Thursday, May 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22-05-2025

 

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 22 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार, दि. 23 मे  रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 23 मे  रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे ‘पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या: कारणे आणि उपाय’ या संशोधन प्रकल्पाच्या सभेस तज्ज्ञ अभ्यासक म्हणून उपस्थित राहतील.

000000

 

मधाचे गाव आमझरी येथे मधपाळ मेळावा संपन्न

अमरावती, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व गामोद्योग मंडळातर्फे 20 मे 2025 जागतिक मधमाशा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील ‘मधाचे गाव’ आमझरी येथे मधपाळांचा मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आमझरी येथील पर्यटन संकुलात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे, सरपंच  सारिका भास्कर, उपसरपंच वासु हेकडे, मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे, स्फूर्ती क्लस्टरचे सुनिल भालेराव, मधमाशा तज्ज्ञ प्राध्यापक विद्यानंद अहिरे आदिवासी विभागाच्या श्रीमती नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष रामू शेवलेकर, राजेश पटवर्धन, पोलीस पाटील श्रीमती दहिकर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मंगेश बेलनकर, मंगेश वानखेडे, नंदकुमार सहारे, प्रकाश आसोलकार तसेच वनविभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री.चेचरे यांनी मधपाळांना मानवी जीवनातील मधमाशाचे महत्त्व विषद करुन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधाचे गाव आमझरी येथे पुढील काळात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. शासनाने आमझरी मधाचे गाव म्हणून घोषित केले असून या ठिकाणी लवकरच लाभार्थ्यांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण व संबंधित उपक्रम सुरु होणार आहेत. त्यामध्ये स्थानिक मधपाळ व ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे यांनी कृषी विभागाच्या योजनांची यावेळी माहिती दिली. स्फूर्ती क्लस्टरचे सुनिल भालेराव यांनी मार्गदर्शन केले.  राजेश पटवर्धन यांनी बचतगटाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. उपसरपंच वासुदेव हेगडे यांनी मधाचे गाव योजना यशस्वीरित्या राबविण्याचे ग्रामस्थाच्या वतीने आश्वासन दिले. तसेच विद्यानंद अहिरे यांनी मधमाशा पालनाबाबत माहिती दिली.

 

 

मधुसखीची निवड

या कार्यक्रमात प्रमिला कंदिलवार व सुमन कास्देकर यांची मंडळामार्फत ‘मधुसखी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. मधुसखींवर चिखलदरा तालुक्यात मधमाशांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच निर्सगातील मधमाशांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे उद्योग पर्यवेक्षक मंगेश वानखेडे यांनी तर आभार निरीक्षक प्रकाश आसोलकार यांनी मानले. या कार्यक्रमाला आमझरी, टेटु, खडकली, भेलोरी या गावातील मधपाळ व महिला बहुसंख्यने हजर होत्या.

000000

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: 107 सुशिक्षित बेरोजगारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 22 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नुकताच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) उत्साहात पार पडला. या रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फू़र्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा एकूण 210 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 156 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 107 जणांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, राठी असोसिएटच्या संचिता राठी, भारत फायनान्सचे शुभम काकडे, कोअर प्रोजेक्टचे सचिन निचळे, स्पंदन फायनान्सच्या केयुरी देशमुख, जना फायनान्सचे अमोल भुजांडे, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे आणि टेक्नोक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे किरण काळे आदी उद्योजक उपस्थित होते.

या मेळाव्यात सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील पंकज कचरे, कृपा अर्गुलेवर, प्रवीण बंबोळे तसेच अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

'जागतिक तंबाखू नकार दिवस' आणि 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' निमित्त

आरोग्य विभागाचे जनजागृतीपर आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका): 'जागतिक तंबाखू नकार दिवस' 31 मे आणि 17 मे रोजी 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आरोग्य विभागाने तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत आणि असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

तरुणाईमध्ये वाढते तंबाखूचे व्यसन चिंताजनक आहे. 'ग्लोबल युथ टोबॅको सर्वे 2019' नुसार, भारतात 13 ते 15 वयोगटातील जवळपास 8.5 टक्के विद्यार्थी तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूची सहज उपलब्धता, सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, मित्रांचा दबाव, मोठ्यांचे अनुकरण, आवडत्या नटांची नक्कल आणि ताणतणाव यांसारख्या कारणांमुळे तरुणाईमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 1987 पासून 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यामागे तंबाखूचा वापर थांबवणे आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे.

तंबाखूमुळे होणारे गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या आकडेवारीनुसार, 80-90 टक्के तोंडाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण तंबाखू हे आहे. भारतात दरवर्षी सुमारे 13.50 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. तंबाखूमुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, श्वासनलिकेचा, फुफ्फुसाचा कॅन्सर, दातांचे व हिरड्यांचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयासंबंधित आजार, लकवा, पुरुषांमध्ये नपुंसकता, स्त्रियांमध्ये गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे, तसेच नवजात शिशुमध्ये क्लेफ्ट लीप (फाटलेला ओठ) आणि क्लब फूट यांसारखी व्यंगे निर्माण होतात.

भारताचा तंबाखू उत्पादन आणि सेवनात दुसरा क्रमांक असला तरी, तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण मृत्यूंपैकी 63 टक्के मृत्यू हे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंडाचा, स्तनांचा, गर्भाशय मुखाचा), पक्षाघात आणि फुफ्फुसाचे आजार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. यामागे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मद्याचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आणि ताणतणाव हे प्रमुख घटक कारणीभूत आहेत. या घटकांवर नियंत्रण ठेवल्यास, या आजारांमुळे होणारे 70-80 टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात. शासनाच्या जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असाल तर दर महिन्याला स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी. जिभेवर, गालाच्या आतील भागावर, हिरड्यांवर किंवा घशामध्ये लाल चट्टा, पांढरा चट्टा, तोंड उघडता न येणे किंवा 15 दिवसांपेक्षा जास्त काळ न भरलेली जखम अशी कर्करोगपूर्व लक्षणे आढळल्यास, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दंत शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. असे रुग्ण पुढील तपासणी व उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे संदर्भित केले जातील.

कोटपा 2003 कलम 4 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे हा गुन्हा असून 200 रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच, कलम 6 ब नुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या भुरळ घालणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...