Thursday, October 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16-10-2025



जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद

स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

अमरावती, दि. 16 (जिमाका): निम्न पेढी प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्या गावांचे दर्जेदार पुनर्वसन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्या मान्य केल्या आहेत. निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीला शासनाने मान्यता दिल्याने या कामास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांनी पुनर्वसित गावात तातडीने स्थलांतरीत व्हावे, या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आवाहनाला बाधीत गावाच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्नपेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह बाधीत गावातील प्रतिनिधी निलेश मानकर, गौतम खंडारे, प्रविण तायडे उपस्थित होते. उपस्थितांना निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी पुनर्वसित गावात रस्ते, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. तसेच 150 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. तसेच स्थलांतरणासाठी देण्यात येणारा दोन लाख रूपयांचा भत्ता एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच पुनर्वसित गावांमधील सोयीसुविधांसाठी 57 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून गावाच्या मागणीप्रमाणे इतर योजनांमधून सुविधा उभारण्यात येतील. प्रकल्पामुळे 12 हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते करून दिले जाणार आहे, असे सांगितले.

शासनाने निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीची परवानगी दि. 14 ऑक्टोबर रोजी दिली आहे. त्यामुळे तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे. घळभरणीचे काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रकल्पात पाणी साठण्यास सुरवात होणार असल्याने हा पाणीसाठा बाधीत गावात येणार आहे. त्यामुळे अद्यापही स्थलांतरीत झाले नसलेल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे स्थलांतर करावे, अशा सुचना देण्यात आल्या. बाधित गावातील नागरिकांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाची निवाऱ्याशिवाय गैरसोय होणार नाही. निम्न पेढी प्रकल्प प्रधानमंत्र्यांच्या प्राधान्याचा प्रकल्प असल्याने यास गती देण्यात आली आहे. सरपंचांनी सकारात्मक पावले उचलून नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरीत करावे, असे आवाहन केले.

निम्न पेढी प्रकल्पातील सर्व गावांचे पुनर्वसन होण्यासाठी पारदर्शकता राखण्यात आली. विशेष पॅकेज देण्यात आल्याने प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद राखला. त्यांच्या प्रयत्नातील सातत्याने प्रकल्पबाधीत पुनर्वसित गावात जाण्यास तयार झाले आहेत. प्रकल्पबाधितांच्या मागण्या आणि देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

…..

प्रकल्पग्रस्तांची घरकुल आणि दर्जेदार पुनर्वसनाची मागणी मान्‍य करण्यात आली आहे. पुनर्वसनाच्या कामात पारदर्शकता, तसेच खारपाणपट्टा असल्याने शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. महत्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने पुनर्वसनाला वेग आला आहे. स्मशानभूमी स्थलांतर आणि ओपन जिमची मागणी मान्य झाली आहे. तसेच इतरही प्रश्न येत्या काळात मार्गी लागतील. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

निलेश मानकर, कुंड सर्जापूर

…..

गेल्या कालावधीत दर्जेदार पुनर्वसनाची कामे गतीने झाली आहेत. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. घराच्या बांधकामासाठी मदत मिळणार आहे. तसेच स्थलांतरणासाठी दोन लाख रूपयांची रक्कम एकत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरण होणार आहे. पुनर्वसनाबाबत शासनाने मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरणासाठी सहकार्य करण्यात येईल.

गौतम खंडारे, अळणगाव

..…

प्रकल्पबाधीत गावांतील नागरिकांना भूखंडांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच कुंड खुर्द, सावरखेड, ततारपूर येथील रस्त्यांचा विषय मार्गी निघाला आहे. पुनर्वसित गावात विकासकामांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन स्मशानभूमी आणि ओपन जीमची मंजूरात मिळाली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत संपूर्ण गावाच्या स्थलांतरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

सुजाता तायडे, कुंड सर्जापूर

00000



अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी

-अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील

अमरावती, दि. 16 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत अवैध सावकारी तक्रारी संबंधात नुकताच आढावा घेतला. विदर्भ व मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधंवांचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक  विवचंनेत आहेत. शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांची अवैध सावकारी व्यवहारात पिळवणुक होऊ नये यासाठी त्यांनी शेतकरी बांधवांनी व व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी ,असे आवाहन केले आहे.

अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबियांचे फसवणूक, पिळवणूक होत असल्यास त्यांनी अमरावती सहकार विभागात अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराविरूध्द तक्रार संबंधीत जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, सरकारी संस्था याचे कार्यालयात तसेच अमरावती जिल्ह्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती व उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका अमरावती सहकार संकूल, कांतानगर अमरावती -444602कार्यालयीन ईमेल क्रमांक ddr_amr @rediffmail.com/dyr.amr.amravati@gmail.com यावर करण्यात याव्यात तसेच तालुका  स्तरावरील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयातही तक्रार नोंदवू शकतात.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, उपनिबंधक सुधीर खंबायत,सहायक निबंधक गजानन डावरे, कार्यालय अधीक्षक अनिरुद्ध राऊत,  सत्यजीत पोले,  दिपक गासे, प्रशांत ढोके, सचिन शहाकार, सतिश समर्थ व कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; शाळांना नोंदणीचे निर्देश

अमरावती, दि. 16 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. इयत्ता 9 वी, 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, तसेच 5 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा यात समावेश आहे.

या योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता शाळेतील मुख्याध्यापकांनी http://prematric.mahait.org/Login/Login- या महाडीबीटी प्रणाली वेब लिंकवर मुख्याध्यापक लॉगीन वापरून शाळेचे, मुख्याध्यापकांचे व लिपीकांचे प्रोफाइल तसेच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचे प्रोफाइल तातडीने अद्ययावत करावे. या अनुषंगाने, महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र असलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची नोंदणी मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले आहे.

0000000

कौशल्य विकास केंद्राच्या रोजगार मेळाव्यात 168 तरुणांचा सहभाग;

62 जणांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन नुकतेच करण्यात आले. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून 168 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

 उमेदवारांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दुहेरी पद्धतीने नोंदणीची सोय उपलब्ध करण्यात आली होती. मेळाव्यात दहावी, बारावी, पदविका धारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळावा यासाठीएकूण  6 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रेमंड लक्झरी कोटन प्रा.लि. अमरावती, सहयोग मल्टी बँक लि. अमरावती, प्लास्टी सिमैक आय टी, प्लास्टी सर्ज अमरावती, जाधव गियर्स प्रा.लि. आणि सत्या माइक्रो फायनान्स प्रा.लिअमरावती यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी विविध क्षेत्रातील एकूण 128 पदांसाठी मुलाखत प्रक्रिया राबवली. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी 126 उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. या प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे 62 उमेदवारांची प्राथमिक निवड आणि 3 उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली.

0000000

क्रीडा साहित्य अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संस्थांना 14 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

 अमरावती, दि. 16 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्य, जिल्हास्तरावर क्रीडा विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी तसेच गुणवंत गरजू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाअंतर्गत क्रीडा विकासासाठी 14 लक्ष मर्यादेपर्यंत अर्थसहाय क्रीडा साहित्य व व्यायाम साहित्य अनुदान देण्यासाठी शैक्षणिक संस्था क्रीडा संघटना मंडळे शासकीय संस्था यांचेकडून तीन प्रतीत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात येत आहे.

व्यायाम साहित्याकरीता 500 चौरस फुट हॉल असणे आवश्यक आहे. व तसेच क्रीडा साहित्यासाठी प्रत्यक्ष क्रीडागंणासाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे. सदरची जागा ही स्वमालकीची 7/12, 8 अ अथवा दीर्घ मुदतीचा करारनामा असावा. लाभार्थी संस्थांना क्रीडा व व्यायाम साहित्य प्रचलीत दर करारानुसार पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही संचालनालयाचे सहमतीने करण्यात येईल.

शैक्षणिक संस्था यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानातील विनाअनुदानीत प्राथमिक माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा तसेच क्रीडा संघटना मंडळे यांच्यासाठी नोंदणीकृत असलेल्या एकविध खेळाच्या संघटना, खाजगी क्लब, क्रीडा मंडळ, युवक मंडळ यांना अर्ज करता येईल. तसेच शासकीय विभाग, पोलीस विभाग, स्पोर्ट क्लब, ऑफीसर्स क्लब आणि शासकीय महाविद्यालय हे अनुदानासाठी पात्र असतील. राज्य क्रीडा विकास निधीतून अर्थ सहाय्यासाठी अर्ज नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

शेतकऱ्यांसाठी डिजीटल सहकारी

महाविस्तार एआय ॲप लाँच; हवामान, बाजारभावाची माहिती जागेवर

            अमरावती, दि. 16 (जिमाका): शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषि विभागाने महाविस्तार एआय हे अँप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व गरजा पुर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतींचे मार्गदर्शन करणार आहे.

            महाविस्तार एआय ॲपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्रांना त्वरीत उत्तरे देतो. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखविले जात आहे. या ॲपवर कृषि विभागाच्या विविध कृषि योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी आणि विमा योजनांचे तपशील एकाचा ठिाकणी मिळु शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडीओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवर मार्गदर्शन मिळेल. ॲपमधील एआय तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून उपाय मिळू शकतात. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे या ॲपमध्ये आहे. त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाईलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकता, यामुळे त्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊ शकते.

            गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार एआय ॲप डाउनलोड करा. शेतीत डिजीटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...