Wednesday, June 29, 2022

शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण - जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे

 



शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी

संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण

- जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे

अमरावती, दि. 29 : शाश्वत विकासासाठी निश्चित केलेली ध्येये साध्य करतांना केवळ उद्दिष्टपूर्तीवर भर न देता गुणवत्तेला अधिक महत्त्व द्यावे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य स्त्रोत म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.

नियोजन भवन येथे भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रा. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त सोळावा सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीमती भाकरे म्हणाल्या की, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ हे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची 17 ध्येये निश्चित करुन दिली असून ती साध्य करण्यासाठी शासनातील विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य स्त्रोत म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण असते. या माहितीच्या आधारे शासनस्तरावरुन सर्व समावेशक योजना राबविण्यात येतात.

शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी माहिती शासनाच्या इतर विभागांकडून वेळेत आणि अचूक मिळणे गरजेचे आहे. ही माहिती परिपूर्ण असावी, यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. आजच्या नियोजनामुळे त्यांच्या पुढील पिढीलाही त्याचा निश्चितच फायदा होईल. अशा पदध्तीने शाश्वत विकासाचे ध्येय व सुसूत्रपणे अंमलबजावणी करण्याची सूचना श्रीमती भाकरे यांनी यावेळी केली.

शाश्वत मानवी विकासासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांचा विकास होणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करतांना सर्व संबंधित यंत्रणेने एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. सर्वच क्षेत्रात सांख्यिकी अपरिहार्य असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे क्षेत्रीय स्तरावर येणारे अनुभव, अडचणी याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी यासंबंधी यावेळी मार्गदर्शन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...