Wednesday, September 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.09.2026







                           सुधारित बातमी

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम

 

आदिवासी समुदाय लढवैय्याच, अंद्धश्रद्धेला जीवनात थारा देऊ नका-

 

जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना संदेश

 

        अमरावती, दि. 2 (जिमाका): भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल अशा लढवय्ये व क्रांतिकारी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आणि प्रसंगी मेळघाटात वाघ व अस्वलांशी दोन हात करायला न घाबरणारा हा समुदाय आहे. आपली ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची कास व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विद्यार्थ्यांनी पुढे जावे, असा मोलाचा संदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डोमा येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळेत दिला. तसेच सनदी अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला भीक न घालता आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा मौलिक सल्ला दिला.

 

          चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी, दि. 1 सप्टेंबर रोजीच्या भेटीद्वारे एक अनोखा कार्यक्रम पार पडला. सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाराच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी रात्रभर संवाद साधत प्रगल्भ विचाराचे दर्शन घडविले. याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी संवेदनशील प्रशासनाचे हे एक अत्यंत धाडसी व भूषणावह पाऊल ठरले.

 

       आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  पोलीस अधीक्षक निकेतन कदम,  सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांनी संपूर्ण तालुका प्रशासनासह आश्रमशाळेला भेट दिली.

 

आम्हीही घडलो तुम्हीही घडा

 

         विद्यार्थ्यांसोबत भोजन केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांगत कट्टयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रंगतदार व खुमासदार प्रश्नांनी अनौपचारिक चर्चेतून भविष्यातील ध्येय गाठण्याचे विचार हे यातून पुढे आले. तुम्ही आयएएस आणि आयपीएस कसे झालात हे आपसूक आलेले प्रश्न व त्यांना या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर खास आकर्षण होते. हा संवाद आम्ही घडलो आणि तुम्हीही घडा असाच ठरला.

 

 

 

       शालेय जीवनातच एका आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा बांधलेला चंग जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि आपण विद्यार्थी दशेतच  काय बनायचं हे ठरवलं, ते तुम्हीही करू शकता, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

      सत्यम गांधी आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी बीएची पदवी घेतली असली तरी आपण आयएएस घडलो असल्याचा प्रवास केवळ दुर्दम इच्छाशक्तीने आणि मेहनतीने पूर्ण होऊ शकला. ते आपणही करू शकतात, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

       आश्रमशाळेत कथित भूत असल्याच्या दाव्याविरुद्ध विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला विरोध करण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी या हितगुजावेळी केले. त्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटचालींसाठी मार्गदर्शन केले.

 

       तत्पूर्वी, प्रसिद्ध खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी अंधश्रद्धेविरुद्ध सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन केले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. भोजन करतानाच अनौपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी आश्रमशाळेत मुलींसाठी बांधण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाची पाहणी व उद्घाटनही करण्यात आले.

-------------------

            जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला उद्बोधन केले. आमच्या मनातील भिती दूर केली. आम्हाला विश्वास दिला. मनावर ताबा ठेवून त्याला चांगले वळण लावल्यास आपणही मोठे अधिकारी होऊ शकतो, हा त्यांनी दिलेला संदेश आम्हाला आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत, अशा भावना शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमाची अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी कल्याणी गोपीचंद जावरकरने व्यक्त केल्या.

00000000 

परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी

 

 नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  बुधवार, दि. 8 ऑक्टोबर 2026  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

        वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी  4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

 

      एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी  9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.

 

      कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

0000000

व्यावसायिक व  बिगर  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

 

शासकीय वसतिगृह प्रवेशास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिवार्य आहे.

 

                इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील 12 वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर  येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज  आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.

००००००


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 02.09.2026

                            सुधारित बातमी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम   आदिवासी समुदाय लढवैय्याच, अंद...