Saturday, March 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-03-2026









 मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना

धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

 

मेळघाटातील दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नियोजनातून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.याच अनुषंगाने शनिवार, ७ मार्च रोजी धारणी तहसील कार्यालयांतर्गत धुळघाट रोड परिसरात महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत शासनाच्या योजनांचा लाभ घेतला.

 

प्राप्त माहितीनुसार या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, विद्युत वितरण कंपनी तसेच इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन व निराकरण करण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमात बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी सांगितले की, मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजेच शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होणे होय.

 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडविणे, विविध योजनांचा लाभ देणे तसेच तक्रारींचे त्वरित निवारण करणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांना देण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक शासकीय दाखले वितरित करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या न मारता शासनाच्या सेवांचा लाभ थेट शिबिरातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

धुळघाटरोड येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच सुपीत मालवीय व रोहीत पाल उपस्थित होते. प्रशासनाकडून सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसीलदार राजेश माळी, गटविकास अधिकारी शिडाम, तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असून अशा शिबिरांमुळे दुर्गम मेळघाटातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

00000






















चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण करावी

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री - 2026

             अमरावती, दि. 7 (जिमाका) : विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सवाप्रमाणे चिखलदरा महोत्सवात व्यापकता निर्माण करण्यासाठी महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करावे. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला  चालना देणाऱ्या वैदर्भी महोत्सवाचे यश हाच खरा महिला दिन आहे. या स्तुत्य उपक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

             जिल्हा प्रशासन आणि 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सायन्स स्कोर मैदान येथे 8 मार्चपर्यंत 'महिला दिन महोत्सव' आणि 'विभागीय मिनी सरस व वैदर्भी महोत्सव 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी उद्‌घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, श्रीमती सुलभा खोडके,  रवी राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, गजानन लवटे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता महापात्र, प्रकल्प संचालक  प्रिती देशमुख, माविम संचालक रंजन वानखडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

         पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, महिला बचतगटांनी तयार केलेले वस्तूचे प्रदर्शन व विक्रीमुळे यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक स्थैर्यतेमुळे महिलांच्या जीवनात आमुलाग्र बदल निर्माण होत आहे. ही बाब लाडक्या बहिणींच्या सक्षमतेसाठी महत्वपूर्ण आहे.  उमेदच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्यात येत आहे. त्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना रोजगार निर्मितीसाठी फिरते भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. आज अमरावतीत महिला बचतगटात 2 लाख 20 हजार महिला  सहभागी आहेत. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या वैदर्भी महोत्सवाचे यश हाच खरा महिला दिन असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            राज्यशासन 2026 मध्ये आरोग्यविषयक यंत्रणा अधिक विकसित करण्यावर भर देत आहे. या पाश्वभूमीवर अमरावतीमध्ये टाटा द्रस्टचे हॉस्पीटल स्थापन करण्यात येणार आहे.  चिखलदरा महोत्सवात महिला बचतगटांनी निर्माण केलेल्या वस्तू, खाद्यान्ने यांचे प्रदर्शन तसेच विक्री केंद्र स्थापन करण्यात यावे. चिखलदऱ्याच्या कॉफीचे ब्रॅडिंग करून येथील आदिवासी महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींची योजना सुरुच राहणार आहे. शिवाय 2026 मध्ये अमरावती जिल्ह्यात १ लाख लखपती दिदी बनवायच्या आहेत. शेतकऱ्यांना 2 लक्ष रुपयांची कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार मिळणार आहेत. सूर्यघर योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वांनी या योजनेत सहभागी व्हावे.  शहराच्या विकासावर भर देण्यात येत असून राजकमल ब्रीजसाठी 125 कोटी मिळाले आहे. विविध मंडळात  राजस्व अभियानांतर्गत सर्व सेवा नागरिकांना पुरविण्यात येत आहे. तुकडेबंदी कायदा जावून अमरावतीत 1 लक्ष घरांचे पट्टेवाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले. महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास आणि ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात एकूण 156 स्टॉल्स लावण्यात आले असून, त्यापैकी 110 स्टॉल्सवर महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जात आहे, तर 46 स्टॉल्सवर खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची मेजवानी आहे. ‘द फ्लेवर ऑफ महाराष्ट्र’ अंतर्गत सिंधुदुर्गचे कोकणी पदार्थ, कोल्हापुरी, जळगाव आणि नागपूरच्या विशिष्ट जेवणाचा आस्वाद अमरावतीकरांना घेत आहेत. या स्टॉल्सला  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देवून या महिलांशी संवाद साधला. महिलांचा उद्यमशीलपणा बघून त्यांचे कौतुक केले.

        पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण आणि एकल महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाच्या पोर्टलचे यावेळी करण्यात आले. त्यांनी याप्रसंगी महिलांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी केले.  यावेळी दिंडी युवा वारकरी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात मान्यवरांचे  स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले.

0000000





वलगाव येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' संपन्न

541 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

अमरावती, दि. 7 (जिमाका) : अमरावती तालुक्यातील वलगाव मंडळात आज 7 मार्च रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' उत्साहात पार पडले. सिकची रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरामध्ये शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या शिबिराचे आयोजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखेडे, रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्र्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरात एकूण 541 लाभार्थ्यांना विविध विभागांतर्गत प्रमाणपत्रे, धनादेश, सात बारा उतारा आणि फेरफार पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात 64 नागरिकांना ई-शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. रेवसा येथील पूरग्रस्तांना पुनर्वसन भूखंडांचे 227 सात बारा उतारे देण्यात आले. तसेच 68 विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेची प्रमाणपत्रे देण्यात आली. 61 नागरिकांना अधिवास प्रमाणपत्रे (Domain Certificate) प्रदान करण्यात आली. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. तसेच लेक लाडकी योजना, आयुष्मान गोल्डन कार्ड आणि पी.आर. कार्डचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले. आभार प्रदर्शन तहसीलदार विजय लोखंडे यांनी मानले.

00000


Friday, March 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-03-2026


                                             पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 6 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार, दि. 7 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            या दौऱ्यात श्री. बावनकुळे हे सायन्सकोर मैदान येथे दुपारी 1.30 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलन आणि वैदर्भी जिल्हास्तरीय प्रदर्शनाला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता सांस्कृतिक भवन येथे अमरावती महानगरपालिका आणि एमएआयडीसी यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थित राहून त्यानंतर दुपारी 4 वाजता महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. सायंकाळी 6 वाजता मोर्शी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मोर्शी येथे दत्तापाटील गेडाम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.

00000

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर सभागृह, मोर्शी रोड, अमरावती येथे हा मेळावा आयोजित काण्यात आला आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे या रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्यास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

 

0000000

                     प्रलंबित टपाल तक्रारींसाठी आज 'डाक अदालत'चे आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी उद्या, शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आली आहे. टपाल सेवा हा जनजीवनाचा अविभाज्य भाग असून, सेवा पुरवताना येणाऱ्या त्रुटी किंवा संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हा या अदालतीचा मुख्य उद्देश आहे.

या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली जाणार आहे.

तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे; त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

0000000

#अर्थसंकल्प २०२६-२०२७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


#अर्थसंकल्प २०२६-२०२७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

 

#अर्थसंकल्प २०२६-२०२७ सन २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार.




 #अर्थसंकल्प २०२६-२०२७

सन २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना

 


नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना

Thursday, March 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05-03-2026

 हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका):  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा (चना) खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील मंजूर केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी केंद्र शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित खरेदी केंद्रावर खालील कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. चालू हंगामातील हरभरा पिकांची नोंद असलेला डिजिटल ७/१२ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किवा कॅन्सल चेक (ज्यामध्ये IFSC कोड स्पष्ट दिसेल), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक.

शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी तो स्वच्छ, वाळलेला आणि एफएक्यू दर्जाचा असावा याची खात्री करावी. ऑनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल, त्यानंतरच माल केंद्रावर आणावा. कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत खरेदी केंद्रावरच आपली नोंदणी करावी.

अमरावती विभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

0000000

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती  शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी दि. 18 मार्च 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दीपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी प्रवेश सुरु राहील. इतर सर्व जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.            

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000







धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा

खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासीबहुल तालुक्यासाठी धरतीआबा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे.  त्यामुळे धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन खासदार बळवंत वानखडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रासाठी प्रामुख्याने घरकुलांची योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्राम सडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत. वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने अस्तित्वात असलेले रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.

मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे. यातील तीन गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वीत झाली आहे. मात्र देखभाल दुरूस्तीअभावी येथील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरूस्ती करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात. आरोग्य सेवा देताना त्याठिकाणी मुबलक औषध पुरवठा ठेवण्यात यावा. यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशूधन. वीज पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला.

000000

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन;

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 8 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सक्षमीकरण उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून विविध खेळांच्या स्पर्धांना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने आर्चरी, मल्लखांब, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, बेसबॉल आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांचा समावेश आहे. विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

केवळ खेळांपुरते मर्यादित न राहता, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील विशेष सत्रे आयोजित केली आहेत. अंजनगाव सुर्जी येथे रोशनी महिला मंडळाच्या सहकार्याने 'स्वयंरोजगार: काळाची गरज' आणि 'कौटुंबिक हिंसाचार व कायदा व्यवस्था' या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच लघुउद्योगासाठी मार्गदर्शन करून यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार केला जाईल. यासोबतच मार्डी रोड येथील जिल्हा क्रीडा संकुलात 'वॉरियर्स स्पोर्ट्स अकॅडमी' तर्फे कराटे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचा विशेष गौरव केला जाणार आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावती

जिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित ; 15 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 05 (जिमाका): 'कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013' मधील कायदेशीर तरतुदीनुसार, जिल्हास्तरावर 'स्थानिक तक्रार समिती' गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी पात्र आणि इच्छुक व्यक्तींकडून अर्ज व नामांकने मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

 

 या समितीवरील अध्यक्षपदासाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार महिला किमान पदवीधर असावी आणि त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण तसेच सामाजिक क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणे अनिवार्य आहे. या पदाचा कार्यकाळ नियुक्तीपासून 3 वर्षांचा असेल.

सदस्यपदासाठी दोन जागा रिक्त असून, त्यातील किमान एक सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. यातील एक सदस्य कायद्याची पार्श्वभूमी असलेला असावा, तर दुसरा सदस्य महिलांच्या समस्यांशी परिचित असलेल्या अशासकीय संघटनेतील असावा. तसेच, नियमानुसार किमान एक सदस्य हा अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभवाचे प्रमाणपत्र, संमतीपत्र आणि अर्जाचा मसुदा 'जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गावती चौक, अमरावती' येथे प्रत्यक्ष सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 पर्यंत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000000


#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...