Friday, June 7, 2024

बाल धोरण मसूदा; सुधारणा, हरकती, सुचना मागविल्या

 

बाल धोरण मसूदा; सुधारणा, हरकती, सुचना मागविल्या

             अमरावती, दि. 07 (जिमाका): महिला व बालविकास विभागातर्फे बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने हा मसूदा तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 असा हा मसूदा तयार आहे. हा मसूदा शासनाच्या https://womenchlid.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित बालधोरण हे इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून त्यात आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा, हरकती तसेच शब्दरचना, व्याकरण इ. संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. या सुचना नागरिकांनी दि.30 जून रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय, 28 राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे यापत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठविण्यात यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

000000

एकात्मिक फालोत्पादन विकास अभियानातंर्गत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष मोहिम;अर्ज करण्याचे आवाहन

 

एकात्मिक फालोत्पादन विकास अभियानातंर्गत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष मोहिम;अर्ज करण्याचे आवाहन

          अमरावती, दि. 07 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2024-25 अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दि. 15 जुनपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेतंर्गत कृषी सहायकामार्फत प्रत्येक गावात अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करुन महाडीबीटी प्रणालीवरील योजनेची व अर्ज करण्याची कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकरी लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त मेळाव्यास उपस्थित राहुन महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शोध व बचाव वाहनांचे हस्तांतरण; आपात्कालीन परिस्थितीसाठी 24 तास उपलब्ध - सौरभ कटियार

 

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शोध व बचाव वाहनांचे हस्तांतरण;

आपात्कालीन परिस्थितीसाठी 24 तास उपलब्ध - सौरभ कटियार

 

             अमरावती, दि.7 (जिमाका): नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत मदत मिळावी, तसेच आपत्तीची तीव्रता कमी करुन जीवित हानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध व बचाव वाहन प्राप्त झाले आहे. या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला आज हस्तांतरण करण्यात आले.

            जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्धभवल्यास त्याठिकाणी तातडीने पोहोचून उपाययोजना व शोध कार्य करण्याकरिता वाहनाचा उपयोग केला जाणार आहे. या वाहनामुळे आपत्तीची तीव्रता कमी करुन संभाव्य जीवित हानी टाळता येणार आहे. हे वाहन 24 तास आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सज्ज राहील. शोध व बचाव वाहनातील साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आपत्तीप्रसंगी कशा प्रकारे कार्य करण्यात येईल, याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, तहसिलदार प्रशांत पडघम, निलेश खटके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.

            जिल्हा शोध व बचाव वाहनाची खरेदी महसूल व वनविभाग(मदत व पुनवर्सन) विभागाकडून प्राप्त निधीमधून जेम्स पोर्टलव्दारे करण्यात आले. वाहनामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील 12 कर्मचारी एकावेळी बसू शकतात. तसेच शोध व बचाव साहित्यातील लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, कटर, इंन्फेटबल बोट, ओबीयम, जनरेटर, रोप, प्रथमोपचार पेटी, सर्चलाईट आदी सुसज्ज साहित्यासह वाहन जिल्हा शोध व बचाव पथकाला हस्तांतरण करण्यात आले.

00000

 








 

 

 

 

Thursday, June 6, 2024

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

            अमरावती, दि. 06 (जिमाका) :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  19 जुन 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

                                                               000000

शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेतंर्गत अखर्चित निधी शासनखाती जमा करा- समाजकल्याण कार्यालयाचे आवाहन

 

शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेतंर्गत अखर्चित निधी शासनखाती जमा करा- समाजकल्याण कार्यालयाचे आवाहन

       अमरावती, दि.6 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो. त्याअनुषंगाने सन 2018 ते 2024 या कालावधीत महाविद्यालयाने पाठपुरावा न केल्यामुळे तसेच बँकेकडून परत आलेले रक्कम शासनखाती जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्याअनुषंगाने संबंधित विद्यालय, महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी अखर्चित निधी शासनखाती जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

            राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा निधी समाजकल्याण कार्यालयास प्राप्त झालेला होता. यासंदर्भांत विद्यालय व महाविद्यालयाना पत्रव्यवहार, व्ही.सी., बैठका व कॅम्पमध्ये सन 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षातील महाविद्यालयाने पाठपुरावा न केल्यामुळे तसेच बँकेकडून परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्कमेबाबत पाठपुरावा करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. वित्त विभागाचे शासन परिपत्रक दि. 17 मे 2024 अन्वये शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी शासन खाती भरणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विद्यालय, महाविद्यालयातील सदर योजनेतील सन 2018 ते 2024 या कालावधीतील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार रक्कमेबाबत दि. 15 जुन, 2024 पर्यंत या कार्यालयाशी संपर्क साधून अद्यावत बँक पासबुक व रक्कम प्राप्त न झाल्याने प्रतिज्ञापत्र आणावे. विद्यालय, महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालय तसेच विद्यालयाचे प्रमुख म्हणून मुख्याध्यापक, प्राचार्य यांची गांर्भियाने नोंद घेण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त अर्जांला शासनाकडून मंजुरी देण्यात येणार नाही. याबाबत संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावी. विहित मुदतीत अर्ज ऑफलाईन सादर करण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची राहील. कोणतेही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांनी घ्यावी.

                                                            00000

Tuesday, June 4, 2024

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

 



अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

 

       अमरावती, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.

 

 उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.

          उमेदवार निहाय एकूण मतदान याप्रमाणे : बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 5 लक्ष 26 हजार 271, नवनीत रवि राणा (भारतीय जनता पार्टी) 5 लक्ष 6 हजार 540, दिनेश गणेशराव बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) 85 हजार 300, आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना) 18 हजार 793, संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहुजन समाज पार्टी) 4 हजार 513, इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे (पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक) 730,  गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी) 629, गाजी सादोद्दीन जहीर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसिल) 331, दिगांबर वामन भगत (नकी भारतीय एकता पार्टी) 762,  नरेंद्र बाबुलाल कठाणे (देश जनहित पार्टी) 422, भाऊराव संपतराव वानखडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) 329, ॲड राजू मधुकरराव कलाने (बहुजन भारत पार्टी) 495, सुषमा गजानन अवचार (जय विदर्भ पार्टी) 659, अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध (अपक्ष) 1 हजार 206, अरुण यशवंतराव भगत (अपक्ष) 2 हजार 88, किशोर भीमराव लबडे (अपक्ष) 4 हजार 524, किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष) 2 हजार 72, गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे (अपक्ष) 1 हजार 570, तारा सुरेश वानखडे (अपक्ष) 527, प्रभाकर पांडुरंग भटकर (अपक्ष) 365, प्रमोद रामकृष्ण चौरपगार (अपक्ष) 1 हजार 307, ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश (अपक्ष) 337, भरत चंपतराव यांगड (अपक्ष) 441, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे (अपक्ष) 871, मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष) 539, रवी गुणवंत  वानखडे (अपक्ष) 288, राजू महोदवराव सोनोने (अपक्ष) 232, राजेश तुळशीराम खडे (अपक्ष) 239, वर्षा भगवंत भगत (अपक्ष) 443, श्रीकृष्ण सखाराम क्षीरसागर (अपक्ष) 510, सतीश यशवंतराव गेडाम (अपक्ष) 943, श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) 2 हजार 690, सुरज धनराज नागदवने (अपक्ष) 1 हजार 818, सुरेश पुंडलीक मेश्राम (अपक्ष) 1 हजार 52, सोनाली संजय मेश्राम (अपक्ष) 272, संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष) 257, हिमंत भीमराव ढोले (अपक्ष) 670, तर नोटा 2 हजार 544 असे एकूण 11 लक्ष 73 हजार 579 असे वैध मते ठरले. तसेच अवैध मते 1 हजार 200 तर टेंडर मते 59 होते.

 

          या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी लोकशाही भवन, अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून सी.जी. रजनीकांथांन हे बडनेरा, अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले.

 

          मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबल वर करण्यात आली.

00000

 

Monday, June 3, 2024

मतमोजणी प्रक्रियेसाठी लोकशाही भवन सज्ज

 






मतमोजणी प्रक्रियेसाठी लोकशाही भवन सज्ज

अमरावती दि. 3 (जिमाका) : 07 -अमरावती लोकसभा मतदारसंघतील  मतमोजणी उद्या, मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही भवन येथे  सामान्य निरीक्षक सी.जी . रजनीकांथांन, मतमोजणी निरीक्षक श्रीमती अंजना पंडा,   जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे , सागर पाटील, जिल्हा उप निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज येथील मतमोजणीच्या विविध टप्प्यातील कामाचे नियोजन , सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष तसेच अन्य कक्षांची पाहणी करुन मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना निर्देश दिलेत .

0000

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...