या अभ्यासातून स्वत:ची नोट काढल्यास त्याचा निश्चित फायदा मिळण्यास मदत होते. अभ्यास करताना स्वयंशिस्त महत्वाची असून यात अभ्यास आणि सराव महत्वाचा आहे. पूर्वीच्या परिक्षांचे प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास वेळेचा उपयोग आणि परिक्षांसाठी मानसिक तयारी होणे शक्य असल्याचे सांगितले.

विकास खंदारे यांनी स्पर्धा परिक्षांची कार्यशाळा आयोजनामागील उद्देश सांगितला. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.

सारिका  काळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.

000000

अमरावती जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते’ योजनेला सुरवात;

24 डिसेंबरला कंत्राटदारांचे चर्चासत्र

अमरावती, दि. 19 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेत शिवारातील अतिक्रमित झालेले पाणंद रस्ते मोकळे करणे आणि तेथे दर्जेदार, बारमाही दळणवळणास योग्य रस्ते तयार करणे हा आहे. ग्रामीण भागातील या पायाभूत सुविधेमुळे शेतकऱ्यांना पीक कापणी, मशागत आणि शेतमाल बाजारपेठेत नेणे सोपे होणार आहे. ही कामे पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने केली जाणार असून, कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी इच्छुक मशीनधारक व कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत.

या योजनेची कार्यपद्धती आणि निविदा प्रक्रिया कंत्राटदारांना नीट समजावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथील कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्या कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मशिनधारकांशी सविस्तर चर्चा करून खोदकाम, माती, मुरुम वाहतूक आणि रोड रोलरने दबाई करणे यासाठीचा ‘प्रति तास दर’ निश्चित केला जाणार आहे.

बैठकीनंतर जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय यंत्रधारकांचे एक पॅनेल तयार करण्यात येईल, जे प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामासाठी जबाबदार असेल. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व इच्छुक मशिनधारकांनी आणि कंत्राटदारांनी या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी ( रोहयो) यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...