जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2025 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू
अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 23 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.
0000
तलावावर संस्था नोंदणी करण्याबाबत आवाहन
स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, महिला यांना संधी
अमरावती, दि. 17 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील 500 हेक्टरखालील पाटबंधारे जलसंधारण विभागाचे धानोरा दिग्रस तलाव (44 हे) हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर शासन निर्णयानुसार संस्था नोंदणी करावयाची आहे. यासाठी तलाव परीसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांना संधी मिळणार आहे. तरी धानोरा दिग्रस तलाव (44 हे) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधून बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणी करीता प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.
000000
थेट
कर्ज योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड
अमरावती, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे विकास महामंडळामार्फत थेट लाभाची योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांची
ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे. ही सोडत मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी
दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे.
यात 125 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात
येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये 63 पुरुष व 62 महिला लाभार्थी राहणार आहेत. साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये आहे. या
योजनेंतर्गत एकूण 175 कर्ज मागणी अर्जापैकी 173 अर्ज पात्र झाले आहेत. त्यामध्ये
119 पुरूष व 54 महिला आहेत. यातील 63 पुरूष आणि 62 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात
येणार आहे.
ही सोडत दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, कॅम्प, अमरावती काढण्यात येणार
आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
एम. टी. खडसे यांनी दिली आहे.
0000
राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): समाजातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत करणाऱ्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर यांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राविण्यात येते आहे.
अर्जदार हा अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती किंवा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर या घटकातील असावा. विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. निवड वर्षासाठी एप्रिलच्या पहिल्या दिवशी वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे.
परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असावी. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम, निर्वाह भत्यामध्ये अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १५,४०० डॉलर वार्षिक, यू. के. साठी ९,९०० पाऊंड वार्षिक, तसेच आकस्मिक खर्च म्हणून पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी १,५०० डॉलर, यू. के. साठी १,१०० पाऊंड देण्यात येतात. विद्यार्थ्यांना आरोग्य विमा आणि व्हिसा शुल्क अनुज्ञेय असणार आहे. परदेशात जाताना आणि अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना प्रवासाचा खर्च देण्यात येतो.
या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी nosmsje.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती मिळवावी. योजने संबंधित अधिक माहितीसाठी योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-११०००१. फोनः ०११-२३३८४०२३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment