Friday, March 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20-03-2026

 जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर

अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करावेत

*पशूसंवर्धन विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अंतर्गत अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त पदांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी दि. 2 एप्रिलपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीच्या तरतुदीनुसार आणि नियम 2001 मधील निकषांनुसार, प्राणी क्लेश व्यवस्थापकीय समितीवरील सदस्य, गौशाळा किंवा पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती, मानवहित किंवा प्राणीमात्रांवर प्रेम करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतील.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 2 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा सदस्य सचिव, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, अमरावती या ठिकाणी स्विकारण्यात येतील. जिल्ह्यातील प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. एस. एम. कावरे यांनी केले आहे.

000000

मॅग्नेट' प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेटी दि. 16 ते 18 मार्च कालावधीत पार पडल्या. प्रकल्पाच्या 'बाजार विकास व प्रोत्साहन' घटकांतर्गत दौऱ्यात 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

या दौऱ्यात शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांनी चिखली येथील 'आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी'ला भेट दिली. येथे भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग, निर्यातीच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन फळबाग व्यवस्थापना विषयी माहिती घेतली. सिन्नर येथील कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट देऊन परदेशातील निर्यात संधींची माहिती घेतली. त्यानंतर सह्याद्री फार्म्सला भेट देऊन शेतकरी बळकटीकरण, मूल्यवर्धन आणि मोठ्या प्रमाणावरील निर्यात साखळीचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच जैन हिल्स, जळगाव येथील टिश्यू कल्चर कंपनीला भेट देऊन केळीच्या महिला बळकटीकरण, नवीन जाती आणि दर्जेदार रोपांविषयी माहिती घेतली. जैन इरिगेशनमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याची माहिती घेऊन जैन फूड पार्कमधील प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेशी जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रकल्प उपसंचालक अरुण नादरे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यास दौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्‍ज्ञ अक्षय गणेशपुरे आणि विद्या पुंड यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

0000000

दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग कार्ड जमा करावे

*जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप ऑनलाईन यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी कार्डची झेरॉक्स प्रत गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग येथे दि. 25 मार्च 2026 पूर्वी जमा करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.

0000000

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 30 मार्चपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 23 ते 30 मार्च 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : आर्थिक वर्षाच्या शेवटी मालमत्ता खरेदी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 26 मार्चपासून सलग ही कार्यालये सुरू राहतील.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांत नियंत्रक यांच्या निर्देशानुसार, इष्टांक पूर्तीच्या दृष्टीने दि. 26 मार्च, दि. 28 मार्च, दि. 29 मार्च आणि दि. 31 मार्च या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहतील. तसेच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी ही शनिवार आणि रविवार सोडून अन्य दिवशी आहे. ती कार्यालये त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू ठेवावीत. उपरोक्त दिवसांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहीत वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील कार्यरत राहणार आहे.

सुट्टीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय चालू राहणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब घोंगडे यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवनात मंगळवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या नामांकित आयटी कंपनीमार्फत बीपीएस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून शैक्षणिक पात्रता बीए, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीव्हीओसी, बीएससी जनरल आहे. यात 2023 आणि 2024 यावर्षात उत्तीर्ण, तसेच एमए, एमकॉम 2024 आणि 2025 उत्तीर्ण पात्रता निकष राहणार आहे.

निवड प्रक्रिया ही कागदपत्र पडताळणी, योग्यता परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीतून होणार आहे. नोंदणीसाठी surl.li/lxxjb लिंक वरूनही नोंदणी करता येणार आहे. अधिक महितीसाठी विभागीय रोजगार मेळावा कक्ष प्रमुख अजय चव्हाण (8983419799) तसेच विभागीय कौशल्य विकास सहायक अक्षय डोईजड (7972755787) यांच्याशी संपर्क साधावा.

रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी सहभागी होऊन टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, विभागीय उप आयुक्त द. ल. ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026

    महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे * कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई कर...