Friday, March 13, 2026

DIO NEWS AMRAVATI 13 -03-2026

 


पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;

केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

अमरावती, दि. 13 ( जिमाका ):  अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र, नांदगाव पेठ येथे नव्याने विकसित होत असलेल्या 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क'ला आज भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी भेट देऊन पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होणाऱ्या टेक्सटाईल पार्क्सपैकी अमरावती येथील पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव मा. डॉ. पी अन्बलगन, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. एकूण 1 हजार 20 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या पार्कमध्ये रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, केबलिंग, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात 100 एकर क्षेत्रावर एमआयडीसीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पात नेदरलँडमधील 'मेसर्स टिटिवायएम मॅनेजमेंट बी.व्ही.' या कंपनीद्वारे कापूस प्रक्रिया आणि संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासाठी 66 एकर जमिनीवर पहिली परकीय गुंतवणूक करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील एकूण औद्योगिक विकास आणि या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधींविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग संचालक अनिल कुमार, सहसंचालक विनय मिश्रा आणि नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये एमआयडीसी नागपूरचे मुख्य राजेश झंझाड यांनी आभार मानले.

00000

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित;

अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हा प्रशासनाचे आवाहन

        अमरावती, दि. 13 ( जिमाका ): महिलांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रभावीपणे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 'जिल्हास्तरीय  एचपीव्ही लसीकरण' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नुकतेच आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. प्रवीण पारिसे यांनी सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचे आणि अफवांचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही लस सर्वसामान्यांना देण्यापूर्वी तिच्या अनेक स्तरांवर कठोर वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात आणि ही लस सर्व निकषांवर यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पालकांनी कोणत्याही निराधार अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे सांगण्यात आले असून, ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून कायमचे संरक्षण मिळवून देते. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण खराटे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य गजभिये, डॉ. निखिल उप्पलबार, डॉ. गीतांजली लखदिवे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000000

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

अमरावती, दि. 13 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना नामांकित खासगी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 24 मार्च 2026 रोजी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (टीसीएस) ही नामांकित कंपनी या मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांची निवड करणार आहे.

स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. टीसीएस कंपनीला आवश्यक असणाऱ्या विविध पात्रतेच्या पदांसाठी कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेतील. विशेष म्हणजे, मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना या मेळाव्यातून रोजगार मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्यूआर कोडस्कॅन करून आपली ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर प्राप्त होणाऱ्या 'Registration Slip' ची प्रिंट सोबत ठेवावी. मेळाव्याच्या दिवशी, म्हणजेच 24 मार्च रोजी सकाळी, स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

नोंदणीबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयाच्या ०७२१-२५६६०६६ किंवा ८९८३२८८९८२ या क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली यो. बारस्कर यांनी केले आहे.

0000000

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1) व (3) लागू

अमरावती, दि. 13 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 13 मार्च  ते दि. 27 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज;

 ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग

अमरावती, दि. 13 ( जिमाका ):  जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचे संकट आणि हवामान बदलाचा धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, गृह मंत्रालय, भारत सरकार, ‘जीआयझेड’आणि ‘आद्रा इंडिया’ यांच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन’ (In CRIS) हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांचे तीव्र उष्णतेपासून संरक्षण करणे हा आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात पुसदा, यावली, शिराळा, रोहनखेड, भातकुली, खोलापूर आणि दारापूर यांसारख्या निवडक गावांमध्ये सखोल मूल्यांकन आणि अंतर विश्लेषण करण्यात आले. या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, शेतमजूर तसेच आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांशी थेट संवाद साधून उष्णतेचा त्यांच्या आरोग्यावर आणि उपजीविकेवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे, आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि बाहेरील कामगारांसाठी 'शितकक्ष कॉरिडॉर', विश्रांती क्षेत्रे, थंड पाण्याचे डिस्पेंसर आणि 'ग्रीन शेड' (हिरव्या सावलीची ठिकाणे) उभारली जाणार आहेत, ज्यामुळे अति तापमानात आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होईल.

केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर जनजागृतीवरही प्रशासनाने मोठा भर दिला आहे. 'काय करावे आणि काय करू नये' याबद्दलचे प्रशिक्षण, लिंग-विशिष्ट उष्णता असुरक्षिततेवर चर्चा आणि विविध प्रचार साहित्याद्वारे समुदायाची क्षमता बांधणी केली जाणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी श्री. येरेकर अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे.  संपूर्ण जिल्ह्यात उष्माघाताबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. गृहनिर्माण, आरोग्य, हिरवळीची जागा आणि पाणी या क्षेत्रांमधील समन्वयातून उष्णतेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सज्ज झाले आहे.

0000000

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या 'खुल्या धोरणा'ला स्थगिती;

नवीन परवाने देण्यास तूर्तास बंद

अमरावती, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत सुरू असलेल्या 'खुल्या धोरणाला' तूर्तास स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, नवीन परवान्यांसाठी दिले जाणारे 'इरादापत्र' देण्याचे काम थांबविण्यात आले असल्याची माहिती अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे. नुकत्याच राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या धोरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी आणि विनंती अर्जांचा विचार करून हे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने 17 जुलै 2017 रोजीच्या अधिसूचनेद्वारे जुन्या निर्णयांमध्ये बदल करून नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा परवाने जारी करण्यावरील निबंध हटवले होते, ज्यामुळे परवाने मिळणे सुलभ झाले होते. मात्र, या खुल्या धोरणामुळे रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत राज्यातील विविध संघटनांनी हे धोरण बंद करण्याची मागणी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता नवीन परवाने देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

0000000

‘उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;

नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

अमरावती, दि. 13 ( जिमाका ):  केंद्र शासन पुरस्कृत 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत जिल्ह्यात होणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी होणारी ही परीक्षा आता रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10  ते सायंकाळी 5 या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत असाक्षरांची नोंदणी आणि पोर्टलवर त्यांचे टॅगींग करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी आणि साक्षरता वर्गातील उमेदवारांना परीक्षेसाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने राज्यस्तरावरून परीक्षेचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रलंबित असलेले नोंदणी व टॅगींगचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, साक्षरता वर्ग नियमितपणे सुरू ठेवून शिक्षकांनी या वर्गांना भेटी द्याव्यात आणि उमेदवारांकडून प्रश्नपत्रिकांचा सराव करून घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

0000000

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'सुकन्या समृद्धी' व 'आरडी' खाते उघडा;

16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

अमरावती, दि. 13 ( जिमाका ): भारत सरकारच्या 'बेटी बचाव, बेटी पढाओ' आणि 'महिला सक्षमीकरण' अभियानांतर्गत अमरावती डाक विभागातर्फे 16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सुकन्या समृद्धी खाते आणि 'आरडी खाते घरोघरी' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शून्य ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये  बचतीची सवय रुजवण्यासाठी डाक विभाग विशेष पुढाकार घेत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत, पालक आपल्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही नजीकच्या डाकघरात किमान 250 रुपये भरून उघडू शकतात. या योजनेवर सध्या 8.2% असा आकर्षक व्याजदर मिळत असून, खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड तसेच पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय, बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान 100 रुपये भरून आवर्ती ठेव (आरडी) खातेही उघडता येणार आहे, ज्यावर 6.7% व्याजदर लागू आहे. या खात्यासाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असून सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी डाक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शाळा, अंगणवाड्या आणि घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडून एक भरीव पाऊल उचलावे आणि स्वतःसाठी बचतीची सवय लावण्यासाठी आरडी खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर पि. ए. गेडाम यांनी केले आहे.

000000

 

अचलपूर येथे अवैध गौणखनिज वाहतुकीत जप्त वाहनांचा 25 मार्च रोजी जाहीर लिलाव

अमरावती, दि. 13 ( जिमाका ):अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अचलपूर तहसील प्रशासनामार्फत गौणखनिज भरारी पथकाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेली मात्र दीर्घकाळापासून दंडाची रक्कम न भरलेली 13 वाहने आता जाहीर लिलावात काढण्यात येणार आहेत. हा लिलाव येत्या 25 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता तहसीलदार, अचलपूर यांच्या दालनात पार पडणार आहे.

तहसील कार्यालय, अचलपूर अंतर्गत भरारी पथकामार्फत अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई करून अनेक वाहने जप्त करण्यात आली होती. नियमानुसार या वाहन मालकांना दंडाची आकारणी करण्यात आली होती, परंतु अनेक गैरअर्जदारांनी अद्याप शासकीय दंडाचा भरणा केलेला नाही किंवा कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. परिणामी, ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा आहेत. संबंधित वाहन मालकांना पत्राद्वारे दंड भरण्याची शेवटची संधी देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने, अखेर या वाहनांची विल्हेवाट लावून शासकीय दंडाची वसुली करण्यासाठी लिलावाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

या लिलावासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय , अमरावती यांच्याकडून सर्व 13 वाहनांचे तांत्रिक मूल्यांकन मागविण्यात आले होते. आरटीओकडून प्राप्त झालेल्या मूल्यांकन आणि घोषित 'हातच्या किमती'नुसार  हा लिलाव केला जाणार आहे. या जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना प्रशासनाने आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे शासकीय महसुलाची थकबाकी वसूल होण्यास मदत होणार असून, अवैध गौणखनिज माफियांनाही यातून कडक इशारा देण्यात आला आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे मंगळवार, दि. 17 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात  दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ;

प्रलंबित अर्जदारांना हजर राहण्याचे आवाहन

अमरावती , दि. 13 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे प्रलंबित दिव्यांग अर्जांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन युडीआयडी  पोर्टलवर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशा सर्व अर्जदारांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

            अर्जदारांनी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आपले मूळ अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित राहावे. ही मोहीम पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

           केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कॅन्सर, हृदयरोग, टी.बी., एचआयव्ही ग्रस्त, चर्मरोग व इतर दुर्धर आजार हे दिव्यांगत्वाच्या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा आजारग्रस्तांनी ऑनलाईन अर्ज करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकदा माहितीअभावी असे रुग्ण अर्ज करतात आणि त्यांना आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपली तपासणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

0000000



ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नये

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात फोनद्वारे होणाऱ्या बुकींगसाठी वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये घबराहट निर्माण झाली. परिणामी ग्राहकांनी आवश्यकता नसताना खबरदारी म्हणून गॅस बुकींग सुरू केले. यामुळे वितरणावर परिणाम होत असल्याने ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील घरगुती गॅस  सिलिंडरच्या वितरणाबद्दल वितरकांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्यासह शहरातील गॅस वितरक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी वितरकांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. वितरकांनी ग्राहकांसाठी ॲप, तसचे फोनद्वारे बुकींगची सुविधा आहे. मात्र फोनद्वारे गॅस बुकींग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या यंत्रणेमध्ये दुरूस्ती सुरू आहे. परिणामी ग्राहकांना बुकींग करताना वेळ लागत आहे. तसेच मध्यपूर्व भागातील युद्धामुळे घबराटीचे वातावरण असल्यामुळे ग्राहक आगाऊ गॅस बुकींग करीत आहे. बुकींग जादा झाल्यामुळे वितरणाला वेळ लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशाप्रकारची बुकींग टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बुकींगनंतर ग्राहकांना घरपोच  सिलिंडर देण्यात येत असल्याचे सांगितले.

शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे वितरकांनी घरगुती सिलिंडर वितरणावर लक्ष केंद्रीत करावे. गॅस कंपन्यांनी वितरणाची सशक्त यंत्रणा उभारली असली तरी बुकींग केलेल्याच ग्राहकांना सिलिंडरचे वितरण करण्यात यावे. तसेच एजंसीसमोर सिलिंडरच्या रांगा लागत असल्याने ग्राहकांना घरपोच  सिलिंडरचे वितरण करण्यात यावे. देशात जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे वितरकांनी याबाबत काळजी घ्यावी. सध्यास्थितीमध्ये आश्रमशाळा, रूग्णालय, वसतिगृहे यांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

गॅस एजंसीधारकांसमोर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी. जिल्हा प्रशासन निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. एजंसीच्या ठिकाणी आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षणाची मागणी करावी. तसेच शहराच्या लगत ग्रामीण भागात मागणीनुसार पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. घरगुती  सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13 -03-2026

  पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण; केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी   केली   पाहणी अमरावती, दि. 13 ( जिम...