Wednesday, March 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25-03-2026


                                जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध

अफवांवर विश्वास ठेऊ नये : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

इंधन टंचाईबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडून घाबरून जाऊ नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. इंधनाची साठवणूक करण्यात येऊ नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

इंधन कंपन्यांच्या आजच्या सद्यस्थितीनुसार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नायरा या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू आहे. भारत पेट्रोलियमकडे पेट्रोल 400 केएल, डिझेल 450 केएल, हिंदुस्थान पेट्रोलियमकडे पेट्रोल 320 केएल, डिझेल 284 केएल, इंडियन ऑईलकडे पेट्रोल 500 केएल, डिझेल 550 केएल, नायराकडे पेट्रोल 385 केएल, डिझेल 275 केएल इंधनसाठा आहे.

इंधनाबाबत काही अडचण असल्यास संपर्क अधिकारी जाहिर करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियमसाठी रवी चव्हाण 8879656582, हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी अंकित पटेल 9589257260, इंडियन ऑईलसाठी विलास डिग्रसे 9423585411, नायरासाठी आकाश मिश्रा 8530758369 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

यासोबतच पेट्रोल 533 केएल आणि डिझेल 742 केएल इंधन मार्गावर असून त्याचा पुरवठा देखील वेळेत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

0000000

जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी ‘टीबी मुक्त भारत अभियान’ टप्पा 2 चा शुभारंभ

अमरावती, दि. 25 (जिमाका): जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यात 'टीबी मुक्त भारत अभियान टप्पा 2' चा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य व कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर देण्याचे आवाहन केले.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल सिरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. जोत्सना पोटपिटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.

जगभरात २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागाने अभियानाचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमती महापात्र म्हणाल्या, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून क्षयरोगाचे निर्मूलन करणे हे आपले ध्येय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.  

डॉ. रमेश बनसोड यांनी प्रास्ताविकेतून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा मांडली. या टप्प्यात जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेणे, त्यांना वेळेवर औषधोपचार उपलब्ध करून देणे आणि 'निक्षय मित्र' योजनेच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल धांडे यांनी तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले.  यावेळी आरोग्य विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते. जिल्ह्याला टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

0000000

सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध;

11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी

अमरावती, दि. 25 (जिमाका): अमरावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार, या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहणार आहे. या प्रक्रियेत वैयक्तिक अर्जांचा विचार केला जाणार नसून, केवळ नोंदणीकृत संस्था आणि बचत गटांनाच संधी मिळणार आहे.

या जाहीरनाम्यानुसार, ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमअंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था आणि सार्वजनिक संस्था किंवा ट्रस्ट यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र अर्जांची निवड करताना बचतगटांच्या बाबतीत त्यांचे आर्थिक व्यवहार, पारदर्शकता आणि किमान 80 टक्के कर्ज परतफेडीचे प्रमाण विचारात घेतले जाईल. विशेष म्हणजे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णयापूर्वी हा प्रस्ताव संबंधित 'महिला ग्रामसभे'कडे शिफारशीसाठी पाठवणार आहे.

इच्छुक संस्थांना रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रुपयांच्या चलनाद्वारे अमरावती तहसील कार्यालयातून प्राप्त करून घेता येतील. अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया 11 एप्रिल 2026 पर्यंत आहे. कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय बंद राहील. अर्जासोबत मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट (2023 ते 2026), बँक पासबुक, जागेचा 7/12 किंवा भाडेकरार आणि सर्व सदस्यांचे एकत्रित प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

00000000


चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवड

आदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

              अमरावती, दि. 25 (जिमाका): मेळघाटच्या दुर्गम भागातील तरुणांमध्ये  जिद्द आहे. या तरुणांनी आता केवळ स्थानिक रोजगारावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारासाठी सज्ज व्हावे. प्रशासकीय यंत्रणा  तुमच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार केवल कुमार काळे यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि सिपना कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच चिखलदरा येथे संपन्न झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी श्री. काळे बोलत होते.

यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर,  प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर, सुभाष गुल्हाने, प्रा. कान्हू , पंकज कचरे तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

या मेळाव्यात बी.व्ही.जी. इंडिया, नवभारत फर्टिलायझर, सनलाईट सोलर आणि प्रेसिजन मार्चिग यांसारख्या ८ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 255 रिक्त पदांसाठी 346 उमेदवारांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 142 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 2  उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात धारणी आणि चिखलदरा भागातील उमेदवारांसाठी रोजगार मेळावे घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कान्हू  यांनी तर आभार  प्रा. ढगे यांनी मानले.

00000000

धारणी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न;

मेळघाटच्या विकासासाठी रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण असल्याचे

आमदार केवलराम काळे यांचे प्रतिपादन

अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि व्हिजन एज्युकेशन अकादमी, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच  मातोश्री इंदिरा महाविद्यालयाच्या रंग भवन सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार केवलराम काळे आणि धारणीचे प्रकल्प संचालक सिद्धार्थ शुक्ला यांच्या हस्ते  करण्यात आले.

 यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार केवलराम काळे म्हणाले की, मेळघाटमध्ये मोठ्या स्वरूपाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. या दुर्गम आणि आदिवासी भागाचा खऱ्या अर्थाने विकास हा तरुणांना रोजगार मिळाल्यानेच होऊ शकतो. त्यामुळे विविध कंपन्यांनी या भागातील उमेदवारांना संधी देऊन मेळघाटच्या प्रगतीला हातभार लावावा.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत धारणी आणि चिखलदरा सारख्या आदिवासी पट्ट्यात यापुढेही रोजगार मेळावे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्यात स्विगी, नवभारत फर्टिलायझर, जावील सर्किट, टी.एस.पी.एल. यांसारख्या एकूण 20 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. 355 रिक्त पदांसाठी 514 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. 5 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हिजन अकादमीचे राजकिशोर मालवीय होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल मालवीय, सुभाष गुल्हाने आणि महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आकांशा प्रभे यांनी तर आभार  प्रा. सोनकर यांनी मानले.

0000000


 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार

मेळाव्यात 38 उमेदवारांना मिळाली संधी

अमरावती, दि. 25 (जिमाका): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' संपन्न झाला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच. आर. देशमुख आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही तर खचून जाऊ नका, उलट नव्या जिद्दीने पुन्हा सुरुवात करण्याचा संदेश दिला. डॉ. कोळी यांनी तरुणांना केवळ नोकरी मिळवणारे न होता, नोकरी देणारे (उद्योजक) बनण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी होती.  प्रास्ताविक करताना डॉ. राजीव बोरकर यांनी सांगितले की, टीसीएस मध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, जे पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या मेळाव्यात 200 रिक्त पदांसाठी एकूण 288 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. निवड प्रक्रियेअंती 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 38 उमेदवारांना अंतिम निवडीचे पत्र देण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.

000000

'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' उपक्रमांतर्गत

दिव्यांग नोंदणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती, दि. 25 (जिमाका): दिव्यांग तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन नुकतेच करण्यात आले. 'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्ह्यातील तीन

 केंद्रांवर ही सत्रे पार पडली. यामध्ये डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय (चपराशीपुरा), सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था (मासोद) आणि राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (मार्डी रोड) यांचा समावेश होता. या तिन्ही केंद्रांवर मिळून एकूण २५० दिव्यांग उमेदवारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली.

या शिबिरात केंद्र शासनाच्या 'नॅशनल करिअर सर्विस' पोर्टलवर उमेदवारांची जागीच नोंदणी करण्यात आली. यामुळे या तरुणांना आता स्थानिक पातळीसोबतच देशपातळीवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी उपस्थित उमेदवारांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्यायांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 डॉ. नयना कडू, कौशल्य विकास अधिकारी संदीप यादव, मुख्याध्यापक महापात्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांनी आत्मविश्वासाने स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

0000000

अमरावती मुख्य पोस्ट ऑफिसच्या वेळेत वाढ

आता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!

अमरावती, दि. 25 (जिमाका):भारतीय डाक विभागाने अमरावतीकरांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, श्याम चौक येथील प्रधान डाकघराच्या कामकाजाच्या वेळेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 मार्च 2026 पासून आता नागरिकांना रात्री 7.30 वाजेपर्यंत आपली आर्थिक कामे पूर्ण करता येतील. नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कार्यालयीन वेळेतील अडचण ओळखून डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे यांच्या मार्गदर्शनात ही 'नाईट पोस्ट' सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या विस्तारित वेळेत बचत खात्यातील व्यवहार, नवीन खाते उघडणे आणि पोस्टाच्या सर्व बचत योजनांशी संबंधित कामे होतील. आज प्रवर अधीक्षक गेडाम आणि सुजितकुमार लांडगे यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. कामावरून घरी परतताना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000000

सन 2025 च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत

अमरावती, दि. 25 (जिमाका): शेती आणि पूरक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025 सालाकरिता या पुरस्कारांसाठी पात्र शेतकरी, महिला, संस्था आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण (महिलांसाठी), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडित, आणि युवा शेतकरी पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण आणि विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सर्व सन्मान महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रदान केले जातात.

निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) असलेल्या ‘Agri Award’ टॅबद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असून, विहित नमुन्यातील अटी व शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 25-03-2026

                                        जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन अमरावती, दि. 25 (ज...