जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा नियोजन व विकास समितीमधील संपूर्ण निधीचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असलेल्या सर्व मान्यता देण्यात आल्या आहे. त्यामुळे यंत्रणांनी 25 मार्चपूर्वी निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजनच्या खर्चाबाबत अंतिम बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावर्षीच्या जिल्हा वार्षिकच्या निधीमधून एकही रूपया परत करू नये. व्यपगत होणारा निधी तातडीने जिल्हा नियोजनला कळविण्यात यावा. तसेच हा निधी परत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच यंत्रणांना निधीची आवश्यकता असल्यास त्याची माहिती सर्व मान्यतासह सादर करण्यात यावी. या कामांच्या गरजेनुसार निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिकच्या जिल्ह्यातील कामांना 25 मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे खर्चाबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
यंत्रणांनी कामे पूर्ण केली असल्यास देयके तातडीने कोषागारामधून आहरित करण्यात यावी. तसेच आभासी वैयक्तिक ठेव लेखा या यंत्रणेचा उपयोग करण्यात यावा. या यंत्रणेचा उपयोगाने निधी एक वर्षापर्यंत उपयोगात आणू शकता येणार आहे. या सेवेच्या माहिती करून द्यावी, जिल्ह्यातील यंत्रणांच्या सहकार्य करण्यासाठी कोषागार कार्यालयाने मदत करावी. त्यामुळे यंत्रणांनी वेळेवर निधी समर्पित करू नये, असे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी वर्षा भाकरे यांनी जिल्हा नियोजनचा निधी व्यपगत होऊ नये, यासाठी तातडीने निधी आहरित करण्यात यावा, असे सांगितले. जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी व्हीपीडीए पद्धतीची माहिती दिली. याबाबत माहिती आणि मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगितले.
00000
परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन
वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी देय असावा.
एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 20 मार्च 2026 रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.
एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्टधारकांनी दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.
00000
'मिशन लक्षवेध' अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;
30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): ऑलिम्पिक स्तरावरील खेळांमध्ये महाराष्ट्राचे स्थान निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मिशन लक्षवेध' योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने 'जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा'साठी कुस्ती, मैदानी (ॲथलेटिक्स) आणि शूटिंग या तीन क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीद्वारे प्रत्येक खेळातून 20 अशा एकूण 60 खेळाडूंची निवड केली जाणार असून, निवड झालेल्या खेळाडूंचा सराव, आहार, गणवेश, क्रीडा साहित्य आणि स्पर्धांचा प्रवास खर्च शासन उचलणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2026 रोजी 21 वर्षांखालील वय असलेले आणि गेल्या दोन वर्षात किमान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा पदक मिळवलेले खेळाडू पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, बोनाफाईड आणि पालकांचे संमतीपत्र यांसह 30 मार्च 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
निवड चाचणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे: दि. 8 एप्रिल रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे मैदानी खेळांची चाचणी होईल, दि. 9 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन चौक येथे कुस्तीची चाचणी, तर दि. 10 एप्रिल रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे शूटिंगची चाचणी पार पडेल. सर्व चाचण्या सकाळी 8 वाजता सुरू होतील. या प्रक्रियेसाठी श्रीमती ममता कोळमकर (9823704347) यांची निवड चाचणी समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment