Monday, August 24, 2020

पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

 











पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांचा आढावा

पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करावी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 24 : सिंचन प्रकल्प निर्मितीमुळे विस्तापित होणाऱ्या गावांचे पुनवर्सन नियोजनबध्द करण्याची योजना शासनाव्दारे राबविण्यात येते. जिल्ह्यातील पुनवर्सन होणाऱ्या गावांतील सामान्य जनतेचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पुनर्वसन करण्यात येणाऱ्या गावांमध्ये नागरी सुविधांची कामे संबंधित यंत्रणांनी तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

सिंचन अनुशेषांतर्गत येणाऱ्या भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्प व मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पामुळे विस्तापित होणाऱ्या गावांचे पुनवर्सन व तेथील नागरी सुविधांचा आढावा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, तिवसाचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मजीप्राचे अधिक्षक अभियंता एस. एम. कोपुलवार, दोन्ही प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, समाजकल्याण सहा. आयुक्त मंगला मून आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कुंडखुर्द, गोपगव्हाण, अळणगांव, कुंड सर्जापूर, हातुर्णा, सावरखेड, ततारपुर या गावांचे पुनर्वसन होणार आहे. तसेच मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोडणा, खोपडा या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.  सदर गावांच्या पुनर्वसनासाठी भुखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जुन्या गावठाणचा अंतीम निवाडा पारीत झाला असून मोबदला वाटप सुध्दा झाले आहे. नवीन ठिकाणी पुनवर्सन होणाऱ्या गावांत नागरी सुविधांची कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रकल्पाव्दारे विस्तापित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन करणे ही शासनाची योजना आहे. त्याठिकाणी रस्ते- नाल्या, विद्युतीकरण, पाणी पुरवठा यंत्रणा, शाळा, दवाखाना आदी मुलभूत नागरी सुविधांचे नियोजनबध्द कामे होणे क्रमप्राप्त आहे. पुनर्वसित गावांत सदर सुविधा झाल्यावरच त्याठिकाणी नागरीक राहायला जातात. पुनर्वसन होणाऱ्या गावांतील नागरीकांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी तेथील नागरी सुविधांची कामे नियोजनबध्द व गुणवत्तापूर्ण करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.

पुनवर्सन होणाऱ्या गावांत नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याठिकाणी पाणी पुरवठा, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, विद्युतीकरण आदी सुविधा प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत, अशी  माहिती जिल्हाधिकारी शैलेश  नवाल यांनी बैठकीत दिली.

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...