Monday, March 30, 2026

विशेष लेख - 'डिजिटल महाराष्ट्र'च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!

 


विशेष लेख

 

'डिजिटल महाराष्ट्र'च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!

 

          महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत' राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या वतीने करण्यात आले. या अत्यंत महत्त्वाकांक्षी मूल्यमापनाचे निकाल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावती महानगरपालिकेने २०० पैकी १७९.५० गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. ही नेत्रदीपक कामगिरी महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासन, तांत्रिक कार्यक्षमता आणि सेवा वितरणातील प्रगतीचे जिवंत द्योतक ठरली आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डिजिटल उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रयोग आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आल्याने हे यश संपादन करता आले आहे.

        महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री सभागृह, मुंबई येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला.

 

    

 

कार्यपद्धतीत सुधारणा करीत थेट पाचव्या स्थानी झेप !

 

    भारतीय गुणवत्ता परिषदेकडून करण्यात आलेल्या या सर्वंकष मूल्यमापनात सात प्रमुख निकषांवर कामगिरी तपासण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI (Artificial Intelligence) व Blockchain चा वापर तसेच GIS (Geographic Information System) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता. या सर्व निकषांवर अमरावती महानगरपालिकेने उत्कृष्ट अंमलबजावणी करत ई-गव्हर्नन्स क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमांतर्गत तर्फे विकसित करण्यात आलेल्या स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर संबंधित माहिती व कार्यप्रगती सादर करण्यात आली होती. प्राथमिक छाननीनंतर  भारतीय गुणवत्ता परिषदेकडून सखोल मुलाखती व प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यात आले. या यशाला विशेष महत्त्व आहे, कारण प्राथमिक मूल्यमापनात अमरावती महानगरपालिका आठव्या स्थानावर होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कार्यपद्धतीत सुधारणा करत नव्याने नियोजन, तांत्रिक सक्षमीकरण आणि नागरिककेंद्रित उपक्रमांवर भर दिला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून अंतिम मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने पाचव्या स्थानी झेप घेतली.

 

आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रम

 

      'आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शासकीय प्रणाली - एक नवीन युगाची वाट' या ब्रीदवाक्याला अनुसरून अमरावती महानगरपालिकेने अनेक विशेष उपक्रम राबविले आहेत. या यशामागे ई-गव्हर्नन्स क्षेत्रात राबविण्यात आलेल्या ‘माय अमरावती व्हॉट्सॲप चॅटबॉट व चॅनलद्वारे नागरिकांशी थेट संवाद, रिमोट सेन्सिंगवर आधारित ‘कूल रूफ उपविधी २०२५, GIS व ड्रोन मॅपिंगद्वारे सुधारित मालमत्ता कर मूल्यांकन, स्वच्छता वॉर रूम आणि ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी यांचा मोठा वाटा आहे. तसेच, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Re-engineering) करून सेवा वितरण जलद करण्यात आले आहे. या यशाबाबत प्रतिक्रिया देताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या की, महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ व नागरिकाभिमुख करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, भविष्यातही नागरिकांना अधिक दर्जेदार आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

पर्यावरण संवर्धन आणि शहर विकासातील कामगिरी

स्वच्छ हवा गुणवत्ता सर्वेक्षणात अमरावती भारतात पहिल्या क्रमांकावर !

 

        ई-गव्हर्नन्ससोबतच स्वच्छ हवा गुणवत्ता सर्वेक्षण २०२५ मधील अमरावती शहराची कामगिरी अत्यंत सरस राहिली आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अमरावती भारतात पहिल्या क्रमांकावर असून, शहराला सर्वेक्षणात २०० पैकी २०० गुण मिळाले आहेत. या कामगिरीसाठी वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय, शहराचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने नवीन शहरी नियोजन धोरणे सुरू केली आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी आणि शहरातील 'शहरी उष्णता बेटे' (Urban Heat Island) प्रभाव कमी करण्यासाठी इमारतींवर 'कूल रूफ' (थंड छप्पर) अनिवार्य करणारे नवीन नियम लागू केले आहेत. हे उपनियम हवामान लवचिकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले असून, या पर्यावरणीय उपाययोजनांची देखरेख करण्यासाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे.

 

 

 

नागरिक-केंद्रित विशेष तंत्रज्ञान उपक्रम

 

       अमरावती महानगरपालिकेने नागरी सेवा सुधारण्यासाठी 'मुख्यमंत्री-१५० दिवस' कार्यक्रमांतर्गत अनेक विशिष्ट उपक्रम कार्यान्वित केले आहेत. यामध्ये व्हॉट्सॲप चॅटबॉट सर्व नागरी सेवा मिळवण्यासाठी 'एकच खिडकी' म्हणून काम करत आहे. 'कामगार पोर्टल'द्वारे कामगार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी हस्तलिखित कागदपत्रे कमी करून प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्यात आले आहे. 'ब्लॉकचेन तंत्रज्ञान' चा वापर करून कागदपत्रांची पुनरावृत्ती टाळणे आणि महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे, ज्यासाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. तसेच, 'महापालिका संदेशिनी' हे अधिकृत वृत्त पोर्टल विश्वसनीय पालिका माहितीसाठी कार्यरत आहे. मोठ्या महानगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी यशस्वी स्पर्धा करत मिळवलेला हा पाचवा क्रमांक अमरावती महानगरपालिकेसाठी अत्यंत अभिमानास्पद असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ देणारा आणि भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. या यशामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे !

                             

 अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

                          

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 30-03-2026

  जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन; युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित अमरावती, दि. 30 (जिमाका)...