Monday, February 14, 2022

अनाथ प्रमाणपत्रामुळे जयदीप होणार डॉक्टर

 अनाथ प्रमाणपत्रामुळे जयदीप होणार डॉक्टर


अमरावती, दि. १० : शिकण्याच्या ऐन उमेदीत त्याचे आई-वडील कोरोनामुळे दगावले. खूप शिकून मोठे होण्याची त्याची स्वप्न जवळपास धुळीला मिळाली होती. डोळ्यापुढे कोणताही आशेचा किरण दिसत नव्हता. अत्यंत हुशार असलेल्या जयदीप ला डॉक्टर व्हायचं होतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचे आई-वडील आता त्याच्यासोबत नव्हते. घरी कोणीही कमावणारा नाही त्यामुळे शिक्षणाचा खर्च कोण करणार आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश तरी कसा घ्यायचा अशा अनेक अडचणी त्याच्या समोर उभ्या होत्या. 

बुलढाणा जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील चिखली या गावचा जयदीप रामभाऊ भाकडे हा विद्यार्थी भविष्याची स्वप्न उराशी कवटाळून निराश झाला होता.पण अशा वेळेस त्याच्यासोबत उभ्या राहिल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर. एडवोकेट ठाकूर यांनी जयदीप ला अनाथ प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली. जयदीप नेम वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या प्रवेश परीक्षेत १४५  गुणांची कमाई केली मात्र या गुणांवर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नव्हता आणि खाजगी विद्यालयात जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. यावेळी त्याला मदत झाली ती केवळ अनाथ प्रमाणपत्राची. या प्रमाणपत्राच्या आधारे मिळालेल्या आरक्षणाच्या सहाय्याने त्याला औरंगाबाद जिल्ह्यातील घाटी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. इतकेच काय जयदीप ला प्रवेश मिळाल्यानंतर चिखली येथील दानशूर व्यक्ती श्री कोठारी यांनी पुढील पाच वर्षांकरिता जयदीप ला शिक्षणासाठी दरमहा दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले आहे. 

राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी अनाथ बालकांसाठी आरक्षणाचे विधेयक पास करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचा फायदा आता जयदीपसारख्या अनेक अनाथ विद्यार्थ्यांना होतो आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीसाठी मिळालेल्या एक्का आरक्षणातून अनेक तरुणांचे भविष्य उज्ज्वल होणार यात शंका नाही.

०००

Friday, February 11, 2022

शास्त्रज्ञ, उद्योजक, प्रगत मत्स्यशेतक-यांकडून मिळेल मार्गदर्शन‘प्रगत मत्स्यशेती’बाबत मंगळवारी वेबिनार

शास्त्रज्ञ, उद्योजक, प्रगत मत्स्यशेतक-यांकडून मिळेल मार्गदर्शन

‘प्रगत मत्स्यशेती’बाबत मंगळवारी वेबिनार

अमरावती, दि. 11 : आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मत्स्यव्यवसाय विभागातर्फे शेतकरी बांधव व युवकांसाठी ‘प्रगत तंत्रज्ञानावर आधारित मत्स्यशेती’ या विषयावरील वेबिनार झूम ॲपच्या माध्यमातून मंगळवारी (15 फेब्रुवारी) आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त डॉ. विजय शिखरे यांनी दिली.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत मत्स्यव्यवसायासंबंधी कौशल्य विकासासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या वेळेत हे वेबिनार होईल.

                   या विषयावर मिळेल मार्गदर्शन

वेबिनारमध्ये तज्ज्ञांकडून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, पिंजरा मत्स्यसंवर्धन, पुन:अभिसरण मत्स्यपालन प्रणाली, बायोफ्लोक तंत्रज्ञान, तिलापियाची मत्स्यशेती, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, रोग व्यवस्थापन, मत्स्य विपणन, शासनाच्या विविध योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योजक, प्रगत मत्स्यशेतकरी आदी मार्गदर्शन करतील.

येथे संपर्क साधा

मत्स्यव्यवसाय करण्यास इच्छूक असलेल्या शेतकरी बांधव व तरूणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. वेबिनारमधील सहभागासाठी इच्छूकांनी अधिक माहितीसाठी 8329971527 किंवा (0721)2662801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शिखरे यांनी केले आहे.

                             000 


--

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी‘मिशन 28’ ठरले प्रभावी

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी

मिशन 28’ ठरले प्रभावी

अमरावती, दि. 11 : मेळघाटात कुपोषणमुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन 28’ प्रभावी ठरले आहे.

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहिम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार मेळघाटात पाड्यापाड्यांवर अधिकारी व कर्मचारी यांच्‍या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला व पाठपुरावा याद्वारे मोहिम राबविण्याचे निर्देश  28 दिवस मोहिम राबविण्यात आली.  

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरला.  कमी वजन असलेल्या एका बालकाला रूग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबिय तयार नव्हते पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबियांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्‍या बालकास भरती करण्‍यात आले व उपचारानंतर त्याचे वजन वाढून प्रकृती सुखरूप आहे. एका मातेच्या अंगावर सूज व लघवीत प्रोटीन आढळून आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती सुखरूप आहे.

                 मोहिमेत आरोग्‍य अधिकारी, वैद्यकीय अधिकारीभरारी पथक, समुदाय अधिकारी, आरोग्‍यसेविका, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्‍या पाड्यापाड्यांवर भेटी वाढल्‍याने प्रभावी जनजागृती व पाठपुरावा झाला. माता व बालकाचे धोके व जोखीम ओळखून आजाराचे निदान लवकरात लवकर करण्‍यात यश आले.

जे नवजात बालक कमी वजन, हायपोग्‍लासेमिया, हायपोथर्मिया, अतिसार, तीव्र जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, नवजात बालकांना होणारा काविळ आदींमुळे ग्रस्त होते, त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यात आला. माता व बालकाचे निरंतर निरीक्षण, पाठपुरावा व तपासणी 28 दिवसांपर्यंत करण्यात आली.

  मोहिमेत प्रत्‍येक अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या गृहभेटींची छायाचित्रांसह नोंद ठेवली. त्यामुळे मोहिमेत ही व्यापक प्रक्रिया परिपूर्णपणे राबविण्यात यश मिळाले.   

--

ग्रामीण भाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती - राज्यमंत्री बच्चू कडू

ग्रामीण भाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती
                          - राज्यमंत्री बच्चू कडू
अचलपुर ग्रामीण भागात 15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

        अमरावती, दि. 11 :  नागरिकांसाठी आवश्यक सोई-सुविधांच्या निर्मितीने ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. त्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्यावर भर देण्यात येईल. ग्रामीण भागात रस्ते निर्मिती, काँक्रिटीकरण, अद्ययावत सुविधायुक्त शाळा, रुग्णालये, सभागृहे, इमारती इत्यादींची निर्मिती, परिसराचे सौंदर्यीकरण इत्यादी कामांमधून ग्रामीण भागांचा विकास घडवुन आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी दिली.

            अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आज (दि.11) विविध शासकीय योजनेअंतर्गत प्राप्त  15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतुन श्री कडू यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जिवनपूरा येथे 1 कोटी 40 लक्ष रुपयांच्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन

            अचलपूर नाका ते मालवेशपूरा गेट रस्ता रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे काम 75 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आले. जिवनपूरा येथे बाल गणेश मंदिर, गजानन मंदिर, शीतला माता मंदीर परिसरात 28 लक्ष रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण श्री कडू यांनी केले. बाहेकर यांच्या घरापर्यंत, नागोबा मंदीर ते दत्त मंदिर पर्यंत  रस्त्याचे काँक्रीटीकरण, श्रीरामबाबा मंदिर येथे रंगकाम विद्युत फीडिंग व शौचालयाची निर्मितीचे काम, विठ्ठल मंदिर परिसराचे सौंदर्यीकरणाचे 37 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकांमांचे भूमिपूजन आज श्री कडू यांनी केले.

बुंदेलपुरा येथे 29 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकामे

            येथिल कलंका मंदिराच्या मागील सभागृहाचे 5 लक्ष, हनुमान मंदिर परिसरात 10 लक्ष रुपये निधीतुन सभागृहाचे काम, भोई समाजासाठी 10 लक्ष रुपये निधीतुन सभागृहाची निर्मिती, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सभागृहाचे 4 लक्ष रुपयांच्या निधीतुन बांधकामाचे भूमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

विलायतपुरा येथे 72 लक्ष निधीतुन विकासकामे

येथिल दानाखोरी प्रभागातील विठ्ठल मंदिरापर्यतच्या रस्त्याचे बळकटीकरण 4 लक्ष निधीतुन, हनुमान मंदिरासमोर, आदीवासी  समाजासाठी सभागृह 25 लक्ष रुपये निधीतुन, महादेव मंदीर, मनकर्ण संस्थान, पोळा चौक, कलिका माता मंदीर ते विलापुर मज्जित पर्यंत रस्त्याचे काम व विलायतपुरा येथिल राजु सोनवणे यांच्या घरासमोरील परिसराचे सौंदर्यीकरणाचे 43 लक्ष रुपयांतुन भूमिपूजन आज करण्यात आले.

बावनीपूरा/सुलतानपूर येथे 30 लक्ष निधीतुन विकासकामे

येथिल भोंडे यांच्या घरासमोर न.प. च्या खुल्याजागेवर, सुल्तानपुरा, अचलपूर व बालाजी मंदिर  परिसरात सभागृहाच्या निर्मितीच्या 30 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.

 

 हिरापूर येथे 71 लक्ष निधीतुन व  बागवानपूरा येथे 13 लक्ष निधीतुन विविध कामे करण्यात येणार असल्याचे श्री कडू यांनी सांगितले. येथिल हनुमान मंदीर हिरापूरा, अचलपूर येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून हिरापूर येथे  सभागृह बांधकाम करणे , 35 लक्ष रुपये निधीतून शादीखाना निर्माण करणे , हिरापूर येथिल दुर्गापूर रस्ता कॉक्रीटीकरण करणे 6 लक्ष, हिरापूर येथील लाल हनुमान मंदिराचे बाजूला लादिकरण व चैन्लिंग फेन्सिंगचे काम, हनुमान मंदिर ते नंदू भूस्कते रोडवर लादिकरणाचे 10 लक्ष रुपयांच्या काम, 5 लक्ष रुपयांच्या निधीतून अमृतकर ते जर्फाबदी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे , येथील खोलापूरे ते मेन रोड पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमीप आज श्री कडू यांनी केले.

दुल्हागेटे येथे 132 लक्ष निधीतुन विकासकामे  तर बिलनपूरा येथे 25

लक्ष निधीतुन  व  बियाबानी येथे 15 लक्ष निधीतुन व आदी विकासकामांना सुरुवात

72 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते श्रीकृष्ण पूल ते गांधी पूल मुख्य रस्ता बांधकाम लांबी 1.800 किमी , 60 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते चावलमंडी चौक ते गांधी पूल मुख्य रस्ता बांधकामाचे  भूमिपूजन,येथिल शनी मंदिर सभागृह बांधकाम  12 लक्ष निधींतून, बिलनपूरा अचलपूर येथे श्री.देशमुख ते पंचवटे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष निधीतून, डॉ. सालकर यांच्या घरामागील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष निधीतून,येथिल मुशाब्बर पठाण यांच्या घरासमोर खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, डॉ. जाहिद दवाखान्यासमोर खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे 5 लक्ष.

दिलदारपूरा येथिल बुध्देगा चौक ते बजरंगबली महाराज दिलदारपूरा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 4 लक्ष, बुध्देखा चौक येथिल विविध ठिकाणी लादिकरण 10 लक्ष, लोहार लाईन येथिल हत्तीवले रामंदिर परिसरामध्ये स्वचालाय बांधकाम करणे 2 लक्ष. फरमानपूरा येथिल जहीर बास यांचे घरासमोर इमामवाडा सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, देवळी चौक येथिल उपजिल्हा रुग्णालय ते जीवनपुरा गेट रस्याभाचे डांबरीकरण करणे 35 लक्ष. पाटीलपूरा येथिल नागोबा मंदिर सभागृह बांधकाम करणे 15 लक्ष. चावलमंडी येथिल हदाले यांचे घरी सांत्वन भेट. माळीपूरा नामदारगंज येथिल सलाम भाई ते मुस्तफा मास्टर ते हुसेन खान यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष. नामदारगंज अचलपूर येथे लाकोडे ते माकोडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरणे करणे 5 लक्ष. बेगमपूरा येथिल आंबेडकर पुतळा बेगमपुरा येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष. तहसिल येथिल मुस्लीम कब्रस्थान येथे आवारभिंत व शेड बांधकाम करणे 4 लक्ष. अब्दालपूरा येथिल सभागृह बांधकाम करणे 9 लक्ष. ठिकरीपूरा येथिल गुणवंत महाराज सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

Thursday, February 10, 2022

ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 







ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

चांदुरबाजार तालुक्यातील रेडवा येथील विकासकामांचे राज्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

 

अमरावती , दि. 10 : जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज रेडवा येथे दिली.

 

जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आज त्यांनी चांदुरबाजार तालुक्यातील रेडवा या सीमावर्ती गावातील रस्ता बांधकामाचे लोकार्पण केले. अडगाव, विचोरी, तळेगाव, विष्णोरा, खेड, सायवाडा, गणेशपूर, चिचकुंभ ते राज्यसीमेपर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या कामासाठी 2 कोटी 8 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

 

चांदुरबाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला गणेशकर, रेडवाचे सरपंच अश्विन मालवीय, चिचकुंभच्या उपसरपंच फुलवंती पानेकर, चांदुरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले तसेच रेडवाचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 

ग्रामस्थांना गावातच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. रेडवा ते घाटलाडकीपर्यंतचा रस्ता तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना दळण-वळण करणे सुलभ होणार असल्याचे समाधान श्री. कडू यावेळी व्यक्त केले. येथील माता जगदंबा संस्थानासमोरील जागेत खुले सभागृह बांधकामाचे भूमीपूजनही त्यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस राज्यमंत्री श्री. कडू यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी राज्यमंत्र्यांना गावात आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवेदन दिले. पाणीपुरवठा, घरकुलाचे प्रश्न, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे व सुधारणा आदींबाबत श्री. कडू यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.

00000

 

 

 

 

Wednesday, February 9, 2022

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.9: ज्या मदरशांमध्ये फक्त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे अशा मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सदर मदरसे चालविणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. इच्छुक मदरशांनी  शासन निर्णय क्रमांक-अविवि-2010/प्र.क्र.152/10/का.6,  11 ऑक्टोबर, 2013 च्या तरतुदीनुसार पुढील बाबीकरिता विहित नमुन्यात अर्ज करावेत.

 

विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु हे विषय शिकण्याकरीता शिक्षकांना मानधन.पायाभूत सुविधांसाठी व ग्रंथालयसाठी अनुदान. मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. इच्छुक मदरशांनी  शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोंबर, 2013 अन्वये नमुद केलेल्या विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथील अल्पसंख्यांक शाखेत दिनांक 11 फेब्रुवारी,2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.

 

शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डी. एड./ बी. एड.  शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी इंग्रजी मराठी व उर्दु यापैकी एक माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त पहिल्यांदा रुपये पन्नास हजार रुपये व तद्नंतर प्रति वर्षी रुपये 5,000 अनुदान देय आहे.

 

          शासन निर्णयातील नमूद पायाभूत संविधांसाठी रुपये 2 लाख अनुदान देय आहे. यापुर्वी ज्या प्रयोजनाकरीता अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनाकरीता पुन्हा अनुदान देय असणार नाही. ज्या मदशांना सेमी फॉर प्रोवायडिंग क्वॉलिटी एज्युकेशन ईन मदरसा (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय क्रमांक-अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6, दिनांक 11 ऑक्टोबर, 2013 अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी  htt://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

         

000000

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर म.जी.प्रा. थकबाकीदार ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर

म.जी.प्रा. थकबाकीदार ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

            अमरावती, दि.9: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणी पट्टीच्या मुळ मुद्यलावरील विलंब आकार माफीच्या सवलीतीची अभय योजना 21 जानेवारी 2022 पासुन जाहीर झाली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच घोषणा केली असुन त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी 21 जानेवारी 2022 रोजी अभय योजने संदर्भात परिपत्रक काढले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या उपविभागात अर्ज करून आपले नाव समाविष्ट करावे, असे आवाहन म.जी.प्रा. प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर तसेच अधिक्षक अभियंता विवेक सोळंके यांनी केले आहे.

 

            पाणीपट्टी थकबाकी व त्यावरील ‍विलंब आकार यासाठी अभय योजना लागु करण्यात आली असून ही योजना दि.21 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत फक्त एका वर्षाच्या कालावधीकरीता मर्यादीत आहे. ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विलंब आकार सवलतिची अभय योजना लागु करण्याच्या दिलेल्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. माफीची टक्केवारी चार भागात विभागली असून ग्राहकांना आता मुळ मुद्यल भरावयाची आहे. पहिल्या तिमाहीत म्हणजेच दि.21 जानेवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 पर्यंत थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्यास विलंब आकाराची टक्केवारी 100 टक्के आहे. दुसऱ्या तिमाहीत दि.21 एप्रिल 2022 ते 20 जुलै 2022 पर्यंत पुर्ण थकबाकी भरल्यास 90 टक्के, तिसऱ्या तिमाहीत दि.21 जुलै 2022 ते 20 जुलै 2022 पर्यंत 80 तर चौथ्या तिमाहीत दि. 21 ऑक्टोबर 2022 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत 70 टक्के सुट मिळणार आहे. एकदा या योजनेत प्रविष्ठ झाल्यावर या योजनेतुन बाहेर पडता येणार नाही. ज्या कालावधीत योजनेप्रमाणे थकबाकी भरण्याच्या पर्याय मजीप्रा ग्राहक योजनेत प्रविष्ट होतांना निवडतील त्यानुसार त्यांना विलंब आकार अनुज्ञेय होईल.

 

जर प्रथम निवडलेल्या पाणी पट्टी व विलंब आकार थकबाकी अदाईचा कालावधी काहीही कारणाने पाळणे शक्य झाले नाही. तर ज्या तिमाहित शेवटचा हप्ता विहित मुदतीचा आत भरतील त्या तिमाही नुसार जो एकुण कालावधी होईल. त्यानुसार विलंब आकारात योजने प्रमाणे अनुज्ञेय सवलत मिळेल. तसे करावयाचे झाल्यास ताळमेळाप्रमाणे निश्चित झालेली सर्व रक्कम वसुल पात्र राहील. व विलंब आकार गोठविण्याची कार्यवाही निरस्त होऊन विलंब आकाराची रक्कम पुर्ववत लागु राहिल. मध्येच योजनेतुन बाहेर पडल्यास अथवा योजनेप्रमाणे थकीत रक्कमेचा पुर्णत: भरणा न केल्यास सदर संस्था व व्यक्ती या योजनेचा लाभ घेतालाच नाही असे समजण्यास पात्र राहील व गोठविलेल्या विलंब आकार दंडनीय व्याजाची रक्कम पुर्वलक्षी प्रभागावाने लागु राहील व देय राहील व अभय योजनेतील कोणतीही सुट अनुज्ञेय राहणार नाही.

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कोकण विभागांतर्गत 5, नागपूर 10, पुणे 14, नाशिक 7, तर अमरावती विभागांतर्गत 15 अशा एकुण 51 पाणी पुरवठा केंद्राकडे दि.31 मार्च 2020 अखेर पाणी पट्टीची एकुण मुद्यल 516.29 कोटी व विलंब आकार 403.30कोटी अशी एकुण 919.59 कोटी थकबाकी असुन या बद्यल सातत्याने प्रयत्न करूनही थकबाकी कमी न झाल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 148 व्या बैठकीत वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अशी अभय योजना प्रस्तावित करण्यात आली. त्यानुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि.12 जानेवारी 2022 च्या शासन पत्रान्वये म.जी.प्रा. ग्राहकांना प्रोत्साहन मिळणेकरिता विलंब आकार सवलतीची अभय योजना लागु करण्याच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

00000

 

 

 

 

 

 

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...