Tuesday, December 23, 2025

DIO NEWS 23-12-2025











                                                         'एक दिवस सैनिकांसाठी'अभियान राबविणार

                                -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

            अमरावती, दि. 23 (जिमाका) : भारतमातेच्या संरक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत देश सेवा करणारे सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे पाल्य यांना जिल्हा प्रशासनाची मदत व्हावी, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, 'एक दिवस सैनिकांसाठी' हे अभियान राबविण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित विभाग त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सहकार्य करतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन-2025 निधी संकलन समारोहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गजरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश ठाकरे, जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, आपले सैनिक सीमेवर देश संरक्षणार्थ लढत असतात. रात्रंदिवस देशासाठी लढा देणाऱ्या सैनिकांप्रती आपल्याला अभिमान आहे. देशाची अखंडता, प्रगती, देशाचे अस्तित्व यांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे आपण सर्व ऋणी आहोत. देशसेवा करताना ते आपल्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. महसूल, मोजणी, कृषी, पोलीस विभाग अशा विविध शासकीय कार्यालयांकडे त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. येथे सैनिक बांधवांचे  तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सैनिक बांधव तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारी जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर यांच्याकडे नोंदवाव्यात. एक दिवस सैनिकांसाठी या अभियानांतर्गत या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

   भारत देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेव्हा इतरही जवळपासचे देश स्वतंत्र झाले. परंतु इतर देशांपेक्षा आपला देश ‘विकसित देश’ म्हणून आज नावारूपाला आलेला आहे. हे केवळ भारतीय सैनिकांचे दृढ मनोबल व इच्छाशक्तीमुळे शक्य झाले आहे. भारतीय सेना बल देशाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते, हा भारतीयांचा दृढ विश्वास आहे. सैनिक बांधव सीमेवर लढत आहे, त्यामुळेच आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहोत. आजवरच्या इतिहासात भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा आपण ऐकत आले आहोत. त्यांच्या शौर्यगाथेतून आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला निरंतर प्रेरणा मिळत राहील. सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  सशस्त्र सेना ध्वजदिन राबविण्यात येतो. यातून सैनिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी हा निधी खर्च करण्यात येतो. मागील वर्षी अमरावती जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त ध्वजनिधी संकलित केला. यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक ध्वजनिधी जमा करण्यासाठी आपण सर्व एकत्रितरित्या प्रयत्न करूया. यावर्षी  कोटी रुपये ध्वजनिधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवूया, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

            श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत ध्वजदिन निधी संकलनासाठी 25 लक्ष रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर पत्नी श्रीमती वनमाला, श्रीमती कांताबाई, श्रीमती नूतन, श्रीमती सरस्वती, श्रीमती सुनिता, श्रीमती मनुताई, श्रीमती रेणुका तसेच वीर माता श्रीमती रंभाई, श्रीमती बेबीताई ऊईके तसेच श्रीमती पथोड यांना सन्मानित करण्यात आले.

            विशेष गौरव पुरस्काराने माजी सैनिक भावे किशोर उत्तम यांचा मुलगा स्वराज,  श्रीमती वर्षा रमेश खडसे यांची मुलगी सावी, संतोष खंडूजी श्रीनाथ यांचा मुलगा आदित्य, वनकर अनिल खंडुजी यांची मुलगी निहारिका, तायडे वासुदेव व्यंकटराव यांचा मुलगा पियुष, विनोद बाबूलाल वानखडे यांची मुलगी संस्कृती यांना विशेष पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, शौर्यपदकधारक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाथरकर यांनी केले. संचलन वैभव निमकर तर आभार सुरेखा पथोड यांनी मानले.

00000

जागतिक कौशल्य स्पर्धेची विभागीय पात्रता फेरी आज

अमरावती, दि. 23 (जिमाका): व्यावसायिक शिक्षण आणि जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावतीत उद्या, 24 डिसेंबर 2025 रोजी जागतिक कौशल्य स्पर्धा विभागीय पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार भवन येथे ही स्पर्धा पार पडणार असून, जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांनी या विभागीय फेरीत आपले कौशल्य सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राने केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी होणारी जगातील सर्वात मोठी कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. 23 वर्षांखालील तरुणांसाठी ही स्पर्धा एखाद्या ऑलिम्पिक खेळाप्रमाणेच प्रतिष्ठेची मानली जाते. आगामी 2026 ची जागतिक कौशल्य स्पर्धा चीनमधील शांघाय येथे आयोजित करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारांची निवड जिल्हा, विभाग, राज्य आणि त्यानंतर देश पातळीवर केली जाणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या 47 व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत 63 सेक्टरमधून 50 देशांतील 10 हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता.

शांघाय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या सहकार्याने एकूण 63 क्षेत्रांशी संबंधित ही कौशल्य स्पर्धा होत आहे. अमरावती विभागात होणाऱ्या या पात्रता फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी

31 डिसेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 23 ( जिमाका): शैक्षणिक वर्ष 2019-20  ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्याची सूचना समाज कल्याण विभागाने दिली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्रलंबित राहणाऱ्या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असा कळविण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी-परीक्षा फी माफी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यांसारख्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अनेक महाविद्यालयांनी वारंवार सूचना देऊनही जुन्या वर्षांचे अर्ज अद्याप निकाली काढलेले नाहीत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र हिस्सा अदा करता येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी पात्र असूनही केवळ महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क वसूल करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी आवाहन केले आहे की, महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता करून घ्यावी. ज्या अर्जांची त्रुटीपूर्तता होणे शक्य नाही, ते अर्ज नियमानुसार 'रिजेक्ट' करावेत. सन 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांचे शंभर टक्के अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी महाविद्यालयातील सूचना फलक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि 'समान संधी केंद्रा'चा प्रभावी वापर करावा. मुदतीनंतर महाडीबीटी ॲडमिनकडून अर्ज 'ऑटो रिजेक्ट' झाल्यास त्याची जबाबदारी प्राचार्यांची निश्चित केली जाईल, असेही या कळविण्यात आले आहे.

00000000

निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना घरकुल मंजूर

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 23 (जिमाका) : निम्न पेढी प्रकल्पात यावर्षीपासून पाणी साठविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी गोपगव्हाण गावापर्यंत पाणी येणार आहे. त्यामुळे या गावातील स्थलांतरला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांना राहण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्न पेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी हातुर्णा, गोपगव्हाण, कुंडखुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर या गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाचा आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतरण करावे, यासाठी त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येत आहे. यासाठी त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थलांतरासाठी दोन लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार असून, विजेची समस्या निकाली काढण्यात येणार आहे. पाण्याचा प्रश्न असलेल्या गावात विंधनविहिरी घेण्यात येणार आहे.

बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या गावामधील स्थलांतराला वेग देण्यासाठी पुनर्वसित गावात प्रामुख्याने पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसित गावात पायाभूत सुविधांसाठी 57 कोटी रूपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. कुंड सर्जापूर येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. जागाही ठरविण्यात आली असून येत्या काही दिवसात याठिकाणी कामे करण्यात येतील. स्थलांतरण वेगाने व्हावे, यासाठी घरकुल मंजुरीचे पत्र आणि पहिला हप्ताही तातडीने देण्यात येणार आहे. तसेच स्थलांतरणाच्या भत्त्यासाठी नागरिकांचे अर्ज घेण्यात येणार आहे. यावेळी सरपंच यांनी पुनर्वसित गावात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...