एकाच दिवशी 400 जणांना नियुक्तीचे आदेश
*अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
*लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
अमरावती, दि. 4 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील 400 उमेदवारांना आज एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी अशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वनसंरक्षक अर्जुना के. आर., आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी, शासनाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे नियम सोपे केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यातील नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात साधारणतः 400 जणांना, तर अमरावती विभागात 1100 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती होण्यासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. तसेच सक्रीय योगदान दिल्यामुळे नियुक्त्या करणे सफल झाले आहे. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख कामे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, शासनाने दीडशे दिवसाच्या उपक्रमांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा उपक्रम घेतल्याने असंख्य उमेदवारांना फायदा झाला आहे. अनुकंपा तत्वांमध्ये दावा करण्यासाठी आता तीन वर्षे मुदत आणि उमेदवार बदलण्याची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार पात्र ठरले आहेत. शासन सेवेत आल्यानंतर आता प्रत्येकाने कर्तव्याप्रति संवेदनशील राहावे. एक चांगला अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारावी. नियुक्तीनंतर संवेदनशीलपणे कार्य करून पुढे जावे, असे सांगितले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांनी शासन सेवेत नियुक्ती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी वन विभागात नवनियुक्त कर्मचारी ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी मनोगत व्यक्त केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आभार मानले.
०००००
उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सोमवारी दौरा
अमरावती, दि. 4 : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोमवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यानुसार सकाळी 9 वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित भारतीय अभिजात भाषा परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती राहतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
कॅम्प परिसरात बिबट आढळल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी
*वन विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 4 : अमरावती शहरातील कॅम्प परिसरात थॉमस चर्चजवळ एक मादी बिबट पिल्लासह निदर्शनास आली आहे. सदर परिसर दाट लोकवस्तीचा असून या भागात शाळादेखील आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
शहरातील बिबटाच्या वावरावर वन विभाग, पोलिस व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा एकटे जाणे टाळावे, लहान मुलांना घराबाहेर एकटे खेळू देऊ नये, पाळीव जनावरे, विशेषतः कुत्री, बोकड व कोंबड्या, रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवावी, बिबट दिसल्यास त्याला त्रास देऊ नये, दगडफेक करू नये किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, बिबट दिसून आल्यास त्वरित वन विभागाच्या हेल्पलाईनवर 1926 किंवा 77680 38884 किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे.
शाळांनी शाळेच्या आवारातील सर्व दरवाजे बंद ठेवावीत, विद्यार्थ्यांना गटानेच हलवावे व शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखालीच बाहेर ने-आण करावी, सक्तीचे कार्यक्रम, मैदानावरील सभा, खेळ सध्या टाळावेत, पालकांना परिस्थितीबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना आणते-नेतेवेळी विशेष दक्षता घ्यावी.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवा पसरवू नये किंवा घाबरून जाऊ नये, वन विभागाची पथके घटनास्थळी कार्यरत असून सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, सर्वांच्या सहकार्यामुळे ही परिस्थिती लवकर हाताळता येईल, असे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment