Tuesday, March 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24-03-2026


                                             ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी

-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज

*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : देशात ग्राहकांचे हित जोपाण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजगता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केले.

जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे आज बचत भवन येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अन्न व औषधचे सहायक आयुक्त विनायक चव्हाण, वजन व मापे विभागाचे श्री. रिठे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री डॉ. अजय गाडे, अखिल भारतीय ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष अशोक हांडे उपस्थित होते.

श्री. दानेज यांनी ग्राहकांना चांगल्या सेवा आणि वस्तू मिळाव्यात यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. तसेच दाद मागण्यासाठी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवस्था उभारण्यात आली आहे. ग्राहकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ही तक्रार निवारणाची सोय करण्यात आली आहे. यासोबतच होलमार्क, आयएसआय मार्क यासारख्या गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला पुरावे सादर करावे लागतात. यात संबंधित वस्तूचे देयक हे महत्वाचे असते. बियाणांमध्ये फसवणूक झाल्यास बियाणांची पिशवी आणि त्यातील थोडे बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे. यातून त्या बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. ग्राहकांच्या हक्कांविषयी चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा आणि वस्तू मिळण्यास मदत होत आहे.

यावेळी शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ग्राहकांच्या हक्क आणि सुविधांविषयी पथपाट्य सादर केले.

0000000


मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार

*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाटातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शासनाने दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावू नये. यासाठी अग्रणी बँकेनी इतर बँकांसोबत संपर्क साधून सूचना द्याव्यात. मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी दहा गावांचे एकत्रितरित्या पाच वर्षांचे नियोजन करून कामे करण्यात यावी. तसेच इंटरनेट सेवा नसलेल्या गावासाठी हजेरी नोंदणीसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत मिळणारे वेतन विनाविलंब मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

मेळघाटात प्रामुख्याने वन क्षेत्र असल्याने याठिकाणी होणारे रस्ते सुधारण्यासाठी वन विभागाची परवानगी गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाने यासाठी पुढाकार घेऊन रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मेळघाटात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यास येथील स्थलांतरण होणार नाही. तसेच शेतीमधील पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मेळघाटातील 22 गावाच्या पारंपारीक विजेच्या प्रश्नाबाबत राज्याकडून केंद्रीय वन्यजीव मंडळाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंडळाची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी विजेची कामे होण्यास मदत मिळणार आहे.

आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच याठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय होण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच उपकेंद्र स्तरावर रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच एकशिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. सार्वजनिक दळणवळणाची सुविधा परिणामकारक होण्यासाठी सेमाडोह येथून बसची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

00000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 24-03-2026

                                                         ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी -अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज *जिल्हाधिका...