Thursday, March 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05-03-2026

 हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका):  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा (चना) खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील मंजूर केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी केंद्र शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित खरेदी केंद्रावर खालील कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. चालू हंगामातील हरभरा पिकांची नोंद असलेला डिजिटल ७/१२ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किवा कॅन्सल चेक (ज्यामध्ये IFSC कोड स्पष्ट दिसेल), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक.

शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी तो स्वच्छ, वाळलेला आणि एफएक्यू दर्जाचा असावा याची खात्री करावी. ऑनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल, त्यानंतरच माल केंद्रावर आणावा. कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत खरेदी केंद्रावरच आपली नोंदणी करावी.

अमरावती विभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

0000000

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती  शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी दि. 18 मार्च 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दीपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी प्रवेश सुरु राहील. इतर सर्व जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.            

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000







धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा

खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासीबहुल तालुक्यासाठी धरतीआबा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे.  त्यामुळे धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन खासदार बळवंत वानखडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रासाठी प्रामुख्याने घरकुलांची योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्राम सडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत. वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने अस्तित्वात असलेले रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.

मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे. यातील तीन गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वीत झाली आहे. मात्र देखभाल दुरूस्तीअभावी येथील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरूस्ती करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात. आरोग्य सेवा देताना त्याठिकाणी मुबलक औषध पुरवठा ठेवण्यात यावा. यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशूधन. वीज पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला.

000000

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन;

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 8 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सक्षमीकरण उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून विविध खेळांच्या स्पर्धांना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने आर्चरी, मल्लखांब, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, बेसबॉल आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांचा समावेश आहे. विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

केवळ खेळांपुरते मर्यादित न राहता, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील विशेष सत्रे आयोजित केली आहेत. अंजनगाव सुर्जी येथे रोशनी महिला मंडळाच्या सहकार्याने 'स्वयंरोजगार: काळाची गरज' आणि 'कौटुंबिक हिंसाचार व कायदा व्यवस्था' या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच लघुउद्योगासाठी मार्गदर्शन करून यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार केला जाईल. यासोबतच मार्डी रोड येथील जिल्हा क्रीडा संकुलात 'वॉरियर्स स्पोर्ट्स अकॅडमी' तर्फे कराटे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचा विशेष गौरव केला जाणार आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावती

जिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित ; 15 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 05 (जिमाका): 'कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013' मधील कायदेशीर तरतुदीनुसार, जिल्हास्तरावर 'स्थानिक तक्रार समिती' गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी पात्र आणि इच्छुक व्यक्तींकडून अर्ज व नामांकने मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

 

 या समितीवरील अध्यक्षपदासाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार महिला किमान पदवीधर असावी आणि त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण तसेच सामाजिक क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणे अनिवार्य आहे. या पदाचा कार्यकाळ नियुक्तीपासून 3 वर्षांचा असेल.

सदस्यपदासाठी दोन जागा रिक्त असून, त्यातील किमान एक सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. यातील एक सदस्य कायद्याची पार्श्वभूमी असलेला असावा, तर दुसरा सदस्य महिलांच्या समस्यांशी परिचित असलेल्या अशासकीय संघटनेतील असावा. तसेच, नियमानुसार किमान एक सदस्य हा अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभवाचे प्रमाणपत्र, संमतीपत्र आणि अर्जाचा मसुदा 'जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गावती चौक, अमरावती' येथे प्रत्यक्ष सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 पर्यंत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 05-03-2026

  हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अमरावती, दि. 05 (जिमाका):  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत...