Monday, June 27, 2022

किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावती, दि. 27 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधितांनी ती पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे, ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

           अमरावती जिल्ह्यातील ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर ‘सूचना-घोषणा’ (अनाऊन्समेंटस्) शीर्षाखाली प्रसिध्द करण्यात येत आहेत. या यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी. त्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर- ई-केवायसी न्यू  हा पर्याय निवडून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘रामेती’च्या प्रांगणातील वाळलेली सागवान झाडे विक्रीस; इच्छूकांनी निविदा भरण्याचे आवाहन

‘रामेती’च्या प्रांगणातील वाळलेली सागवान झाडे विक्रीस; इच्छूकांनी निविदा भरण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 : तपोवन रस्त्यावरच्या ‘रामेती’च्या (प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था) प्रांगणातील वाळलेल्या 5 सागवान झाडांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. इच्छूकांनी निविदा सादर करण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

‘रामेती’च्या प्रांगणातील वाळलेली 5 सागवान झाडे काढण्याबाबत महापालिकेची रीतसर परवानगी प्राप्त आहे. त्यानुसार लिलाव जाहीर करण्यात आला आहे. निविदा भरणा-यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, आठ हजार रू. चा डीडी आदी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. वृक्ष काढताना कोणतीही हानी होऊ न देण्याची व वाहतुकीची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. इच्छूकांनी संस्थेशी (0721) 2952863 वर संपर्क साधावा.

000

Friday, June 24, 2022

वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण करुन पर्यटनदृष्ट्या विकसीत करणार - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 







वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण करुन

पर्यटनदृष्ट्या विकसीत करणार

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि. 24 (विमाका) : अमरावती महापालिका क्षेत्रात येणाऱ्या वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. या स्थळाच्या विकास कामांना चालना मिळण्यासाठी पर्यटन विभाग, वन विभाग व नगररचना विभागाने समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिल्या.

वडाळी तलाव व परिसराचे सौंदर्यीकरण व येथील निसर्ग पर्यटन विकसीत करण्याच्या दृष्टीने श्रीमती कौर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.महापालिका आयुक्त प्रविण आष्टीकर, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले, सहायक संचालक नगररचना रंकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, शहर अभियंता रविंद्र पवार, प्रकल्प अभियंता राजेश आगरकर, उपअभियंता प्रमोद तिरपुडे आदी उपस्थित होते.

वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेकडुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात‍ आला होता. त्या अनुषंगाने अमृत सरोवर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीपैकी प्रथम 20 कोटी रुपये प्राप्त होणार असुन त्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली. या निधीअंतर्गत तलावातील पाण्याचे शुद्धीकरण, तलावात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया, तलाव परिसरात दगडांची फरसबंदी आदी कामे योग्य पद्धतीने करण्याच्या सुचना श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिल्या.

वनविभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरात निसर्ग पर्यटन विकसीत करण्यासाठी वनविभागाने प्रस्ताव सादर करावे. या कामासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतुन 1 कोटी प्राप्त होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या परिसरात निसर्ग पर्यटनाच्या निर्मितीसाठी पर्यटन विभाग, वनविभाग व नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावे, असे श्रीमती कौर यांनी सांगितले. यावेळी वनविभाग, नगर रचना, पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000000

  

 

Tuesday, June 21, 2022

कृषी विभागाची धडक कारवाई बनावट डीएपी खताची ८८ हजार रू.ची ६३ पोती जप्त

 



कृषी विभागाची धडक कारवाई

बनावट डीएपी खताची ८८ हजार रू.ची ६३ पोती जप्त

 अमरावती, दि. २१ : भातकुली तालुक्यात एका विक्रेत्याकडून बनावट डीएपी खतांची घरपोच विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाद्वारे सोमवारी कारवाई करण्यात आली. त्यात बनावट डीएपी खताची ८८ हजार रू.ची ६३ पोती जप्त करण्यात आली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कृषी विकास अधिकारी  जी. टी. देशमुख, अजय तळेगावकर, दादासो पवार, अश्विनी चव्हाण , उध्दव भायेकर, पवनकुमार ढोमणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एका विक्रेत्याकडून घरोघर फिरून ऑर्डर घेऊन बनावट डीएपी खताची घरपोच विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने खारतळेगाव येथील शेतकरी बांधवांशी चर्चा करून चौकशी केली. त्यात सात शेतकऱ्यांनी बनावट खते खरेदी केली असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित सात शेतकरी बांधवांकडून तक्रार दाखल करण्यात आली व तक्रारीच्या आधारे विक्रेता मिलिंद वानखडे (ढंगारखेडा, ता. भातकुली) यांच्याविरोधात चांदूर बाजार

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे व वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच खते खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे, तसेच कुणी व्यक्ती घरपोच कमी किमतीचे खते विक्री करत असल्यास त्याबाबत माहिती कृषी विभागास द्यावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान व कृषी विकास अधिकारी  जी. टी. देशमुख यांनी केले आहे.

00000

Monday, June 20, 2022

चिखलदरा तालुक्यातील 16 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

 चिखलदरा तालुक्यातील 16 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने

संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 : चिखलदरा तालुक्यातील 16 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छूक संस्था व गटांनी 4 जुलैपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे.  

    

नवीन दुकानांची क्षेत्रे

 चिखलदरा तालुक्यातील टेटू, मेमना, लवादा, पांढरा खडक, मोझरी, रामटेक, बागलिंगा, कुलंगणा बु., चौ-यामल, लाखेवाडा, भुत्रूम, भांडुम, सलिता, सुमिता, खुटिदा, कुही या 16 गावांतील रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

                                                निवडीचा प्राथम्यक्रम

नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत संस्था यांना अर्ज करता येईल व याच प्राथम्यक्रमाने अर्जाचा विचार होईल. वैयक्तिक अर्जाचा विचार केला जाणार नाही.  

                                                अर्जाची प्रक्रिया

इच्छूक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजतादरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत 20 जून ते दि. 4 जुलैपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी कळवले आहे.

रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण क्षेत्रात स्वयंसहायता गटास परवाना देण्यापूर्वी प्रस्ताव महिला ग्रामसभेकडे पाठविला जाणार आहे व महिला ग्रामसभेच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय होईल. अर्जासोबत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे लेखे, हिशोब, कर्ज, परतफेड, बँकेची कागदपत्रे आदी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

                                    000 


आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात

 

आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात

अमरावती, दि.20: आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात, असे आवाहन जिल्हा रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. आस्थापनांना त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जून 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी ई-आर 1 या प्रपत्राची माहिती या संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन सादर करावी. काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे. ई- आर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिला आहे.

0000

--

 

माजी सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

माजी सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती, दि.20: जिल्ह्यातील माजी सैनिक मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

यातील मुलांचे वसतिगृह नवसारी येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या मागे असून, त्यात 48 विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. मुलींचे वसतिगृह भातकुली तहसील कार्यालयामागील नंदनवन कॉलनीत असून, त्यात 48 मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.

 अमरावती शहराबाहेर राहणा-या माजी सैनिक व दिवंगत माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या मुलांकडून अत्यल्प शुल्क आकारले जाते. दिवंगत माजी सैनिकांच्या पाल्यांना विनामूल्य प्रवेश मिळतो. प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. तरी इच्छूकांनी अर्ज वसतिगृह अधिक्षकांकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी नवसारी होस्टेलच्या (0721)2530366, मोबाईल क्रमांक 9970448088, नंदनवन कॉलनी होस्टेलच्या (0721) 2550429 मोबाईल क्रमांक 9890266004 किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी (0721) 2661126  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम

  महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotirao...