Wednesday, March 11, 2026

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

 

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ;

20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या मासिक अनुदानात हजार  रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा 2 हजार 500 रुपये अनुदान थेट बँक खात्यात मिळणार आहे. मात्र, या वाढीव लाभाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन युडीआयडी कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेतील 21 हजार 359 आणि श्रावणबाळ योजनेतील 1 हजार 913 अशा एकूण 23 हजार 272 लाभार्थ्यांचे युडीआयडी  कार्ड अद्याप आधारशी संलग्न नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही दिव्यांग लाभार्थी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित गावातील तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावे. तसेच, लाभार्थ्यांनी स्वतःहून युडीआयडी पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अनुदानात अडचणी येऊ शकतात, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

0000000


दिव्यांग लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 11 (जिमाका): अमरावती शहर तहसीलदार (संजय गांधी योजना) यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) आधार कार्डशी संलग्न (E-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. प्रियांका मिसाळ यांनी केले आहे.

       शासन निर्देशानुसार, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या युडीआयडी कार्डशी लिंक नसेल, अशा लाभार्थ्यांचे एप्रिल 2026 पासून मिळणारे 2 हजार 500 रुपये मासिक अनुदान तांत्रिक कारणास्तव थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संजय गांधी योजना कार्यालय, अमरावती शहर येथे 31 मार्चपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

लाभार्थी ही ई-केवायसी प्रक्रिया स्वतः www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावरून किंवा UDID App द्वारे करू शकतात. याशिवाय जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा संजय गांधी योजना शहर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहूनही ही नोंदणी करता येईल. कार्यालयात येताना लाभार्थ्यांनी आपला मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप युडीआयडी कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी शासकीय रुग्णालयातून ते तात्काळ प्राप्त करून घ्यावे, कारण भविष्यात लाभ सुरू ठेवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य राहणार आहे, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

0000000


जिल्ह्यात 'पोकरा' अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन

      अमरावती, दि. 11 (जिमाका): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्याची अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेतून गावपातळीवर 'कृषी अवजार बँक' स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या 60 टक्क्यांपर्यंत म्हणजेच कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद  आणि माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

         या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. जर एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थींची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, राष्ट्रीयकृत बँकेकडून 75 टक्के कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

     निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यांसारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर (https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/) 5 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...