Monday, March 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02-03-2026




                                 धारणीत ह्युमन मिल्क बँक, अमरावतीत आयटी पार्कसाठी वेग

अमरावती, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या धारणी येथे ह्युमन मिल्क बँक आणि अमरावतीमध्ये आयटी पार्क स्थापन करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज खासदार डॉ. अनिल बोंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार उपस्थित होते.

खासदार डॉ. बोंडे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी धारणी येथे 'ह्युमन मिल्क बँक' स्थापित करण्यात यावी. या योजनेची उपयोगिता मेळघाटात सर्वाधिक आहे. डफरीन येथील ह्युमन मिल्क बँकेचे उत्तम परिणाम मिळत आहे. त्याच धर्तीवर ह्युमन मिल्क बँक कार्यान्वित करताना तपासणी, साठवणूक, स्वच्छता घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वन विभागाच्या जमिनीवर 'वड उद्यान' निर्माण करण्यात यावे. शहरात आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा आरक्षित करण्यात यावी. आयटी पार्कच्या विस्तारासाठी सलग जागेची आवश्यकता आहे. यासाठी संबंधितांना जागेची पाहणी करण्याबाबत कळविण्यात यावे.

मोर्शी शहरातील वाढते अतिक्रमण आणि येरला येथील 1998-99 मधील घरकुल पट्टे वाटपाचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांच्या सीएसआर निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा. यासाठी सर्व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. सीएसआर फंडसाठी बॅंक, कंपन्यांनी आवश्यक सामाजिक विषय प्राधान्याने घेण्यात यावा. आरोग्य, जिल्हा परिषदेच्या शाळा, डिजिटल शिक्षण, पर्यावरण यासारख्या घटकांवर निधीचा विनियोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याव्यतिरिक्त, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चिल्ड्रन्स पार्क व ग्लो गार्डन उभारण्यासाठी अंदाजे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संगीता भिसे यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धारणे येथे आदिवासी मुलांसाठी खेलो इंडियासाठी क्षेत्र विकसित करण्यासाठी जागेची पाहणी करावी. तसेच चिखलदऱ्याप्रमाणे चांगले गार्डन, चिल्ड्रन पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश धारणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

0000000






जिल्ह्यात महाराजस्व शिबीरात 95 मंडळात कार्यक्रम

*महसूल सेवा आता थेट जनतेच्या दारी

अमरावती, दि. 2 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. पाच टप्प्यात प्रत्येक महसूल मंडळात एक कार्यक्रम याप्रमाणे 95 कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराजस्व अभियान मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. या अभियानात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच दिवसात सेवा देण्यात येणार आहे. यात प्रलंबित आणि विवादग्रस्त फेरफार प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे, सातबारामधील चुका दुरुस्त करणे आणि डिजिटल सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरीत करणे, अकृषिक परवानगीबाबत नवीन सुलभ तरतुदी, सनद प्रणाली रद्द झाल्याचे फायदे आणि सुधारीत तुकडेबंदी कायद्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

अभियानाची सुरवात 7 मार्च रोजी होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वलगाव येथे या अभियानाची सुरवात होणार आहे. 7 मार्च रोजी 18, 14 मार्च रोजी 17, 10 एप्रिल रोजी 18, 17 एप्रिल रोजी 14, 8 मे रोजी 17 आणि 15 मे रोजी 14 मंडळात समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्याशी निगडीत जिवंत सातबारा, सामाजिक अर्थ सहायाच्या योजना, तुकडेबंदी, फेरफार, घरपोच सातबारा, सातबारावरील दुरूस्ती, पट्टेवाटप आदी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. समाधान शिबिरात येणााऱ्या कोणत्याही नागरिकाला या प्रक्रियेत त्रास होणार नाही आणि सर्व सेवा पारदर्शकपणे पुरविल्या जातील याची दक्षता घेण्यात येणार आहे. शिबीराच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.

000000

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी

*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

अमरावती, दि. 2 (जिमाका): मेळघाटातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीने 10 मोबाईल टॉवरच्या कामाला मंजुरी दिली आहे. यात 9 बीएसएनएल आणि एक ऑप्टीक फायबरच्या टॉवरचा समावेश आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे संनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी परतवाड्याचे विभागीय वन अधिकारी अनंता दिघोळे उपस्थित होते.

मेळघाटातील दहा बीएसएनएलच्या टॉवरला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीची मंजुरी आवश्यक असते. त्यानुसार मेहरीआम, बिच्छुखेडा, खोकमार, घाणा, खामदा, धोकडा, मारीता, खंडुखेडा, भुत्रुम आणि चौराकुंड ते चोपन, रंगुबेली ते धोकडा, रूईपठार ते भुत्रुम येथे भुमिगत ऑप्टीकल फायबर टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.

जिल्हा सनियंत्रण समितीच्या मान्यतेमुळे बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे. यामुळे नेटवर्कींगमध्ये गती येणार असून मोबाईलची सेवा जलद गतीने आणि विनाव्यत्यय होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच वनक्षेत्रात करण्यात येणारे जलसंधारण तसेच इतर कामांनाही मंजुरी देण्यात आली.

000000




जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा

अमरावती, दि. 2 (जिमाका) : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि प्रमुख वक्ते अविनाश दुधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, अधिक्षक निलेश खटके आणि विधी अधिकारी नरेंद्र बोहरा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते श्री. दुधे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध वारशावर प्रकाश टाकला. त्यांनी मराठीला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास असल्याने तिला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला असल्याचे सांगितले. मातृभाषा हे संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन असून मराठीतून बोलणारी व्यक्ती जगातील कोणतीही भाषा आत्मसात करू शकतो. भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा किमान पाच टक्के भाग पुस्तके खरेदीसाठी खर्च करावा, असे आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी वाचनाच्या सकारात्मक परिणामांवर भर दिला. मराठी भाषेचा ऱ्हास थांबवण्यासाठी नवीन पिढीला वाचनाची गोडी लावणे आवश्यक असल्याने मत व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. मडावी यांनी मराठी भाषा जपण्याचा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन केले.

सिमिता दाभिरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले. सलोनी उमाळे यांनी आभार मानले.

0000000

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात

          अमरावती, दि. 2 (जिमाका): स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे ‘अमृत पेठ 2026’ या उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक 6 ते 8 मार्च 2026 या कालावधीत शहरांतील जाधव पॅलेस येथे संपन्न होणार आहे.

       या कार्यक्रमाला  ‘अमृत पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, अमृतचे विभागीय व्यवस्थापक  प्रवीण कोळेश्वर उपस्थित राहणार आहे. स्थानिक नवउद्योजक, महिला बचत गट आणि स्टार्टअप्स यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

          अमरावतीकरांनी आपल्या कुटुंबासह या मेळाव्याला भेट द्यावी. या मेळाव्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. हा मेळावा महिला उद्योजकांसाठी आपली कौशल्ये आणि उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी निर्माण करणार आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील थेट संपर्कामुळे स्थानिक उद्योगांना नवी गती प्राप्त होईल. या प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी 9527317068 किंवा 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

सामाजिक न्यायच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या वर्षासाठी आणि ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. इच्छुकांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षाकरीता चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागणार आहे.

सन 2024-2025 या वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेव आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब आंबेडकर पारितोषिक, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्काराची जाहिरात आणि अर्जाचा नमुना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे संपर्क करावा. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी दि. 15 मार्चपर्यंत अर्ज कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 02-03-2026

                                          धारणीत ह्युमन मिल्क बँक, अमरावतीत आयटी पार्कसाठी वेग अमरावती, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील दुर्गम ...