Wednesday, May 14, 2025

DIO NEWS AMRAVATI 14-05-2025

 








सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात

- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

अमरावती, दि. 14 : विविध आस्थापनांवर सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करून त्यांना असलेल्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मैला उचलणाऱ्या आणि गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यास प्रतिबंध व पुनर्वसन, तसेच अधिनियम 2013 च्या अंमलबजावणी व सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डागोर यांनी सफाई कामगारांच्या निवासस्थानाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची 25 वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना पट्टेवाटप, त्यावरील घरकूल याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच श्रम श्राफल्य योजनेतून घर बांधण्यासाठी सहकार्य करण्यात यावे. जिल्ह्यात या कर्मचाऱ्यांना आवाससाठी अंमलबजावणी करावी. यातील कोणतेही प्रकरण प्रलंबित राहू नये. याबाबत 1 महिन्याच्या आत कार्यवाही करावी. निवासस्थानासोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी नियमित करण्यात यावी. यासाठी शिबीरे आयोजित करावेत.

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सफाई कामगारांनाही नियम लागू आहेत. आजाराच्या उपचाराची प्रतिपूर्ती देण्यात यावी. त्यांना आयुष्मान योजनाही लागू असल्याने त्यांचे कार्ड काढण्यात यावेत. तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध होण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करावी. कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टी देण्यात यावी. कर्मचारी निवृत्त किंवा मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना विनाविलंब सर्व लाभ देण्यात यावेत. आदिवासी विकास विभागातील धारणी येथील कर्मचाऱ्यांची दहा वर्षे सेवा होऊनही कायम करण्यात आलेले नसल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. डागोर यांनी दिले.

000000







मान्सूनमधील आपत्तीत एकही मृत्यू होऊ नये

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा

अमरावती, दि. 14 : यावर्षी मान्सून 7 जून रोजी दाखल होणार आहे. त्यामुळे मान्सून कालावधीतील उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. येत्या मान्सूनमध्ये आपत्तीत एकही मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, मान्सूनपूर्वी करावयाच्या उपाययोजनांसाठी तीन आठवड्यांचा कालावधी आहे. या काळात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात यावा. पूर आल्यास नागरिकांना स्थानांतरीत करावे लागते. यासाठी तात्पुरते निवारे बांधण्यात यावेत.

आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देऊन आवश्यक ती सामुग्री तयार ठेवावी. प्रामुख्याने पूर परिस्थितीत बचाव पथकांचे कार्य महत्वाचे असते. त्यांनी तातडीने प्रतिसाद देऊन कार्यवाही करावी. बचाव कार्यासाठी आवश्यक असलेले बोटी, लाईफ जॅकेट यांची देखभाल दुरूस्ती करावी. तसेच सराव करण्यात यावा. आपत्तीचे नियोजन करताना त्या परिसरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी.

मान्सून कालावधीत साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे औषधसाठा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत ठेवण्यात यावेत. जनावरांनाही जलजन्य आजार होत असल्याने औषधे, लसींचा साठा तयार ठेवण्यात यावा. प्रामुख्याने मेळघाटात संपर्क तुटण्याची समस्या जाणवते. त्यामुळे झाडे पडणे, वीज तारा तुटणे, पुलावरून पाणी वाहण्याच्या काळात तातडीने प्रतिसाद देण्यात यावा.

आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. सतर्क राहून कार्य केल्यास आपत्तीमध्ये होणारी हाणी कमी होण्यास मदत मिळेल. मागील मान्सूनच्या कालावधीत आलेल्या अडचणीच्या परिस्थितीची माहिती घेऊन यावेळी त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. शिकस्त इमारती कोसळल्यास अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. नुकसान झालेल्याचा पंचनामा तातडीने करण्यात यावा. याबाबतची माहिती तातडीने देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000



छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसीलदार प्रशांत पडघम उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000






मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे

*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

अमरावती, दि. 14 : मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये पाणीटंचाई उपाययोजना, नरेगा आणि सिंचन विभागातर्फे जलसंधारणाची कामे आणि पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत आहे. या कामांची जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवार, दि. 13 मे रोजी पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, कार्यकारी अभियंता सुनिल जाधव, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, नायब तहसीलदार श्री. धावडे, सहायक गटविकास अधिकारी महेश वाढई, ग्रामिण पाणी पुरवठा उप अभियंता श्री. खाटकर, सिंचन उप अभियंता श्री. राठोड, उप अभियंता मोहिनी धांडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेली पाणीटंचाईची कामे, रोजगार हमी योजना आणि सिंचन विभागाची जलसंधारणाची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, तेंदूपत्ता संकलन आणि टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली.

बोराळा येथे नरेगा अंतर्गत जलशोषक चर आणि घरकुल, चांदपूर येथे नरेगाच्या सुरू असलेल्या कामास भेट आणि मजुरांसोबत चर्चा केली. बहादरपूर येथे सिंचन विभागाच्या साठवण बंधाऱ्याची पाहणी, तसेच टँकरची माहिती घेतली. धरमडोह येथील गावाने पाणीटंचाईवर पेसा आणि स्वनिधीच्या मदतीने मात करून नियमित लागणारे टँकर बंद केले आहे. त्याबाबत भेट देऊन सरपंच, सचिव आणि नागरिकांशी संवाद साधला.

टेंब्रूसोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी. यावेळी प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाच्या जागेबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. कुलंगणा खुर्द येथे पाणीटंचाई अंतर्गत केलेल्या उपाययोजनेच्या कामास भेट देऊन सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांशी संवाद साधला. सोमवारखेडा आणि मलकापूर येथील कोल्हापुरी बंधारा कामाची पाहणी केली. त्यानंतर बागलिंगा आणि 14 गावे या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल प्रक्रिया केंद्राच्या कामास भेट दिली. तसेच हिरदामल येथे ग्रुप ऑफ ग्रामसंघातर्फे सुरू असलेल्या तेंदूपत्ता संकलन फळीला भेट देऊन श्री. जामकर यांच्याशी चर्चा केली.

00000

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

अमरावती, दि. 14 (जिमाका) : अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील प्रवेश निश्चित झालेलल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दि. 2 मे 2025च्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी या अधिकच्या मुदतीचा लाभ घ्यावा. एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच अर्ज त्रुटीत असल्यास त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.

00000

 माजी सैनिकांसाठी व्यावसायिक वाहन भाडे योजना

*16 मे पूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 14: माजी सैनिकांसाठी व्यावसायिक वाहन भाडे योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 16 मे पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्यात 587 ठिकाणे निश्चित केली आहे. प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक वाहने भाडेतत्वावर घ्यायचे प्रस्तावित आहे. यासाठी संपूर्ण वाहने माजी सैनिकांची असावीत. माजी सैनिकांना ही स्वयंरोजगाराची संधी असून या योजनेंतर्गत वाहन भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणाऱ्या माजी सैनिक, फिजिकल कॅज्युअल्टी, बॅटल कॅज्युअल्टी, सैनिकांच्या विधवांना स्वयंरोजगारासाठी देय अनुदान नियमानुसार देण्यात येईल. एकत्रित नवी वाहने खरेदी, कर्ज उपलब्धता यासाठी शासनस्तरावरून मदत केली जाणार आहे. याचा वाहन भाडेकरार मेस्को करणार असून सर्व वाहने मेस्कोकडे संलग्न राहतील.

इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 16 मे 2025 पूर्वी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

00000

माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी 'महासैनिक' पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 14 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी (विधवा) आणि त्यांच्या अवलंबितांनी महासैनिक पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिक कल्याण विभाग, केंद्र सरकारच्या सैनिक कल्याण बोर्डाच्या विविध योजनांच्या लाभासाठी 'महासैनिक' पोर्टल mahasainik.maharashtra.gov.in वर माजी सैनिक आणि अवलंबितांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या ऑनलाईन नोंदणीमुळे निवृत्ती वेतनासंबंधी माहिती मिळवणे आणि स्पर्श प्रणालीमधील अडचणींचे निराकरण करणे अधिक सुलभ होणार आहे.

नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुक (सेवामुक्ती प्रमाणपत्र) पी.पी.ओ. (निवृत्ती वेतन आदेश), पेन्शन पासबुक, ईसीएचएस कार्ड (माजी सैनिक आरोग्य योजना कार्ड), पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाइल नंबर, शैक्षणिक प्रमाणपत्रे कागदपत्रे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रियेसाठी नोंदणी शुल्क १०० रूपये असून ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. नोंदणी करताना सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी. आपल्या मूळ कागदपत्रांच्या स्पष्ट पीडीएफ प्रती अपलोड कराव्यात. अस्पष्ट कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. लॉगिनसाठी मोबाईल नंबर आणि ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) चा वापर केला जाईल. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन, मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे पडताळणीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...