Thursday, August 6, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६



 #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६


#शेतकरीकर्जमुक्ती
#अहिल्यादेवीहोळकर
#कर्जमुक्तीयोजना2026
#FarmerWelfare
#KYC
#eKYC
#FarmerSupport
#GovernmentSchemes
#agriculture

DIO NEWS AMRAVATI 06.08.2026

 



जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी

कामाच्या ठिकाणी  महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी

अंमलबजावणीसाठी पाऊल

 

अमरावती, दि.६ :   जिल्ह्यातील ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी तसेच सीबॉक्स पोर्टलवर त्याची नोंदणी करण्यात यावी असे आवाहन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. ज्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी अशी समिती स्थापन केली नाही व पोर्टलवर नोंद केली नाही त्यांनी तातडीने हे कार्य पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

          महिला व बाल विकास आयुक्तालयाने  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध ,मनाई आणि निवारण)        अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी या कायद्याच्या कलम -४ अन्वये ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी  सीबॉक्स पोर्टलवर (https://shebox.wcd.gov.in ) करण्याचे  निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी अशा समिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

          पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी  शासकीय,निमशासकीय व खाजगी  आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे व त्याची नोंद सीबॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक असून सीबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनांनी अद्यापपर्यंत ही कार्यवाही केली नाही त्यांनी ही कार्यवाही पूर्ण करावी तसेच  संबंधीत  आस्थापनेवरील पीडित महिलेला  तक्रार नोंदविण्यासाठी  https://shebox.wcd.gov.in ही लिंक कार्यालयाच्या दर्शनी भागात तसेच कार्यालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 

००००००

 

रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत

बुकिंग सुविधा

 

 

            अमरावती,दि.६ : रक्षाबंधन सणा निमित्ताने राखी,भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगसाठी नागरीकांच्या सोयीकरिता अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे डाक सेवा काउंटर दुपारी ४ ते रात्री १०.३०  पर्यंत सुरु ठेवण्यात आल्याचे रेल्वे डाक सेवा नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी  कळविले आहे.

 

              ग्राहकांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखीचे पार्सल वेळेवर रवाना व वितरीत करता यावे म्हणून कार्यालयीन वेळेनंतरही रात्री उशिरापर्यंत रेल्वे डाक सेवा काउंटरवर बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काउंटरवर  ग्राहकांसाठी  स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल व पार्सल सेवा उपलब्ध असणार आहेत. या सेवेचा जास्तीत-जास्त  लाभ  घेवून देश व परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी ,भेटवस्तू , मिठाई व इतर सणासुदीच्या वस्तू वेळेवर पोहचविण्यासाठी ग्राहकांना आगावू बुकींग करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

००००




आयआयएमसीत इंग्रजी व मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी स्पॉट प्रवेश प्रक्रिया 13 ऑगस्टला

अमरावती: भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती परिसरातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता रिक्त जागांवरील प्रवेशासाठी स्पॉट (वाक इन) प्रवेश प्रक्रिया गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार व निर्धारित आरक्षण धोरणानुसार गुणवत्ता यादीच्या आधारे दिले जाणार आहेत.

केंद्रीय विद्यापीठे प्रवेश परीक्षा (सीयुईटी-पीजी ) २०२६ अंतर्गत जन संवाद आणि पत्रकारिता (COQP17) या विषयात मेरीट प्राप्त उमेदवारांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिला जाईल. तसेच, सीयुईटी-पीजी मार्फत परीक्षा देऊ न शकणारे, मात्र कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांनाही स्पॉट (वाक इन) प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी १३ ऑगस्ट रोजी लेखी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता व निर्धारित आरक्षणाच्या निकषांनुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेश करीता वयोमर्यादेची अट असून अनारक्षित प्रवार्गासाठी २५ वर्ष, ओबीसी करीता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करीता ३० वर्ष आहे.

प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयआयएमसी, अमरावती परिसरात सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, त्यांची स्वसाक्षांकित छायाप्रती, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयआयएमसी तर्फे करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रवेश अडचणी संदर्भात डॉ. राजेश सिंह कुशवाहा (9415862377), डॉ. विनोद निताळे (9860046706), रोहन तायडे (8275734035) कार्यालय (0721-2668180), यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांनी दिली आहे.

00000




📢 पराक्रम दिन विशेष – राज्यव्यापी ऑनलाइन निबंध, वक्तृत्व व रील्स स्पर्धा! 🏆🇮🇳


नमस्कार! 🙏


अमृत महाराष्ट्र यांच्या वतीने पराक्रम दिनानिमित्त राज्यव्यापी ऑनलाइन निबंध, वक्तृत्व व रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


👥 सहभागासाठी पात्र: ✅ शालेय विद्यार्थी

✅ महाविद्यालयीन विद्यार्थी

✅ सर्व नागरिक


📅 स्पर्धा कालावधी: १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट


📝 स्पर्धा प्रकार: ✍️ निबंध स्पर्धा

🎤 वक्तृत्व स्पर्धा

🎬 रील्स स्पर्धा


🏆 विभागस्तरीय बक्षिसे (तीन्ही स्पर्धांसाठी): 🥇 प्रथम क्रमांक – ₹५,०००/- रोख बक्षीस व सन्मानचिन्ह

🥈 द्वितीय क्रमांक – ₹४,०००/- रोख बक्षीस व सन्मानचिन्ह

🥉 तृतीय क्रमांक – ₹३,०००/- रोख बक्षीस व सन्मानचिन्ह


🎖️ प्रत्येक सहभागीला डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.


📚 स्पर्धेचे विषय:

देशभक्ती, राष्ट्रनिर्माण, नेतृत्व, इतिहास तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमावर आधारित विविध विषय.


📝 सहभाग कसा घ्यावा? 1️⃣ https://parakramdin.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन Contact Form भरून नोंदणी करा.

2️⃣ त्याच पोर्टलवर आपला रील्स व्हिडिओ अपलोड करा.

3️⃣ संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.


📢 आपण स्वतः सहभागी व्हा आणि आपल्या मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी, सहकारी व नातेवाईकांपर्यंत ही सुवर्णसंधी नक्की पोहोचवा.


📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

अमृत जिल्हा कार्यालय, अमरावती

📱 9112227935 / 9112227673 


पराक्रमाला सलाम... इतिहासाला अभिवादन... आणि आपल्या कर्तृत्वाला नवी दिशा! 🇮🇳🔥


Wednesday, August 5, 2026

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

 



#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

#शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #KYC #eKYC #FarmerSupport #GovernmentSchemes #agriculture

DIO NEWS AMRAVATI 05.08.2026

 महाडिबीटी 2.0 पोर्टलवर  मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर ऑनलाईन

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

विद्यार्थी व शाळा-महाविद्यालयांना अर्ज भरण्याचे आवाहन

 

अमरावती,दि. 5 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता विमुक्त जाती,इतर मागास प्रवर्ग व विशेष  मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या  मॅट्रीकपूर्व 9 व मॅट्रीकोत्तर 11 शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी 2.0 पोर्टलवर सुरु करण्यात आली असून विद्यार्थी ,पालक व शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी पोर्टलवर अचूक माहिती भरण्याचे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्ययावत करण्यात आलेल्या महाडिबीटी 2.0 पोर्टलवर सुरु करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्ज भरण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. लॉगिन  टॅबवर उचित पर्यायांचा वापर करून आधार बेस लॉगिन  करता येणार आहे. पात्र योजनेचा तपशील अद्यावत केल्यानंतर विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होणार आहे त्यानुसार योजनेची  निवड करून अर्ज करता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरताना जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.

 

पोर्टलवर ऑनलाईल नोंदणी व अर्ज करण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क न घेण्यासह महत्वाच्या महाविद्यालयांचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश शुल्क, रचना इत्यादी माहिती पोर्टलवर मॅप करण्याचे आदेश  संबंधित शैक्षणिक यंत्रणाना देण्यात आले आहेत. तसेच अधिक माहिती करिता 022-41150800/18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करता येईल असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                       ००००००

 


शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना

आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

 

          अमरावती, दि. 5 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना2026  अंतर्गत अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्या आणि योजनेच्या पोर्टलवरील रकमेत असलेल्या फरकाबाबत संभ्रम निर्माण करू नये व कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये सर्व पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना  पोर्टलवरील माहिती तपासून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन, उपविभागीय अधिकारी अनिलकुमार भटकर, तहसीलदार विजय लोखंडे व सहकारी संस्था उपनिबंधक सुधीर खंबायत  यांनी केले आहे.

गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांच्या थकबाकी रकमेतील फरक आणि योजनेच्या पोर्टलवरील थकबाकी रकमेतील भिन्नता असल्यास पोर्टलवरील रक्कमच निर्णायक मानली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोर्टलवर दर्शवलेली कर्जाची थकबाकी रक्कम  31 मार्च 2026 ची आहे. शासनाने  1 जुलै 2026 च्या पत्राद्वारे सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज वसूल न करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सर्व बँकांनी हे मान्य केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पोर्टलवर आपली नोंदणी व थकबाकी रक्कम तपासून आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर यशस्वी झाल्याची पावती मिळेल ज्यात कर्जमुक्ती होणारी रक्कम प्रदर्शित असेल. आधार प्रमाणीकरणानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात डिबिटीद्वारे जमा केली जाईल आणि त्यानंतर कर्ज बेबाकी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेच्या शाखेत व कार्यकारी सेवा संस्थांमध्ये  याद्या लावण्यात येतील. कर्जमाफी मिळाल्यानंतर खरीप पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पोर्टलवरील रक्कम किंवा इतर कोणताही तपशील शेतकऱ्यांसाठी अमान्य वाटल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार  नोंदविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तक्रारींचे निराकरण जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. सेतू संचालक व सीएससी केंद्रांच्या प्रमुखाने संबंधीत शेतकऱ्यांना  संपर्क करून आधार प्रमाणीकरण करण्यात मदत करावी असे सांगण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी शिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमरावती तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये,सेवा सहकारी संस्था, सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि  sdo.amravati.nic. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे अमरावती उपविभागीय कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

                                                             ०००००

 


जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'

प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 5: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, शनिवार  12 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये  ‘राष्ट्रीय लोकअदालती’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल असलेली आणि  दाखलपूर्व (प्री- लिटीगेशन) प्रकरणे  या लोकअदालतीमध्ये  तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.

 

                                           नि:शुल्क सेवा ; एकाच दिवशी अंतिम निकाल

 

              या लोकअदालतीचे  विशेष  वैशिष्ट्य म्हणजे  पक्षकारांना यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, यामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा अंतिम निकाल त्याच दिवशी लावण्यात येणार आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.

 

                                          प्रलंबित खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन

 

  नागरिकांनी आपले तडजोडपात्र प्रलंबित खटले ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये ठेवून सामंजस्याने मिटवण्यासाठी संबंधित न्यायालयात त्वरित अर्ज करण्याचे आवाहन, अमरावती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर आणि  सचिव संजय ता. सहारे यांनी  केले आहे. तसेच, दाखलपूर्व प्रकरणांबाबत नागरिकांनी आपल्या नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाशी संपर्क साधावा आणि 12 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित होणाऱ्या  'राष्ट्रीय लोकअदालती'चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                          ००००

 

  सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन

ख्‍

अमरावती, दि.5 : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच उद्योजकांना सुलभ व जलद कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने  येत्या 7 ऑगस्ट  रोजी  सकाळी 11 वाजता एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन हॉल अमरावती येथे  देशव्यापी एमएसएमई कर्ज वितरण शिबीराचे आयोजन  करण्यात आले आहे.

 

या विशेष कर्ज मेळाव्यात नवउद्योजक, विद्यमान उद्योग, व्यापारी, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तसेच एमएसएमई  क्षेत्रातील सर्व पात्र उद्योजकांना विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असून, कर्ज प्रस्तावांचे मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची तपासणी तसेच पात्र अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी  तसेच  उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उद्योजकांनी आवश्यक कागदपत्रांसह या कर्ज मेळाव्यास उपस्थित राहून बँकेच्या आकर्षक एमएसएमई  कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय यांनी केले आहे.

                                           ०००००


मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन


 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

 

          अमरावती/मुंबई दि.5 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय 47) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.

          प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमते बाहेर होता.

          अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.

          या आर्थिक सहाय्यामुळे 25 जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.

          वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 प्रतिक्रिया------------

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211  या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

-         रामेश्वर नाईक

          कक्ष प्रमुख

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

 

00000

Tuesday, August 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04.08.2026

 शेतकऱ्यांना युरोप, चीन दौऱ्याची संधी

*२० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 4 : कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पातळीवर शेती क्षेत्रात होत असलेले बदल आणि नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या दौऱ्यात परदेशातील कृषी शास्त्रज्ञ व तेथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, शेतीविषयक विविध संस्था आणि आधुनिक शेतांना प्रत्यक्ष भेटी देणे, परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या उत्पन्नात कशी वाढ करू शकतात, याचे प्रात्यक्षिक व ज्ञान मिळवणे या बाबींचा समावेश राहणार आहे.

 

परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी लाभार्थी स्वतः शेतकरी असावा. अ‍ॅग्रीस्टॅक शेतकऱ्याकडे 'फार्मर आयडी' असणे आवश्यक आहे. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असावे, याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

 

याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

 

 

१० ऑगस्ट रोजी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा’

अमरावती, दि.४ :  संत गाडगेबाबा शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) एनएसएस हॉलमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता  ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

        जिल्ह्यातील सर्व आयटीआय मध्ये फिटर,टर्नर,इलेक्ट्रेशियन,मॅकनिस्ट,टूल डाय मेकर, मशीन मोटर व्हेईकल, डिझेल मशीन, इलेक्ट्रेशियन, वेल्डर (गॅस/इलेक्ट्रीक),ड्रेस-मेकिंग, सुईंग –टेक्नॉलॉजी,फॅशन टेक्नॉलॉजी या विषयांत उत्तीर्ण व अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच पदवी व पदविका धारक (मेकॅनिकल) उमेदवारांसाठी या राष्ट्रीय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.उमेदवारांनी या भरती मेळाव्यासाठी येताना सोबत बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायापत्री आणणे आवश्यक आहे.

सर्व इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र , संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी केले आहे. 

                                               ०००००

 

जिल्हा कौशल्य विकास विभागाच्यावतीने ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेचे आयोजन

पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि.४ :  जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंडिया स्किल्स स्पर्धेच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्‍य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.

                                   स्पर्धेत सहभागासाठी अशी आहे पात्रता

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा (काही विशेष तांत्रिक कौशल्यांच्या गटासाठी जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.). शैक्षणिक पात्रतेत आयटीआय ,डिल्पोमा, पदवीचे विद्यार्थी किंवा कोणत्याही क्षेत्रातील तंत्रकुशल तरुण पात्र ठरतील. उमेदवार हा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी किंवा महाराष्ट्रात शिक्षण अथवा नोकरी करणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

                                   येथे करता येईल नोंदणी

पात्र उमेदवारांना शासनाच्या www.skillindiadigital.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ७६२०५६०१२५ किंवा ७०२०९५८२३१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                               ०००००

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  अभियान’ ;

‘जागतिक स्तनपान सप्ताहा’निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि.४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने १ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध उपक्रमांद्वारे  जिल्ह्यात ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

 आईच्या दुधातूनच जन्मानंतर पहिल्या एका तासात बालकास स्तनपान सुरु करणे तसेच जन्मापासून पहिल्या महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध देणे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते. आईच्या दुधामुळे बालकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, आजारांपासून संरक्षण होते , मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ ही यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना आहे. यानुसार  स्तनपानाच्या माध्यमातून  नवजात बालकास आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळावी तसेच ९ ते ५९ महिन्यापर्यंतच्या बालकांना ‘अ’ जीवनसत्व पुरक आहार देण्याबाबतही  जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.   

                                    जिल्ह्यात विविध उपक्रम

जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. प्रवीण परिसे यांच्या मार्गदर्शन  आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पराग राठोड यांच्या नियोजनात  जागति‍क स्तनपान सप्ताहानिमित्ताने जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र ,आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच गाव पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुनश्चर्या प्रशिक्षण,गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन विषयक कार्यशाळा, माता-पालक बैठका, शालेय स्तरावरील प्रश्नमंजुषा,निबंध व चित्रकला स्पर्धा  तसेच स्नपानास पोषक वातावरण निर्मितीस पोषक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांमाध्यमातून गृहभेटी ,नियमित लसीकरण सत्रे,व्हिलेज हेल्थ, गावतापळीवरील समुपदेशनाद्वारे स्तनपान,शिशुपोषण,पूरक आहार,स्वच्छता आणि माता-बाल आरोग्या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गर्भवती महिला, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

                                 ०००००

 


विशेष सखोल पुनरीक्षणाला सहकार्य करावे

*राजकीय पक्षांना आवाहन

 

 

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत 3 लाख 95 हजार मतदारांनी आवश्यक असलेला फॉर्म भरून दिलेला नाही. परीणामी मतदारयादीतून हे मतदार वगळले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार शोधून त्यांच्याकडून फॉर्म जमा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शिबीरे आयोजित करण्यात आली. बीएलओंकडून स्वगणना करण्यासाठी अर्ज वितरीत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही 3 लाख 95 हजार मतदारांनी हे फॉर्म भरून दिलेले नाही. फॉर्म भरून परत देण्याची मुदत 8 ऑगस्ट आहे. तोपर्यंत फॉर्म भरून दिले नसल्यास मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीमधून वगळले जाणार आहे. प्रारूप मतदारयादीवर आक्षेप घेतला येणार आहे, तसेच मतदारयादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

 

प्रामुख्याने मतदार मयत, स्थलांतरण किंवा इतर कारणामुळे संबंधित भागात आढळून येत नाही. त्यामुळे त्यांची नावे वगळली जाणार आहेत. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदारयादीमध्ये नाव नसल्यास मतदारांनी नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करावी. यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

00000

पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

  पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६चा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण कर...